Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

नौशाद यांना किशोर कुमार गायक म्हणून का मान्य नव्हते
प्रत्येक संगीतकाराचा एखादा आपला आवडता गायक असतोच. सचिन देव बर्मन यांना किशोर कुमार आवडायचा शंकर जयकिशन यांना मुकेश तर नौशाद यांना रफी! नौशाद यांनी किशोर कुमारचा स्वर आपल्या संगीतात वापरला नाही त्यांना किशोर कुमार हा गायक म्हणून कधी आवडला नाही. ते त्याला गायक म्हणून देखील मानायलाच तयार नव्हते. जसे संगीतकारांचे आवडते गायक होते तसेच त्यांचे नावडते गायक देखील होते. अनिल विश्वास यांना रफीचा स्वर आवडत नव्हता. सचिन देव बर्मन यांनी मुकेशचा स्वर अगदी अपवादानेच आपल्या संगीतात वापरला. तर नौशाद यांनी किशोरचा स्वर अक्षरशः वाळीत टाकला! किशोर कुमारच्या स्वराबद्दल त्यांच्या मनात एक अढीच निर्माण झाली. ती कशामुळे निर्माण झाली माहित नाही, पण किशोर कुमार त्यांचा नावडता गायक होता हे नक्की. नौशाद यांच्या किशोरकुमारच्या दुस्वासाचे याचे दोन किस्से मशहूर आहेत. (Kishor Kumar)
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला नौशाद यांच्या संगीताची जादू सरत होती तर किशोर कुमारचा स्वर हा संपूर्ण बॉलीवूडचा प्राण स्वर बनला होता. प्रत्येक अभिनेता, प्रत्येक संगीतकार किशोर कुमारचा स्वर आपल्या संगीतामध्ये वापरत होता. नौशाद यांना नाईलाजाने एका चित्रपटामध्ये किशोर कुमारचा (Kishor Kumar) स्वर वापरावा लागला. चित्रपट होता राजेंद्रकुमार आणि हेमा मालिनी यांचा ‘सुनहरा संसार’. या सिनेमाचे दिग्दर्शक होते ए सुब्बाराव.

हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या आग्रहाने नौशाद यांना किशोर कुमार यांचा स्वर वापरावा लागला. या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात एक गाणे रेकॉर्डिंग केले पण त्यांच्या मनात किशोरचा स्वर वापरायचा हे अजिबात नव्हतेच पण निर्मात्याचा आग्रह होता. पण पुढे गंमतच झाली हे गाणे रेकॉर्ड तर झाले निर्मात्यापर्यंत पोचलेच नाही. ज्यावेळी निर्मात्यानी गाण्याची मागणी केली त्यावेळी त्यांनी हे गाणे नीट रेकॉर्ड झालेच नाही, पुन्हा रेकॉर्ड करावे लागेल असे सांगितले. शेवटी या गाण्याशिवाय चित्रपट प्रदर्शित झाला! (Kishor Kumar)
चित्रपटाच्या सुरुवातीच्या क्रेडिट्समध्ये देखील कुठेही किशोर कुमारचे नाव नाही. एच एम व्ही कंपनीने मात्र या गाण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे ‘सुनहरा संसार’ या चित्रपटाच्या एल पी रेकॉर्डमध्ये हे गाणे आहे. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल होते ‘हॅलो क्या हाल है..’ आज जेव्हा तुम्ही हे गाणे ऐकता तेव्हा ते गाणे खूप चांगलं रेकॉर्ड झाले होते असे तुमच्या लक्षात येईल. पण नौशाद यांच्या मनात किशोर कुमार बद्दल अढी असल्याने ते गाणे चित्रपटात वापरूच दिले नाही.(Kishor Kumar)
दुसरा किस्सा १९८४ सालचा आहे. त्यावेळी मध्य प्रदेश सरकारच्या वतीने लता मंगेशकर पुरस्कार द्यायचा होता. यासाठी त्यांनी एक ज्युरी कमिटी तयार केली होती. या कमिटी मध्ये गायक पं कुमार गंधर्व, चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपाल कृष्णन, रंगकर्मी मोहन प्रकाश, चित्रपट दिग्दर्शक मणी कौल संगीतकार नौशाद यांचा समावेश होता. आणि या कमिटी चे प्रमुख होते जेष्ठ पत्रकार प्रितिश नंदी. या कमिटीने त्यावर्षीचा पुरस्कार किशोर कुमारला द्यायचे ठरवले. किशोर कुमारची लोकप्रियता त्यावेळेला ‘पीक’ वर होती. किशोर कुमार हा मध्य प्रदेश मध्ये जन्माला आलेला होता. त्यामुळे ज्युरी मेम्बर्स ने किशोरला हा पुरस्कार द्यायचा निर्णय घेतला. किशोर कुमार चे नाव चर्चेला आले त्यावेळी ताबडतोब नौशाद यांनी विरोध प्रदर्शित करत ते बैठकीतून बाहेर निघून गेले आणि ,”तुमचा हा निर्णय मला मान्य नाही.” असे सांगितले. (Kishor Kumar)
=======
हे देखील वाचा : या’ गाण्याचे अर्धे रेकॉर्डिंग पाकिस्तानात तर अर्धे भारतात झाले !
=======
लक्षात घ्या यांच्या मनातील किशोर कुमार (Kishor Kumar) बद्दलची अढी इतक्या वर्षानंतर देखील कायम होती. पण समितीमधील बाकी सगळे सदस्य किशोर कुमारच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यामुळे त्यावरचा लता मंगेशकर पुरस्कार किशोर कुमार यांना देण्यात आला. पत्रकार प्रीतीश नंदी यांनी स्वतः या बाबत नंतर जाहीर सांगितले होते. एखाद्याचा स्वर आवडत नाही, गाणे आवडत नाही इथपर्यंत ठीक आहे पण इतका टोकाचा दुस्वास योग्य होता कां?