‘मैने प्यार किया’ मधील गाणी गायला लता दिदी का तयार झाल्या?
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राजश्री प्रॉडक्शनचे अनेक सिनेमे आले. जियो तो ऐसे जियो, तुम्हारे बिना, सून सजना, सून मेरी लैला, दर्द ए दिल, रक्त बंधन, अबोध, फुलवारी, रिमझिम गीतो की, बाबुल इ. पण या काळात ‘नदिया के पार’ आणि ‘सारांश’ हे दोनच सिनेमे हिट झाले. ‘नदिया के पार’ हा सिनेमा तर उत्तर भारतामध्ये प्रचंड यशस्वी झाला पण बाकी सर्व राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट सुपर फ्लॉप ठरत गेले. एकतर सिनेमाचा ट्रेंड बदलत होता. घरोघरी आणि गल्लोगल्ली व्हिडीओ पार्लरचे पेव फुटले होते. राजश्रीचा जुना फार्म्युला आता चालेनासा झाला होता. (Lata Mangeshkar)
कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. राजश्री प्रॉडक्शन हे बॅनर बंद होणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्याच वेळी बडजात्या कुटुंबियातील नवीन पिढी मैदानात आली होती. सूरज बडजात्या त्यांनी एका स्क्रिप्टवर काम सुरू केले. ही स्क्रिप्ट घरातील सर्वांना दाखवली गेली. सर्वांना खूप आवडली. दादाजी ताराचंद बडजात्या यांना देखील खूप आवडली. त्यांनी सिनेमा निर्मितीला ग्रीन सिग्नल दिला आणि चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. सिनेमा होता ‘मैने प्यार किया.’ (Lata Mangeshkar)
२९ डिसेंबर १९८९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्या काळात अभूतपूर्व प्रचंड असे धवल यश प्राप्त केले. राजश्री प्रॉडक्शनचे तोवर झालेले सर्व नुकसान भरून निघाले आणि या चित्रपट संस्थेला नवसंजीवनी मिळाली. या चित्रपटाचे सर्वच अगदी परफेक्ट जुळून आले होते. मग ती स्टार कास्ट असो, या चित्रपटाचे डायलॉग असो किंवा या चित्रपटाचे संगीत असो. सर्वच पातळीवर चित्रपट सर्वदूर लोकप्रिय ठरला. पण हा चित्रपट बनताना सुरज बडजात्या यांच्यावर खूप प्रेशर होते. एकतर आपली घरची चित्रपट संस्था ही अक्षरशः कर्जबाजारी झाली तिला त्यातून बाहेर काढायचे होते आणि या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी २१ वर्षाच्या सुरज बडजात्यावर होती. त्यामुळे तो बऱ्यापैकी नर्व्हस असायचा. (Lata Mangeshkar)
एका मुलाखतीत सूरजने असे सांगितले, “ज्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटात काम करायला होकार दिला तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. कारण कुणीतरी एक इस्टॅब्लिश स्टार या चित्रपटात आला होता! बाकी या चित्रपटातील नायक सलमान खान, नायिका भाग्यश्री पटवर्धन हे दोघेही नवे चेहरे होते. या चित्रपटाचे संगीतकार राम लक्ष्मण प्रतिभावान संगीतकार होते पण त्यांच्या नावावर सुपरहिट सिनेमा नव्हता. चित्रपटाचे गीतकार असद भोपाली खरंतर साठच्या दशकापासून भारतीय सिनेमात गाणी लिहित होते. पण त्यांच्या नावालासुद्धा मार्केट नव्हतं. आता सिनेमातील गाणी कोणी गायची यावर भरपूर चर्चा झाली. एस पी बालसुब्रमण्यम यांनी सिनेमातील हिरोसाठी पार्श्वगायन करावे असे ठरले तर हीरोइन करिता एस जानकी यांचा आवाज फायनल झाला होता. (Lata Mangeshkar)
१९८७ साली आलेल्या ‘प्रतिघात’ मध्ये एस पी बालसुब्रमण्यम आणि एस जानकी यांच्या गाण्यांनी बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली असल्यामुळे हीच जोडी आपल्या चित्रपटासाठी वापरावी असे ठरले. पण एक दिवस राजकुमार बडजात्या यांनी सुरजला विचारले,”जर आपण चित्रपट मेगा स्केलवर बनवत आहोत तर मग लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचा आवाज का वापरायचा नाही?” सूरज बडजात्या यांनी सांगितले, “लताचे नाव ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच हादरली! कारण एवढी मोठी पार्श्वगायिका माझ्या सिनेमात का गाणे गाईल? माझे काहीच नाव नव्हते. माझा हा पहिलाच सिनेमा होता!” आणि लताने मागची पंधरा वर्षे राजश्रीकडे गायले नव्हते. पण जेव्हा राजकुमार बडजात्या म्हणाले, “आपण लताला विचारून बघू. फार फार तर काय ती नकार देईल. त्याच्या पलीकडे काय होईल?” असे म्हणून ते लताला फोन करायला गेले आणि दहा मिनिटात परत आले. (Lata Mangeshkar)
त्यांचा चेहरा खूप आनंदी दिसत होता. ते सूरजला म्हणाले, “दिदी गाणार आहेत. त्या म्हणाल्या दादाजी का ग्रँडसन पहिली बार सिनेमा डायरेक्ट कर रहा है तो मै जरूर गाऊगी.” सूरज म्हणाले ,”हा माझ्यासाठी एक मोठा सुखद धक्का होता!” अशा पद्धतीने लता मंगेशकर यांचा ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात समावेश झाला. (Lata Mangeshkar)
=============
हे देखील वाचा : तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
=============
या सिनेमातील सर्वच गाणी लताने गायली फक्त एक गाणे पाकिस्तानी गायिका रेशमा हिच्या आवाजात रेकॉर्ड झाले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेली यातील सर्व गाणी प्रचंड गाजली.’कबूतर जा जा जा’ ,’दिल दिवाना बिन सजनाके माने ना…’ किंवा अंताक्षरी! खरंतर अंताक्षरी हा प्रकार या चित्रपटात एकदम नवा होता. लताने यात आधी इतर गायिकांनी गायलेली गाणी देखील गायली. सुरज म्हणतात, “हा आमच्यासाठी खूप आनंदाचा ठेवा होता लताने आमच्या सिनेमाला अक्षरश: तारले!” (Lata Mangeshkar)