तेजश्री म्हणतेय नो ऍडजस्टमेंट!
मालिकांच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कोणतीही मालिका तिच्या कथानकापेक्षा जास्त गॉसिपमध्ये येते ती त्यातील कलाकारांमुळे. कधी मालिकेतील कलाकारांमध्ये काहीतरी गोडगुपित असल्याची चर्चा होते तर कधी मुख्य कलाकारांच्या सोशल मीडिया पेजवरील पोस्ट आणि फोटोंचा संबंध मालिकेतील त्यांच्या पात्रासोबत जोडून मालिका, ऑफ कॅमेरा टीआरपी खेचत असतात.
तीन वर्षापासून सासू सुनेच्या नात्याचा गोडवा जपत आणि बबड्या कधी सुधारणार हा ऑल टाइम हिट प्रश्न असलेली अग्गंबाई सासूबाई (Aggabai Sasubai) ही मालिका रूपडं बदलून अग्गंबाई सूनबाई (Aggabai Sunbai) या नावाने टीव्हीवर आली. नवं पर्व म्हणत जोरदार प्रमोशन सुरू झाल्यापासून मालिकेच्या नव्या कथेत काय असणार यापेक्षा शुभ्रा साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ही मालिका का सोडली याचीच चर्चा रंगली. अर्थात बबड्या म्हणजे सोहमच्या जागीही नवा चेहरा आला असूनही तेजश्री या मालिकेत का नाही हा प्रश्न सोशल मीडियावरचा जणू हॅशटॅगच बनला होता.
या मालिकेची पारायणं करणाऱ्या नियमित प्रेक्षकांसह तेजश्रीच्या (Tejashree Pradhan) चाहत्यांनी त्यांचे त्यांचे अंदाज बांधून झाले. आता मालिकेचं नवं पर्व सुरू होऊन घडी बसल्यानंतर तेजश्रीने ही मालिका सोडण्याची तिची भूमिका सांगत असताना, मला तडजोड करायची नव्हती म्हणून मी या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचं सांगितलं. झालं ना, दस्तूरखुद्द तेजश्रीनेच मालिका का सोडल्याचं कारण सांगितलं तरीही आता नेमकी तेजश्रीला कशाची तडजोड करावी लागणार होती याचे अंदाज बांधत सोशलमीडियावर कमेंटचा पाऊस सुरू आहे.
पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला एकटीने वाढवणाऱ्या सासूबाईंना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारी सून अशा वन लाइन स्टोरीवर अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना सुरूवातीपासूनच खूप आवडली. खरंतर या मालिकेतील बबड्या हा ग्रे शेड असलेला नायक, परावलंबी मुलाचे सगळे त्रास खपवून घेणारी आई, कल्पनेच्या पलीकडे कागाळ्या करणाऱ्या शेजारणी अशा काही कारणांनी ही मालिका ट्रोलही झाली. पण तरीही या मालिकेत अभिजित राजे आणि आसावरी या आयुष्याची सेकंड इनिंग फुलवणाऱ्या जोडीसोबत सोहम आणि शुभ्रा ही जोडीही गाजली. बबड्या सुधारला, त्याने राजेंना वडील म्हणून स्वीकारले, आसावरी धीट झाली आणि तिने आपले हॉटेल सुरू केले अशा नोटवर या मालिकेचे पहिले पर्व संपणार याचे संकेत दिसत असतानाच अग्गंबाई सूनबाई या नावाने नव्या पर्वाचे प्रोमो झळकायला लागले.
सोहम म्हणजे आशुतोष पत्की आणि शुभ्रा म्हणजे तेजश्री प्रधान यांच्या जागी मात्र अद्वैत दादरकर आणि उमा पेंढारकर यांचे चेहरे दिसले. शिवाय शुभ्रा एका मुलाची आई झाल्याचे दाखवले होते. इथूनच सुरूवात झाली ती तेजश्रीने ही मालिका कंटिन्यू का केली नाही या चर्चेला. मग कुणी म्हटले की तेजश्री लवकरच एका नव्या हिंदी सिनेमात शर्मन जोशीसोबत दिसणार आहे, त्यामुळे तेजश्रीने या मालिकेपासून निरोप घेतला, तर कुणी म्हटलं की ज्याप्रमाणे अनेकांना मालिकेच्या नव्या पर्वाची कथा खटकली तशी ती तेजश्रीलाही खटकली असेल म्हणून तिने थांबायचं ठरवलं असेल. पण आता या जर तरच्या गोष्टींना तेजश्रीनेच पूर्णविराम दिला.
एका मुलाखतीत तेजश्रीच्या आगामी प्रोजेक्टवर बोलून झाल्यानंतर ती अग्गंबाई सूनबाई मालिकेत शुभ्राच्या रूपात का नाही हा प्रश्न ओघाने आलाच. तेव्हा तेजश्रीने हे सांगून टाकलं की कलाकार म्हणून मला काही गोष्टी तडजोड करायला नाही आवडत. आता ही तडजोड कसली हे जरी तेजश्रीने सांगितलं नसलं तरी एकतर शुभ्राचं पूर्वीचं रूप आणि सध्याचं रूप हे खूपच भिन्न दाखवलं आहे जे तेजश्रीला कलाकार म्हणून पटलेलं नाही असं तिला म्हणायचं असावं. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करणारी शुभ्रा अचानक अशी बुजरी होणं शक्य नाही असाही तेजश्रीने विचार केला आणि त्यामुळे व्यक्तीमत्वच बदलून टाकणारी शुभ्रा साकारण्यात तेजश्रीला काही रस वाटला नसल्यानेही तिला ही तडजोड मनाविरूद्ध वाटली. त्यामुळेच तेजश्रीने नो ऍडजस्टमेंट म्हणत शुभ्राच्या जुन्या पर्वावरच थांबायचं ठरवलं.