सलमान खान ने जुही चावला सोबत एकही चित्रपट का केला नाही?
एकाच कालखंडात चित्रपटात काम करीत असताना अभिनेता अभिनेत्रीनी एकमेकांसोबत काम न करणे हा एक वेगळा चर्चेचा विषय असतो. आणि त्यातही हे कलाकार आघाडीचे असतील तर जास्तच. हा सिलसिला पूर्वीपासून चालत आला आहे. दिलीप कुमार आणि नूतन तसे समकालीन पण त्यांनी उमेदीच्या काळात कधीच एकत्र भूमिका केल्या नाहीत. रमेश सैगल यांनी या दोघांना घेवून ‘शिकवा’ हा चित्रपट सुरु केला होता पण पूर्ण झाला नाही. उतार वयात हे दोघे सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ या सिनेमात आले. शम्मी कपूर आणि वहिदा रहमान या दोघांचा देखील एकत्र काम करण्याचा योग कधी जुळून आला नाही. दिलीप कुमार आणि आशा पारेख हे देखील कधीच एकत्र आले नाही. राजेश खन्ना आणि जया भादुरी यांचा एकत्र चित्रपट नाही. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘बावर्ची’ या चित्रपटात दोघे एकत्र आहेत; पण नायक नायिका म्हणून नाही. अमिताभ आणि रीना रॉय तरी नायक नायिका म्हणून कुठे एकत्र आले?
नव्वदच्या दशकामध्ये सुपरहिट असलेले सलमान खान आणि जुही चावला हे तरी कधी एकत्र आले? या दोघांनी एकत्र न येण्याची काय कारणे आहेत? खरंतर या दोघांनी एकत्र काम केलं असतं तर चित्रपट नक्कीच हिट झाला असता. कारण दोघांकडेही फॅन फॉलोवर्स भरपूर होते. पण योग जुळून आला नाही. जुही चावला (Juhi Chawla) १९८४ सालची मिस इंडिया होती. त्यामुळे सहाजिकच तिचे चित्रपटात येणे स्वाभाविक होते. १९८६ सालच्या मुकुल आनंद दिग्दर्शित ‘सल्तनत’ या चित्रपटात ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली. परंतु यातील तिची भूमिका फारशी लक्षात कोणी घेतली नाही. यानंतर मंसूर खान यांचा ‘कयामत से कयामत तक’ हा तिचा पहिला सुपरहिट सिनेमा. दुसरीकडे सलमान खान १९८८ साली आलेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकला. त्याचीदेखील नोंद कोणी घेतली नाही. परंतु सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या १९८९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तो क्लिक झाला.
पहिल्या एकेक फ्लॉप सिनेमाचा इतिहास असलेल्या या दोघांचाही दुसरा सिनेमा बम्पर हिट होता. तरी हे दोघे एकत्र कां आले नाहीत? याची कारणे अनेक सांगितले जातात. १९८८ साली जुही चावला चा सुपरहिट सिनेमा ‘कयामत से कयामत तक’ प्रदर्शित झाला आणि ती रातोरात मोठी स्टार बनली. याच काळात दिग्दर्शक दीपक बाहरी ‘कुर्बान’ या चित्रपटासाठी जुही कडे आले होते. सुनील दत्त, कबीर बेदी, रोहिणी अट्टंगडी अशी मोठी स्टार कास्ट यात होती. चित्रपटाचा नायक म्हणून त्यांनी सलमान खानला फायनल केले होते. परंतु जुहीने (Juhi Chawla) आपण न्यू कमर सोबत काम करणार नाही असे स्पष्ट सांगितले. कारण तोवर सलमानचा ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित व्हायचा होता. जुहीने (Juhi Chawla)या वेळी पसंती दिली आमिर खानच्या नावाला. त्यामुळे दीपक बहारी यांना प्रश्न पडला कारण त्यांनी सलमान खानला शब्द दिला होता. त्यांनी जूहीचा विचार सोडून दिला. पण कर्णोपकर्णी ही बातमी सलमान खान पर्यंत पोहोचलीच. त्याला खूप वाईट वाटले. जुही चावलाने त्याला नकार दिला ही गोष्ट त्याने खूप पर्सनली घेतली. आणि त्याच क्षणी मनोमन ठरवले हिच्या सोबत पुन्हा कधीच काम करायचे नाही.
यथावकाश सलमान खान चा ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित झाला आणि सलमान खान वर लोकप्रियताचा शिखरावर आरूढ झाला. संपूर्ण भारतभर या चित्रपटाचे जंगी स्वागत झाले. सलमान खानकडे चित्रपटांचा पाऊस पडू लागला. दरम्यान दीपक बहारी यांनी आता सलमान खानची नायिका म्हणून ‘कुर्बान’ सिनेमा साठी आयेशा झुल्का हिला सिलेक्ट केले आणि चित्रपट पूर्ण केला. हा सिनेमा यशस्वी ठरला. पुढे सलमान खानच्या हिट चित्रपटांची रांगच लागली. तिकडे समांतर पणे जुही चावला (Juhi Chawla) देखील रसिकांच्या दिलाची राणी बनली होती. तिचे सिनेमे देखील एका पाठोपाठ हिट ठरत होते.
======
हे देखील वाचा : करिश्मा कपूरच्या पहिल्या चित्रपटाचा नायक हरीश आठवतो कां?
======
या काळात अनेक निर्मात्यांनी सलमान आणि जुही चावला यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण सलमान खानने त्याचा झालेला अपमान लक्षात ठेवला होता आणि त्याने प्रत्येक वेळी तिच्या सोबत काम करणारे करायला तो नाकारत होता. काळ कुणासाठी थांबत नाही. नंतर जुहीने जय मेहता सोबत लग्नगाठ बांधली आणि ती रुपेरी पडद्यापासून दूर गेली. (१९९७ साली एका चित्रपटांमध्ये सलमान आणि जुही एकत्र आले होते चित्रपट होता दिवाना मस्ताना. यात अगदी काही मिनिटाची भूमिका सलमानने केली होती!) पत्रकारांनी बऱ्याचदा या दोघांना याबाबत छेडले असता दोघांनी याबाबतची निरनिराळी उत्तरे दिली. मध्यंतरी बिग बॉसच्या सेटवर जुही चावला तिच्या एका सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आली असताना, या कार्यक्रमात जुही(Juhi Chawla) म्हणाली ,”माझ्या जनरेशनच्या प्रत्येक अभिनेत्रीने तुझ्या सोबत काम केले आहे. फक्त मीच एकटी अभिनेत्री आहे जिने तुझ्या सोबत काम केलेले नाही!” तेंव्हा सलमान खानने तिला सुरुवातीला दिलेल्या नकाराची आठवण करून दिली. त्यावर जुहीने,” मी आता तुझ्यासोबत काम करायला तयार आहे” असे सांगितले. त्यावर सलमान खानने,” आता मी तुझ्यासोबत काम करू शकतो पण तुला चित्रपटात माझ्या आईची भूमिका करावी लागेल!” असे सांगून आपल्या अपमानाचा तब्बल पंचवीस तीस वर्षानंतर सणसणीत बदला घेतला!