आदिपुरुष बघून रामानंद सागर यांच्या रामायणाची का आठवण काढली जातेय!
प्रभास आणि क्रीती सनन यांची मुख्य भूमिका असेलला अन ओम राउत यांनी दिग्दर्शित केलेला आदिपुरुष सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची सकारात्मक चर्चा होण्याऐवजी चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर टीका होतांना बघायला मिळते. मूळ रामायणाच्या पात्रांना न्याय न देता रंगवलेली भडक पात्रे, चित्रपटाचे भडक अन असंवेदनशील संवाद यामुळे हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला नाही. एकीकडे या चित्रपटावर टीका होत असतानाच रामानंद सागर यांनी पडद्यावर उतरवलेल्या रामायणाची आठवण लोक काढत आहेत. रामानंद सागर यांनी त्या काळातदेखील केवढ्या प्रभावीपणे रामायण पडद्यावर उतरवली होती याची आठवण काढत लोकं त्यांचं कौतुक करत आहेत.
चित्रपट दिग्दर्शनातून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी रामायणच्या माध्यमातून टेलेव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवले. मालिकेच्या माध्यमातून त्यांनी इतिहास घडवला होता. मालिका प्रदर्शित होण्याच्या काळात मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. मालिका दूरदर्शनवरून प्रदर्शित केली जायची, मालिका प्रदर्शनाच्या वेळेला घरातील अख्ख कुटूंब टीव्हीसमोर बसून ही मालिका बघायचं. मालिका सुरु असतांना त्या काळी रस्ते ओस पडायचे, असं सांगितलं जातं. मालिकेचे एकूण ७८ भाग प्रदर्शित केले गेले. मालिकेची लोकप्रियता एवढी होती की मालिका संपल्यानंतर रामानंद सागर यांनी लव-कुशची गोष्ट सांगावी अशी लोकांनी त्यांना विनंती केली. परंतु रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी त्यास नकार दिला.
हनुमानाचं संजीवनी बुटी उचलून आणणं, पुष्पक विमानाचं उड्डाण यांसारखे प्रसंग चित्रित करण्यासाठी स्पेशल इफेकट्सचा वापर करण्यात आला होता. स्पेशल इफेक्ट्स कसे वापरले जावे याचे बरेच संशोधन रामानंद सागर यांनी केले होते. यासंदर्भात त्यांनी किंग कॉंगच्या निर्मात्यांची भेट घेवून त्यांच्याकडून स्पेशल इफेक्ट्सचे गणित जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. स्पेशल इफेक्ट्स संदर्भात अनेक पुस्तकांचे त्यांनी मार्गदर्शन घेवून शेवटी रामायणात हे स्पेशल इफेक्ट्स वापरण्याचा निर्णय घेतला.
मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान अनेक ज्युनियर कलाकारांची गरज भासत असे. गावागावात दवंडी पिटवून लोकांना बोलावून घेतले जायचे. जवळपास ५५० पेक्षा जास्त दिवस मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. मालिकेत काम करणाऱ्या कलाकरांना तेव्हा अफाट प्रसिद्धी मिळाली होती. रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांची त्या काळी आणि आताही लोक पूजा करतात. रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांनी साकारली होती. मालिकेतील रावणाच्या मृत्युनंतर त्यांच्या गावातील लोकांनी एक दिवसाचा दुखवटा पाळला होता. गुजरात, चेन्नई अशा ठिकाणी ही मालिका चित्रित करण्यात आली होती.
=======
हे देखील वाचा : ‘आदिपुरुष’ मध्ये शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल!
=======
रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी ऐंशीच्या दशकात रामायण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारले होते. रामायणातील एक एक पात्र त्यांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत केलं होतं. ओम राउत यांनी आदिपुरुषमध्ये रामायणात बऱ्याच प्रकारे छेडछाड करत त्याला हॉलीवूड टच देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा चित्रपट बघून लोक रामानंद सागर यांच्या रामायणची आठवण काढत आहेत.