ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
सचिन देव बर्मन आराधनाला संगीत द्यायला का तयार नव्हते?
कधीकधी बोलताना अनपेक्षितपणे चुकून सत्य बाहेर पडतं आणि समोरच्याला ते रुचत नाही. सत्य हे नेहमी कटू असतं पण अशा विचित्र प्रसंगी खूप कौशल्याने सांभाळून घ्यायचं असतं. असाच काहीसा प्रकार निर्माता दिग्दर्शक शक्ती सामंता (Shakti Samanta) यांच्याबाबत झाला होता. चुकून ते खरं बोलून गेले आणि तेच त्यांच्या अंगाशी आलं! पण मोठ्या शिताफिने त्यांनी स्वतःला या संकटातून बाहेर काढले! कसं? त्याचाच हा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
१९६८ साली शक्ती सामंता (Shakti Samanta) यांनी शम्मी कपूरला घेवून एक चित्रपट केला होता. ‘जाने अंजाने’ हा तो सिनेमा. हा एक बिग बजेट सिनेमा होता. यात शम्मी कपूर प्रमुख भूमिकेत होते. तर लीना चंदावरकर, विनोद खन्ना, हेलन, के एन सिंग, ललिता पवार हे अन्य भूमिकेत होते. चित्रपटाला संगीत शंकर जयकिशन यांचे होते. मोठ्या स्केलवर हा चित्रपट बनणार होता. पण या सिनेमाच्या दरम्यान शम्मी कपूरचे वजन खूपच वाढले होते. त्यावर इलाज करण्यासाठी तो लंडनला गेला आणि या सिनेमाचे शूटिंग थांबले. एकूणच हा चित्रपट रेंगाळत चालल्यामुळे शक्ती सामंता (Shakti Samanta) यांनी एक लो बजेट सिनेमा करायचे ठरवले.
या सिनेमात त्यांनी नवीन अभिनेत्याला घ्यायचे ठरवले. त्या पद्धतीने त्याने राजेश खन्नाला या चित्रपटासाठी साईन केले. चित्रपट होता आराधना. या चित्रपटाला संगीत कुणाचे घ्यावे याचा विचार शक्ती सामंता (Shakti Samanta) करू लागले. सिनेमाचे बजेटच कमी असल्यामुळे ते ऍप्रोच झाले संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे. ‘आराधना’ सिनेमाची स्टोरीलाईन त्यांना सांगितली आणि ते म्हणाले, “दादा सिनेमाचे बजेट खूपच कमी आहे!” त्यावर सचिनदा म्हणाले अरे शक्ती तू शंकर जयकिशन के पास क्यू नही गये?” त्यावर शक्ती सामंता (Shakti Samanta) म्हणाले, “दादा वही तो बता रहा था. सिनेमा का बजेट कम है. इसलिये…” असं म्हणताना त्यांच्या लक्षात आलं नाही आपण चुकून खरं बोलून टाकत आहोत.
हे असं ऐकलं आणि सचिन देव बर्मन यांचा रागाचा पारा चढला. ते म्हणाले, “शक्ती, ये क्या मजाक है? तुमच्याकडे पैसे कमी आहेत; म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. म्हणजे तुमच्याकडे जर पैसे जास्त असते तर तुम्ही माझ्याकडे आला नसता? शंकर जयकिशनकडे गेला असता? धिस इज डीसगस्टिंग. नॉन्सेन्स!” आता मात्र शक्ती सामंता (Shakti Samanta) गडबडून गेले. आपल्या तोंडून नको ते बाहेर पडले आणि त्यातून सचिन देव बर्मन प्रचंड नाराज झाले आहेत याची त्यांना जाणीव झाली. काय करावे? चूक तर झाली होतीच. परंतु लगेच त्यांनी त्यांना सांभाळून घेतलं.
ते म्हणाले, “दादा, ही गोष्ट खरी आहे की सिनेमाचे बजेट कमी आहे. पण हे एकमेव कारण नाही की सिनेमाला संगीत तुम्ही द्यायचे. तुम्ही आमचे आहात, माझे आहात असे मी समजतो आणि या भावनेतून मी तुमच्याकडे आलेलो आहे.” शक्ती सामंता (Shakti Samanta) यांचे ते शब्द ऐकून सचिन देव बर्मन यांचा रागाचा पारा खाली आला. ते म्हणाले, “ठीक आहे. लेकिन तुम पैसा कितना देगा? मागच्या सिनेमासाठी सत्तर हजार रुपये घेतले होते. या सिनेमासाठी मी ऐंशी हजार रुपये घेईन. अगर मंजूर है तो बोलो नही तो इधर ही बॉत खोतम करेगा.”
===============
हे देखील वाचा : गोल्डीची कमाल पंचमची धमाल
===============
खरं तर सचिन देव बर्मन सिनेमासाठी असे डायरेक्ट पैसे कोणाला सांगत नसायचे पण मगाशी झालेल्या प्रकारामुळे त्यांनी शक्ती सामंता (Shakti Samanta) यांना आपली अमाऊंट सांगितली. त्यावर शक्ती सामंता (Shakti Samanta) म्हणाले, “दादा मी ऐंशी हजार रुपये नाही त्याहून जास्त पैसे द्यायला तयार आहे. मी तुम्हाला या सिनेमासाठी एक लाख रुपये मानधन देईन. पण मगाशी माझ्याकडून झालेल्या चुकीला तुम्ही माफ करा आणि राग शांत करा आणि तुमचे मेलडीयस म्युझिक या सिनेमासाठी द्या!” त्यावर सचिनदा हसले आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारली!