भिकार्याच्या वेशात येऊन जया भादुरीला कुणी घाबरवले?
साठच्या दशकामध्ये शिवाजी गणेशन यांनी तमिळ भाषेत एक चित्रपट केला होता ‘नवरात्री’. यामध्ये त्यांनी विभिन्न नऊ भूमिका एकट्याने साकार केल्या होत्या. नंतर हाच चित्रपट तेलगू भाषेमध्ये ए नागेश्वरराव यांनी देखील बनवला. त्याला देखील व्यापक यश मिळाले. तोवर चित्रपट डबल रोल ही सामान्य गोष्ट झाली होती; परंतु एकाच कलाकाराने एकाच चित्रपटात नऊ वेगवेगळ्या भूमिका करणे हे प्रेक्षकांसाठी मोठी गोष्ट होती. या दोन्ही दक्षिणात्य चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक ए भिमसिंग यांनी हा चित्रपट हिंदी मध्ये बनवायचे ठरवले.
त्यासाठी त्यांनी तोलामोलाचा कलाकार असावा म्हणून प्रथम दिलीप कुमार यांना अप्रोच झाले. दिलीपकुमार यांना ते कथानक खूप आवडले. त्यांनी साउथ कडील ते दोन्ही चित्रपट देखील बघितले होते. परंतु त्यांनी स्वतःहून ही भूमिका करायला असमर्थता दर्शवली आणि त्यांनी संजीव कुमार चे नाव हे भीमसिंह यांना सुचवले. संजीव कुमार आणि दिलीप कुमार यांनी ‘संघर्ष’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. संजीव कुमार यांच्या अभिनयाची महती दिलीप कुमार यांना समजली होती. संजीव कुमार यांनी सी ग्रेड चित्रपटापासून काम करायला सुरुवात केली असली तरी साठच्या दशकाच्या उत्तरार्धापासून तो एकाहून एक सरस भूमिका करत होता. आणि हे भूमिका आपल्यापेक्षा संजीव कुमार जास्त चांगल्या पद्धतीने करू शकेल असे दिलीपकुमार वाटल्यामुळे त्यांनी दिग्दर्शक हे भिमसिंग यांना संजीवकुमारचे नाव सुचवले.
पण ए भीमसिंग यांना या सिनेमासाठी दिलीपकुमार हवा होता. आदमी(१९६८) आणि गोपी(१९७०) हे दिलीपकुमारचे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यामुळे त्यांचा तो आवडता अभिनेता बनला होता. परंतु दिलीप कुमार यांनी संजीव कुमार माझ्यापेक्षा ही भूमिका जास्त चांगल्या पद्धतीने साकारेल याची खात्री दिग्दर्शकाला दिली. तसेच “ या चित्रपटाला सुरुवातीला मी माझ्या आवाजात या सिनेमाबद्दलची माहिती प्रेक्षकांना सांगेन. ज्यामुळे सिनेमाला एक वेगळे वेटेज प्राप्त होईल!” असे सांगितले.
यानंतर ए भीमसिंग यांनी चित्रपटाला प्रारंभ केला. या सिनेमात जया भादुरीला (Jaya Bhaduri) नायिका म्हणून घेण्यात आले. या चित्रपटात संजीव कुमार यांनी नवरस असलेल्या नव विभिन्न भूमिका केल्या होत्या. या नवरसांमध्ये करुण रस, रौद्र रस, वीर रस, हास्य रस, भयानक रस,शृंगार रस, अद्भुत रस, शांत रस, बिभत्स घृणा रस हे नऊ रस येतात. संजीव कुमारने या चित्रपटात अतिशय अप्रतिम असे अभिनयाचे दर्शन दिले. या सिनेमाच्या दरम्यान एक मनोरंजक किस्सा घडला.
=======
हे देखील वाचा : देव आनंद –सुरैयाची अधुरी एक प्रेम कहाणी
=======
या सिनेमाच्या शूटिंग मद्रासला चालू असताना एकदा दुपारी लंच नंतर अभिनेत्री जया भादुरी (Jaya Bhaduri) सेटवरच आपल्या खुर्चीत डोळे मिटून पडली होती. तितक्यात एक कार स्टुडिओच्या गेटमधून आत येताना तिला दिसली. नंतर त्या कारच्या पाठीमागून एक ओंगळ वाणी व्यक्ती तिच्याकडे येऊ लागला. जया अर्धवट झोपेत होती. तिला कोणीतरी आपल्या बाजूला येत आहे असे दिसत होते. नंतर ती व्यक्ती जयाच्या खुर्चीवर टकटक करून तिच्याकडे भीक मागू लागली. त्या आवाजाने जया चक्क जागी झाली आणि पाहते तर काय समोर एक कुष्ठरोगी झडलेल्या बोटांसहित तिच्यापुढे भीक मागत होता. ती भयंकर घाबरली. आणि जोरजोरात ओरडायला लागली. घाबरून तिने धूम ठोकली तो भिकारी देखील तिच्या मागे पळू लागला आणि पैसे मागू लागला. त्याचे ओंगळवाणे रूप बघून जयाला किळस आली होती. आता जया भादुरीचा (Jaya Bhaduri) संयम सुटला . स्पॉट बॉय ला तिने बोलावले. तोवर सिक्युरिटी देखील तिथे आली होती. तिने सांगितले,” हा भिकारी आपल्या साईटवर काय करतो आहे? या घाणेरड्या भिकाऱ्याला आताच्या आता इथून बाहेर काढा!”
सिक्युरिटीने धक्के मारत त्याला बाहेर काढायला सुरुवात केली. तो भिकारी जयाकडे पाहून पुन्हा पुन्हा पैसे मागत होता. जया प्रचंड घाबरली होती!! नंतर तो भिकारी म्हणाला,” मै संजीव कुमार हूं छोडो मुझे” परंतु जया भादुरीला (Jaya Bhaduri) ते काही पटले नाही. ती म्हणाली,” आजकाल कोणी उठतो आणि संजीव कुमारचे नाव घेऊन काहीही करतो. त्याला आताच्या आता बाहेर काढा.” नंतर तो भिकारी हसायला लागला आणि हळूहळू त्याने आपला मेकअप काढला आणि आपले खरं रूप दाखवले तो खरोखरच संजीव कुमार होता! त्याच्या ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटातील बीभत्स रस दाखवणारी ती व्यक्तिरेखा होती!! संजीवकुमार खरोखरच ताकतीचा कालकार होता हे वारंवार सिद्ध होत होते. हिंदी सिनेमामध्ये असा अभिनव प्रयोग करून देखील या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल!
धनंजय कुलकर्णी