‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ब्रिटिश सैनिकांना पाहून सचिनदा का घाबरले?
कलाकारांचे चित्रपटांच्या बाहेरची किस्से देखील तितकेच मनोरंजक असतात संगीतकार सचिन देव बर्मन (Sachin Dev Burman) यांच्या बाबतचा एक किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. एकदा संगीतकार सचिन देव बर्मन आपले बंगाली मित्र संगीतकार नोचिकेत घोष यांच्यासोबत रेल्वेने प्रवास करत होते. हा काळ साधारणतः चाळीस च्या दशकातील होता. त्यावेळी जगभर दुसऱ्या महायुद्धाचा धुमाकूळ चालू होता. जापान ने होंगकॉंग आणि चीनवर आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. त्याचा ताबा घेतला होता. ब्रिटिश सैनिक जपानच्या विरुद्ध कारवाई करत होते. दोस्त राष्ट्र विरुद्ध जपान ,जर्मनी आणि इटली असा तो संघर्ष होता. ब्रिटिश सैनिक जगभर जापानी/चीनी लोकांना शोधून त्यांना बंदिवासात टाकत होते किंवा मारून टाकत होते. या काळातील हा किस्सा आहे.
सचिनदा बरोबर आपल्या मित्रासोबत रेल्वे प्रवास करत होते. त्यांना हावडा येथे जायचे होते. हावडा यायला आणखी दोन तास अवधी होता. तितक्यात त्यांच्या बोगी मध्ये काही ब्रिटिश सैनिक चढले. प्रत्येकाच्या हातामध्ये गन होत्या. ब्रिटिशांना पाहून सचिन देव बर्मन घाबरले. त्यांनी तोंडावर चादर घेऊन गुडूप होवून लपून बसले. ते प्रचंड घाबरले होते. नचिकेत घोष यांना हा सगळा प्रकार नवीन होता. त्यांना कळेना सचिनदा का घाबरले आहेत? थोड्या वेळाने जेव्हा हावडा स्टेशन जवळ येऊ लागले तेव्हा त्यांनी सचिनदाला उठवले आणि सांगितले “हावडा स्टेशन येत आहे. आपल्याला उतरायचे आहे.” त्यावर चादरीच्या आतूनच सचिनदादा यांनी विचारले “ब्रिटिश सैनिक गेले का?” तेव्हा नचिकेत घोष म्हणाले,” नाही ते अजून आहेतच.” हे ऐकून सचिनदा आणखी घाबरून अंगाचे मुटकुळे करून चादरीच्या आतच लपून राहिले! हावडा स्टेशन आले. बोगीतील सर्व ब्रिटिश पलटण खाली उतरले. नचिकेत घोष यांनी सांगितले,” आता सर्व सैनिक उतरले आहेत. चला आपण थोडं पटकन उतरूयात.” दोघेजण लगेच खाली उतरले. ब्रिटिश सैनिक नजरे आड गेल्यानंतर ते दोघे प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडले.! त्या नंतर नचिकेत घोष यांनी सचिनदा यांना विचारले,” तुम्हाला ब्रिटिशांना घाबरायचं एवढं कारण काय?” त्यावर सचिन देव बर्मन (Sachin Dev Burman) म्हणाले,” तुला माहीतच आहे माझा जन्म त्रिपुरातील. माझी आई मणिपूरची. त्यामुळे जन्मापासूनच माझे डोळे खूप बारीक आहे. अनेकदा लोक मला जापनीज किंवा चायनीज समजतात. सध्या जापनीज आणि चायनीज लोकांवर ब्रिटिशांची करडी नजर आहे. मी असं ऐकलं आहे ते या लोकांना बंदीवासात टाकतात किंवा गोळ्या घालून ठार करतात. म्हणून मी तोंडावर पांघरून घेवून चादरीच्या आत लपून बसलो होतो!” त्यावर नचिकेत जोरजोरात हसले आणि म्हणाले,” तसं काही होणार नाही. चला आता. मी आहे ना.” असं म्हणत दोघे हावडा स्टेशनच्या बाहेर पडले!
=========
हे देखील वाचा : राजेश खन्नाचा ‘हा’ शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा
=========
जाता जाता थोडंसं सचिन देव बर्मन यांच्याबद्दल. सचिन देव बर्मन (जन्म : १ ऑक्टोबर १९०६) हे त्रिपुरा येथील एका राजघराण्यातील राजपुत्र. पण त्यांचा कल पहिले पासूनच संगीताकडे होता. वडिलांची इच्छा नसताना ते या क्षेत्रात आले. बंगाली आणि हिंदी सिनेमातील चित्रपटांना संगीत देताना त्यांनी एक कलात्मक उंची गाठली. हिंदीतील तर ते आघाडीचे संगीतकार होते. संगीता सोबतच त्यांनी काही चित्रपटांमधून गाणी देखील गायली. सचिनदा यांची १४ हिंदी आणि १३ बंगाली गाणी गायली आहेत. सुन मेरे बंधू रे, सफल होगी तेरी आराधना, मेरी दुनिया है माँ आणि मेरे साजन है उस पार ही त्यांची गाजलेली हिंदी गाणी. सचिन देव बर्मन यांना भारत सरकारच्या वतीने १९६९ साली पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांना १९५८ साली संगीत नाटक अकादमी अवॉर्ड तसेच १९६४ साली संत हरिदास पुरस्कार मिळाला. दोन वेळेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. (अभिमान आणि जिंदगी जिंदगी) त्यांना त्यांनी संगीत दिलेल्या दोन चित्रपटाना (अभिमान आणि टॅक्सी ड्रायव्हर) फिल्म अवार्ड मिळाले तर पाच वेळा फिल्म फेअर चे नामांकन मिळाले.(सुजाता, गाईड,आराधना,तलाश, प्रेमनगर ) ख्यातनाम संगीतकार राहुल देव बर्मन हे सचिन देव बर्मन (Sachin Dev Burman) यांचे पुत्र देव आनंद यांची कला कारकीर्द घडवण्यामध्ये सचिनदा यांचा मोठा वाटा आहे.