महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
पत्रकारांसाठी खास शो आता नको.. असं का वाटतं निर्मात्यांना?
एक काळ असा होता की, सिनेमे प्रदर्शित व्हायची वाट जसे प्रेक्षक पाहात होते, तशीच त्याला खांद्याला खांदा लावून आणखी एका उत्सुकतेनं मनात घर केलेलं असायचं. ती उत्सुकता असायची त्याच सिनेमांच्या समीक्षेची. शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित झाला की, लगोलग जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये शुक्रवारी किंवा शनिवारी त्या त्या सिनेमाबद्दल लिहून यायचं. सिनेमाच नव्हे, तर नाटकंही होती यात. (Press show of Movies)
अनेक मोठ्या समीक्षकांचा दरारा असे. सिनेमा रिलीज होतानाच आता ही मंडळी काय लिहितायत याबद्दल संबंधित दिग्दर्शकाला आणि कलाकारांना उत्सुकता असे. त्यावेळी वाचकांचा विश्वास या समीक्षेवर इतका असायचा की, या समीक्षेतून सिनेमा चालायचा किंवा पडायचा. पण आता काळ बदलला आहे. जुनी फळी जाऊन नवी फळी आली आहे… दोन्ही बाजूंना. म्हणजे जसे नवे फिल्ममेकर, निर्माते, कलाकार आता इंडस्ट्रीत आलेत. तसे जुने पत्रकारही आता समीक्षेतून बाहेर पडले आहेत. त्यांची जागा नव्या लिहित्या हातांनी घेतली आहे. या दोन्हीत महत्वाचा भाग आहे तो सोशल मीडियाचा आणि यू ट्यूबसारख्या साईट्सचा. या सामाजिक माध्यमांनी अनेक गोष्टी बदलल्या आहेत.
हा विषय आत्ता यायचं कारण असं की, नुकताच टाईमपास ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमाचा प्रेस शो निर्मात्यांनी आयोजित केला नव्हता. प्रेस शो म्हणजे मुंबईतल्या रिव्ह्यू करणाऱ्या पत्रकारांसाठी त्या सिनेमाच्या विशेष खेळाचं आयोजन होतं. सर्वसाधारणपणे हा प्रेस शो चित्रपट रिलीज होण्याआधीच्या बुधवारी किंवा गुरुवारी असतो. अपेक्षा अशी असते की, संबंधित पत्रकारांनी हा चित्रपट बघावा आणि या सिनेमाचा चांगला रिव्ह्यू लिहावा जेणेकरून ‘माऊथ पब्लिसिटी’ होऊन त्याचा थेट फायदा सिनेमाला होईल.
टाईमपास ३ बद्दल बोलायचं तर, या सिनेमाची हाईप चांगली होती. कारण, चित्रपट रवी जाधव दिग्दर्शित होता. यापूर्वीच्या दोन्ही ‘टाईमपास’नी चांगला व्यवसाय केला होता. त्याचं गुडविल होतं. शिवाय या नव्या सिनेमात प्रथमेश परब, वैभव मांगले आणि ह्रता दुर्गुळे अशी कास्ट होती. सिनेमाचा ट्रेलर पाहता हा सिनेमा मसालापट आहे हे उघड होतं. ही उत्सुकता पत्रकारांमध्येही होती. पण टाईमपास ३ च्या प्रेस शोचं आयोजन न झाल्यामुळे पत्रकारविश्वात अदृश्य नाराजी पसरली. ते साहजिकही होतं. आता इथे मुद्दा टाईमपास ३ चा नाहीये. यापूर्वी अनेक सिनेमाचे प्रेस शो झालेले नाहीत. हा सिनेमा केवळ एक निमित्त आहे. त्यानिमित्ताने हा लेख लिहायला घेतला इतकंच. (Press show of Movies)
मुद्दा असा आहे की, त्या चित्रपटाच्या निर्मात्याला प्रेस शोचं आयोजन करावं असं का वाटत नाही? सर्वसाधारणपणे या प्रेस शोचं आयोजन निर्माताच करत असतो. तो आपल्या चित्रपटाच्या टीमसोबत चर्चा करुन हा निर्णय घेत असतो. कारण, प्रेस शो म्हणजे खर्चही असतो. थिएटरचं बुकिंग, पत्रकारांच्या खानपानाचा खर्च वगैरे वगैरे. अर्थात एक शो ठेवणं हे निर्मात्यासाठी जड नाही. कारण, त्या बदल्यात अनेक माध्यमांचे प्रतिनिधी येऊन ते चित्रपट पाहून आपआपल्या पेपरमध्ये, चॅनलला त्याची समीक्षा करणार असतात. त्या सिनेमाच्या रिव्ह्यूला दिलेली जागा.. त्याची पब्लिसिटी असं एकूण गणित मांडलं तर निर्माता फायद्यात असतो. पण कधी? सिनेमाचे चांगले रिव्ह्यू आले तर!
अलिकडे दर्जेदार चित्रपट असलेले अनेक निर्मातेही प्रेस शोचा बेत रद्द करताना दिसतायत. याबद्दल इंडस्ट्रीतल्याच लोकांशी बोलल्यानंतर एक प्रश्न तेच विचारतात, तो असा की आता समीक्षा लिहिणारे आहेत किती? आणि जे लिहितात ते काय लिहितात हे माहीतीये आम्हाला. बहुतांश माध्यमांमध्ये सिनेमाचा रिव्ह्यू करायचा की नाही, ते निर्मात्याने त्या पेपरला वा चॅनलला सिनेमाच्या मार्केटिंगसाठी किती पॅकेज दिलं आहे त्यावर ठरतं. म्हणजे सौमित्र नावाच्या पेपरसाठी तमुक नावाच्या सिनेमाच्या निर्मात्याने अमुक लाखाचं पॅकेज दिलं असेल, तरच रिव्ह्यू करायचा, नाहीतर नाही. आता निर्मात्याने पॅकेज दिलं असेलच, तर समीक्षकालाही तसाच ‘लाख’मोलाचा गोडसर रिव्ह्यू द्यावा लागतो.
अलिकडे अनेक समीक्षकांवर असं अदृश्य बंधन आलं आहे. दुसरीकडे छोट्या छोट्या यू ट्यूब चॅनल्सवर समीक्षा करणाऱ्या मुलांवर एकतर इंडस्ट्रीचा विश्वास उरलेला नाही. कारण, हा विश्वास कमवावा लागतो. कामात सातत्य ठेवून तो विश्वास मिळवावा लागतो. पण ती वेळ आणि ती मुभा त्यांना दिली जातेच असं नाही. कारण, या मुलांच्या चॅनल्सचं अर्थकारणही याच पब्लिसिटीवर बेतलेलं असतं. अर्थात, प्रमोशन करणं हा एक भाग आहे आणि समीक्षा ही वेगळी बाब आहे. (Press show of Movies)
समीक्षा करण्यात आपली बांधिलकी वाचकांशी/प्रेक्षकांशी असते, हे लक्षात घ्यावं लागतं. पण तसं होतंच असं नाही. परिणामी सगळा प्रकार हा पैशाशी बांधला गेल्यामुळे या रिव्ह्यूमधलं खरं काय खोटं काय, हे काहीच कळेना, असं होत आहे. म्हणूनच मग ज्या सिनेमाचा निर्माता संबंधित पेपरांसाठी किंवा चॅनलसाठी विशिष्ट बजेट बाजूला काढून ठेवत नाही तो म्हणतो नकोच ते रिव्ह्यू. लोकच ठरवू देत काय ते. आणि आता झालं असं आहे, की सिनेमा बघून आल्यानंतर आपआपला ऑनेस्ट रिव्ह्यू प्रेक्षक सोशल मीडियावर टाकतात. सिनेमाच्या डिजिटल मार्केटिंग टिमला तेवढं पुरेसं असतं. त्याला खर्चही फार नसतो.
आता स्थिती आहे ती अशी आहे. अलिकडे समीक्षा असो किंवा सिनेमांच्या इतर काही बातम्या.. हा सगळा मामला पेड पब्लिसिटी या नावाखाली येत असल्यामुळे यात अर्थ असला तरी समीक्षा हा प्रकार निरर्थक होण्याच्या मार्गावर आहे. या सगळ्यात काही चांगले समीक्षकही आहेत आणि तशी माध्यमंही आहेतच. पण त्यांचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे सुक्याबरोबर ओलंही जळण्यासारखं झालं आहे.
चॅनल्सवर २४ तास राजकारण चालू असल्यामुळे तिथे समीक्षेसाठी वेळच नसतो. मग हे प्रेस शो नक्की आयोजित करायचे कुणासाठी हा प्रश्न आहे. दोन-चार जेन्यूईन पत्रकारांसाठी उरलेल्या २० पत्रकारांना आमंत्रित करणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचा प्रकार अलिकडे होतो आहे. अशावेळी ज्याला गरज असेल तो आपणहून सिनेमा बघेल आणि लिहिल त्याला लिहायचं ते असा एक सूर इंडस्ट्रीत उमटू लागला आहे. (Press show of Movies)
सिनेपत्रकार, संपादक, यू ट्यूब चॅनलवरचे सोलो यूट्यूबर्स या सगळ्यांनी इंडस्ट्रीची ही मानसिकता लक्षात घ्यायला हवी. प्रेस शो दाखवला नाही म्हणून वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रेस शो आयोजित न करून जणू संबंधित निर्माता-दिग्दर्शकांनी आपल्या दोन्ही किडण्या काढून घेतल्यात जणू.. असा अविर्भाव आणायची गरज नाही.
कोणता सिनेमा बघायचा हे त्या त्या पेपरवर ठरत असतं. उदाहरणादाखल टाईमपास ३ चा रिव्ह्यू देणं ही त्या पेपर वा चॅनलच्या प्रेक्षकांची गरज असेल, तर ती गरज भागवणं हे त्या पेपरचं आणि समीक्षकाचं काम आहे. मग त्याने तो सिनेमा प्रिमिअरला पाहावा किंवा स्वत: तिकीट काढून. समीक्षकाची बांधिलकी त्याच्या वाचकांशी-प्रेक्षकांशीच असायला हवी. सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी जे कार्यक्रम तयार होतात त्यात मार्केटिंगचं बजेट-पॅकेज आदी मुद्दे यावेत. पण समीक्षा ही त्या पलिकडे आहे. शिवाय ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे. अमुक यांनी चांगला अभिनय केला तमुक यांनी सुमार मुद्दा मांडला.. हे लिहायला सोपं आहे. पण असं लिहिण्यासाठी लेखक म्हणून तो विश्वास आधी आपल्या कामातून.. आचरणातून समोरच्याला वाटला पाहिजे ही जबाबदारी पत्रकार म्हणून आपलीच असायला हवी.
खरंतर समीक्षक आणि इंडस्ट्री यांच्यात ही पारदर्शकता असावी म्हणूनच मी काही वर्षांपूर्वी कलाकार-दिग्दर्शकांसमोर रिव्ह्यू करण्याची पद्धत सुरू केली होती. भारतात असा प्रयोग पहिल्यांदा आपल्या मराठीत होत होता. केके मेननपासून रेणुका शहाणेंपर्यंत अनेकांना हा प्रकार आवडला होता. पण दुर्दैवाने पूर आणि लॉकडाऊन काळात समीक्षाच बंद झाली.
=========
हे देखील वाचा – थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…
=========
सिनेमाच्या समीक्षेबद्दल समीक्षकाचं मत पटणारं असेलच असं नाही. बऱ्याचदा ती मांडलेली मतं अनेकांना न पटणारी असतात.. बऱ्याचदा समीक्षेचा लिखाणाचा मामला तितका जमलेला नसतो.. होतं असं. एखाद्याला समीक्षा आवडणार नाही.. एखाद्याला स्टाईल आवडणार नाही.. हरकत नाही. पण या इसमाने बनचुकी समीक्षा केली आहे, असं कुणी म्हणता कामा नये ही जबाबदारी आपण घ्यायला हवी. (Press show of Movies)
..आणि शेवटचा मुद्दा असा की, ‘कालाय तस्मै नम:’ असं जे आपण म्हणतो तो म्हणजे इतकी वर्षं समीक्षा चालली. पण आता नाही वाटत लोकांना तुम्ही समीक्षा लिहावी. हा काळाचा भाग असू शकतो. कारण सोशल मीडिया हा फार मोठा फॅक्टर सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात आला आहे. याच्या अस्तित्वामुळे आता कुणाचं काही अडत नाही. या सगळ्याचाच आता विचार व्हायला हवा. यात एक नक्की आहे.. जे खरं आहे.. जे आतून आहे.. आणि जे चिंतनातून.. अनुभवातून आलं आहे.. तेच टिकणार आहे. हे इंडस्ट्रीलाही लागू होतं आणि आपल्या सगळ्या पत्रकारांनासुद्धा.