ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मैत्रिणीच्या समोर अभिनेत्री साधनाला का लज्जित व्हावे लागले?
अभिनेत्री साधना (Sadhana) हिला लहानपणी एकदा आपल्या मैत्रिणींच्या समोर अक्षरशः मान खाली घालावी लागली होती. शरमिंदा व्हावे लागले. खूपच लज्जित व्हावे लागले होते. याचे नेमके काय कारण होते? कोणत्या कारणामुळे तिला मैत्रिणींच्या समोर रडू कोसळले होते? किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. अभिनेत्री साधना शिवदासानी (Sadhana) हिचा जन्म २ सप्टेंबर १९४१ चा! वयाच्या चौदाव्या वर्षी ती नृत्य शिकायला मुंबईच्या एका नृत्यालयात जात असे. एकदा या डान्स स्कूलमध्ये अभिनेते राजकपूर आले आणि त्यांनी डान्स मास्टरला ,” तुमच्या विद्यालयातील चांगल्या नृत्य करणाऱ्या मुलींना मला माझ्या चित्रपटात एका डान्समध्ये घ्यायचे आहे.” असे सांगितले. सर्व मुलींना खूप आनंद झाला. मग नृत्य शिक्षकाने सिलेक्टेड पाच मुलींना राज कपूरकडे पाठवले. या पाच मुलींमध्ये साधनाचा देखील नंबर होता. साधनाला अर्थातच खूप आनंद झाला कारण राजकपूर आणि त्यांचे चित्रपट यांची जनमानसावर त्या काळात जबरदस्त छाप होती आणि अशा सुपरस्टारच्या चित्रपटात आपल्याला नृत्य करायला मिळणार याचा आनंद विद्यार्थिनींना आणि साधनाला होणे स्वाभाविक होते.
काही दिवसातच त्यांना आर के स्टुडीओ मध्ये बोलवण्यात आले. तिथे त्यांच्या रिहर्सल झाल्या. पुढे काही दिवसानंतर श्री ४२० चित्रपटातील ‘मुडमुड के ना देख मुडमुड के…’ या गाण्याचे चित्रीकरण होणार होते. हे गाणे चित्रपटात अभिनेत्री नादीरा हिच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे एका हॉटेलमध्ये शूट होणार होते. स्टुडिओत हॉटेलचा सेट लावला होता. नादीराच्या मागे कोरस मध्ये डान्स करणाऱ्यात एक साधना (Sadhana) होती. या गाण्याचे चित्रीकरण तब्बल आठ दिवस चालले. साधना रोज नटून थटून स्टुडिओ जात असे आणि घरी आल्यानंतर आपल्या मैत्रिणींना शूटिंगच्या रंजक आठवणी सांगत असे. हे सांगताना साधनाचा चेहरा अभिमानाने फुलून जात असे. तिच्या मैत्रीणींना देखील साधनाच्या या अनुभवाचा हेवा वाटत असे. चित्रीकरण संपले. आता साधना आणि तिच्या मैत्रिणी श्री ४२० या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होत्या. ६ सप्टेंबर १९५५ या दिवशी ‘श्री ४२०‘ संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला. साधनाने पहिल्याच आठवड्यात आपल्या दहा-बारा मैत्रिणींना हा चित्रपट दाखवायचे ठरवले. स्वतः तिकीट काढून ह्या सर्व मुली थिएटरमध्ये श्री ४२० हा सिनेमा बघायला गेल्या. सगळ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. शेवटी एकदाचे ते गाणे पडद्यावर अवतरले ‘मुड मुड के ना देख मुड मुडके….’ साधना आणि तिच्या मैत्रिणी डोळे विस्फारून पडद्याकडे पाहत होत्या. पण हाय रे दैवा…. साधना कुठेही पडद्यावर दिसलीच नाही!
साधनाला (Sadhana) हा मोठा शॉक होता. तिला कळेना नेमकं झालंय तरी काय? चित्रपट संपल्यानंतर मुली तिला चिडवू लागल्या “तू तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होती आम्ही हे केले ते केले.. आणि सिनेमात कुठेही तू दिसत नाहीस!” साधनाला आता रडू कोसळले होते. दुःखा वेगाने ती रडायला लागली होती. ती खूपच लज्जित झाली होती. स्वत:ला पडद्यावर बघण्याचे स्वप्न एका क्षणात भंग पावले होते.
=======
हे देखील वाचा : महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!
=======
झाले असे होते की, चित्रपटाची लांबी वाढल्याने साधनावर चित्रित केलेला भाग एडिट करावा लागला होता त्यामुळे साधना चित्रपटातून गायब झाली होती. पुढे कित्येक दिवस साधना घरातून बाहेर पडली नाही. आतल्या आत कुढत राहिली. पण मग तिने विचार केला यात माझा काय दोष? कां म्हणून मी स्वत:ला शिक्षा द्यायची. मग तिने निश्चय केला एक ना एक दिवस मी चित्रपटात जाऊनच दाखवणार!आता अशी भूमिका करणार की माझी भूमिका कुणाला एडीट करताच येणार नाही. आता तिने मनोमन निश्चय केला होता आणि त्या दृष्टीने तिने पावले टाकायला देखील सुरुवात केली होती. तिच्या तपश्चर्येला फळ आले आणि दोन वर्षानंतरच १९५७ साली ‘आबना’ या सिंधी चित्रपटात तिला नायिकेची भूमिका मिळाली. हा चित्रपट खूप चालला आणि हिंदी सिनेमा निर्मात्यांचे लक्ष साधनाकडे गेले. १९६० साली ‘लव इन सिमला’ या चित्रपटातून साधनाचे हिंदी सिनेमात आगमन झाले. या सिनेमात तिचा नायक जॉय मुखर्जी होता.तर दिग्दर्शन आर के नय्यर (पुढे साधनाने त्यांच्याशी लग्न केले!) होते.
आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि अभिनयाने तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. हम दोनो, मेरे मेहबूब,मेरा सया, वो कौन थी , आरजू , वक्त, परख, असली नकली, एक मुसाफिर एक हसीना या सिनेमातून साधना रसिकांच्या दिलावर राज करू लागली. तिच्या कपाळावरील केसांचा ‘साधना कट’ त्या काळातील मुलींचा फॅशन आयकॉन झाला होता. साधना तरुणांच्या दिलाची राणी बनली होती. काय योगायोग असतो बघा. ज्या साधनाची (Sadhana)‘श्री ४२०’ या चित्रपटातील भूमिका राज कपूर ने एडिटिंग टेबलवर कापून टाकली होती त्याच साधना सोबत १९६४ साली राज कपूर ने ‘दुल्हा दुल्हन’ या चित्रपटात नायकाची भूमिका केली होती! म्हणजे ज्या नायकाने तिची भूमिका कापली होती त्याचीच नायिका साधनाने बनवून दाखवले होते!
धनंजय कुलकर्णी