रामगोपाल वर्माने “दौड” वेगात का बनवला ?
संजय दत्तच्या निस्सीम भक्तांना आणि हिंदी चित्रपटाच्या “फिल्म दीवान्या”ना त्याच्या वादळी आयुष्यातील १२ मार्च १९९३ रोजीच्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणात या “संजू”ला आरोपी म्हणून झालेली अटक वगैरे अनेक वादग्रस्त गोष्टी माहिती असतीलच. राजकुमार हीरानी दिग्दर्शित “संजू” (२०१८) या चित्रपटात ते आपण पाहिलेच. त्या काळात त्याची भूमिका असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीवर परिणाम झालाच. अनेक शूटिंग शेड्युल गडबडली.
असाच एक चित्रपट रामगोपाल वर्मा निर्मित व दिग्दर्शित “नायक“. आता चित्रपटाचे नाव “नायक” म्हणता क्षणीच अनेकांच्या डोळ्यासमोर एस. शंकर दिग्दर्शित “नायक” (२००१) हा एका दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची रिमेक असलेला चित्रपट आला असेलच. त्यात अनिल कपूर, रानी मुखर्जी, सुश्मिता सेन, अमरीश पुरी, परेश रावल इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या “नायक”चा त्या “नायक” शी फक्त आणि फक्त नावापुरताच संबंध. एकाच नावाचे दोन वा तीन चित्रपट काही वर्षांच्या अंतराने येतातच. पण यातला पहिला “नायक” आलाच नाही. हैदराबादला जवळपास वीस दिवसांचे शूटिंग होवूनही तो चक्क “डब्यात” बंद करावा लागला…..
तुम्हालाही माहित्येय, एका जबरदस्त सुपर हिट चित्रपटानंतरचा त्याच दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता बरे असेल याची चित्रपटसृष्टी, फिल्म दीवाने आणि मिडिया अशा सगळ्यानाच भारी कुतूहल असतेच असते. कारण, तो लोकप्रिय चित्रपट पुन्हा पुन्हा फोकसमध्ये असतो. पाहिला जात असतो. कधी त्यातील सर्वकालीन लोकप्रिय गीत संगीत व नृत्यामुळे असतो, तर काही चित्रपट त्यातील टाळ्या व शिट्ट्या वसूल करणाऱ्या डायलॉगबाजीने सिंगल स्क्रीन थिएटर्स ते ओटीटी असा प्रवास करण्यात यशस्वी ठरले.
रामगोपाल वर्माला हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल रोवण्यात यशस्वी ठरलेल्या आणि उर्मिला मातोंडकरला ‘स्टार’ केलेल्या ‘रंगिला‘ (१९९५) नंतरचा चित्रपट कोणता याचे असेच भारी कुतूहल होते. ‘रंगिला’ आजही तारुण्यात आणि सुपर हिट आहेच म्हणा. तनहा तनहा यहां पे जिना गाणे कम्माल आहे.
रामू मूळचा दक्षिण भारतातील तेलगू, तमिळ चित्रपटाचा दिग्दर्शक. तो ‘शिवा‘ (१९८९) पासून हिंदीत आला. उर्मिलाने झाकोळ, मासूम अशा चित्रपटातून बालकलाकार म्हणून करियर सुरु केली आणि एन. चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिंह‘ (१९९१) पासून ती नायिका झाली. ती नायिका म्हणून येताच कोणी तरी म्हटलं, “दुसरी माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीत अवतरली.” अहो, उर्मिला मातोंडकरला स्वतःची चांगली ओळख आहे. गुणवत्तेत ती माधुरीपेक्षा कायमच उल्लेखनीय ठरलीय. रामगोपाल वर्माच्या “द्रोही” (१९९२. हाच चित्रपट तेलगू भाषेत “अंथम” या नावाने बनला)मध्ये उर्मिला मातोंडकरने भूमिका केली. त्याच वेळेस रामूने नागार्जुन, श्रीदेवी व विशेष भूमिकेत रजनीकांत यांना एका तेलगू भाषेतील चित्रपटाची कल्पना सुचवली. ती थीम तिघांनाही फारशी रुचली नाही. रामूने त्याच थीमवर “रंगीला” बनवला… आणि उर्मिला मातोंडकर स्टार झाली.
‘रंगीला’च्या यशाने ही दिग्दर्शक व अभिनेत्री अशी जोडी हिट झाली. दिग्दर्शक व कलाकार अशा सुपर हिट जोड्या अनेक. राज कपूर व नर्गिस, विजय आनंद व देव आनंद, गुरुदत्त व वहिदा रेहमान, शक्ती सामंता व राजेश खन्ना, मनमोहन देसाई व अमिताभ बच्चन, डेव्हिड धवन व गोविंदा वगैरे वगैरे ‘रंगीला’नंतर “दौड” (Daud) (रिलीज २२ ऑगस्ट १९९७) आला. आता याच आठवड्यात त्याला सत्तावीस वर्षे पूर्ण झाली….
‘दौड’च्या आगमनाचे नगारे खूप अगोदरपासून वाजू लागले याला काही कारण होते. महत्वाचे कारण होते, संजय दत्त. मुंबई बाॅम्बस्फोटातील एक आरोपी म्हणून त्याला नव्वदच्या दशकात दोनदा अटक झाली. काही महिने तो गजाआडच होता. नेमके सांगायचे तर, १९ एप्रिल १९९३ रोजी त्याला अटक झाली आणि काही महिन्यानंतर त्याची सुटका झाली. आता रामूनेच संजय दत्त, उर्मिला मातोंडकर, अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांना घेऊन ‘नायक’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले.
पण संजूबाबाला १९९५ च्या डिसेंबरमध्ये पुन्हा अटक झाल्याने रामूने तो चित्रपट गुंडाळला. करणार काय म्हणा? “घरत गणपती” या चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव व अश्विनी भावे यांच्या सविस्तर आणि दिलखुलास मुलाखतीचा योग येताच दोघांकडेही “नायक” चा विषय काढताच दोघेही छान आठवणीत गेले. या चित्रपटात संजय दत्त अंडरवर्ल्ड डाॅन असतो तर अजिंक्य देव पोलीस इन्स्पेक्टर. बरीच नाट्यमय गोष्ट होती. पण संजय दत्तला पुन्हा अटक होताच हा चित्रपट मध्येच बंद पडला.
संजूबाबाची आता एप्रिल १९९७ ला दुसर्यांदा सुटका होताच तो पुन्हा कार्यरत झाला. रामूला अतिशय वेगाने ‘दौड’ बनवता आला. कारण, त्याने आपणच दिग्दर्शित केलेल्या ‘kshana kahanan‘ ( १९९१) या तेलगू चित्रपटाची ही रिमेक केली. यात व्यंकटेश, श्रीदेवी (रामूची ही आवडती अभिनेत्री) आणि परेश रावल यांच्या भुमिका होत्या. रामूने पेपरवर्क तयार असल्याने दोन शेड्युलमध्येच “दौड” (Daud) पूर्ण करुन २२ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदर्शितही केला देखिल. मुंबईत मेन थिएटर न्यू एक्सलसियर होते आणि मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना रसिक प्रेक्षकांसोबत फर्स्ट डे फर्स्ट शोलाच तो दाखवला.
‘दौड’ (Daud) पडद्यावर येईपर्यंत रसिकांवर ‘रंगिला’ची मोहिनी होती. तसच काही भन्नाट मनोरंजन पाह्यला मिळेल असे वाटले. पण तसे झालेच नाही. संपूर्ण चित्रपटात संजय दत्त आणि उर्मिला धावत होते हे खरे. अगदी शहरातून, जंगलातून धावले. त्यात स्पेशल इफेक्ट्सही खूप. पण चित्रपट रसिक याच्याशी कनेक्ट झालेच नाहीत. चित्रपट फ्लाॅप ठरला. चौथ्याच दिवशी करंट बुकिंगची खिडकी उघडली. अरेरे. म्हणजेच चित्रपट फ्लाॅप.
चित्रपटात मूळ चित्रपटातील परेश रावल तसेच मनोज वाजपेयी, नीरज वोरा, सुमुखी पेंडसे इत्यादींच्या भूमिका आहेत. पटकथा कानन अय्यर, संजय छेल आणि रामू यांची आहे. जमेची बाजू होती ती, मेहबूब यांच्या गीताना ए. आर. रहमानचे संगीत. ओ भंवरे (पाश्वगायक आशा भोसले आणि येसूदास), शब्बा शब्बा (रानू मुखर्जी, दक्षिणेकडील स्वरलथा, सोनू निगम आणि नीरज वोरा) ही गाणी युवा पिढीला आवडली. एम टीव्ही कल्चर, वाढता पाश्चात्य प्रभाव हा तो नव्वदच्या दशकातील काळ होता.
‘दौड’ पाहिल्यावर उर्मिला मातोंडकरच्या मुलाखतीचा योग आला (तोपर्यंत चित्रपट पाहून मग मुलाखती घेतल्या जात, म्हणूनच त्या छान रंगत. उलटसुलट मुद्दे व गुद्दे त्यात येत) तिने एक वेगळा मुद्दा मांडला, हा जाॅनर आपल्याकडे नवीन आहे, विदेशात अशा प्रकारचे चित्रपट निर्माण होतात आणि महत्वाचे म्हणजे, ‘रंगीला’ डोक्यात ठेवून ‘दौड’ पाहण्याची चूक अनेकांनी केली. हे दोन्ही चित्रपट पूर्णपणे स्वतंत्र आहेत…..
=========
हे देखील वाचा : मैने प्यार किया….लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण छान होती…
=========
उर्मिलाच्या मताशी मी आजही सहमत आहे. तरीही माझ्या मनात कायम एक प्रश्न आहेच, रामगोपाल वर्माचा “नायक” पडद्यावर आला असता तर? त्याची नक्कीच गल्ला पेटीवर हाऊसफुल्ल गर्दीत घौड “दौड” झाली असती..चित्रपटाच्या जगात यश हेच एकमेव चलनी नाणे आहे म्हटल्यावर असे अनेक चित्रपट महत्वाचे.