ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात जेव्हापण डोकावून पाहतो, त्यावेळी अनेक गमतीजमती, अनेक किस्से आणि आपल्या लक्षात न आलेल्या अनेक गोष्टी दिसतात. देव आनंद यांचा १९६५ सालचा ‘गाईड’ हा सिनेमा भारतीय चित्रपट इतिहासातील ‘माईलस्टोन’ चित्रपट. प्रख्यात साहित्यिक आर. के. नारायण यांच्या साहित्य अकादमी विजेत्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाला (आणि पर्यायाने कादंबरीला) देव आनंद साहेबानी जागतिक पातळीवर पोहोचवले. या चित्रपटाची गाणी शैलेंद्र यांनी लिहिली होती, तर संगीत होते सचिन देव बर्मन यांचे.
या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेल्या ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘दिन ढल जाये रात न जाये’ आणि ‘क्या से क्या हो गया तेरी प्यार में’ ही गाणी प्रचंड गाजली. तसंच लता मंगेशकर यांनी गायलेली ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘पिया तोसे नैना लागे रे’ आणि ‘मोसे छल किये जा सैय्या बेईमान’ ही गाणी देखील जबरदस्त लोकप्रिय ठरली.
सचिन देव बर्मन यांच्या स्वतःच्या स्वरातील ‘वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां..’ हे गाणे त्यातील आगळ्या शैलीने आणि तत्वज्ञानाने रसिकांच्या लक्षात राहिले. तसेच ‘अल्ला मेघ दे पानी दे’ हे मन्ना डे यांच्या स्वरातील प्रार्थना गीत परफेक्ट जमून आलं होतं.
गंमत म्हणजे इतका सुंदर रोमँटिक चित्रपट असून देखील गाईड चित्रपटामध्ये एकही युगुलगीत सुरुवातीला नव्हतं. याची अनेक कारणं होती. एकतर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर त्या काळात एकत्र गात नसत. रॉयल्टीच्या प्रश्नावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे त्या काळातील अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये रफी – लता जोडीचे एकही युगलगीत नसायचे.
गंमत म्हणजे १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पेइंग गेस्ट’ नंतर देव आनंद साठी किशोर कुमार तब्बल ९ वर्षे गायलाच नव्हता. आपल्याला नेहमी असं वाटतं की, किशोर कुमार हा देव आनंदचा परमनंट गायक होता. पण मधली तब्बल नऊ वर्ष देव आनंद आणि किशोर कुमार यांचे एकही लोकप्रिय गाणे आलेलं नव्हते. या काळात देव आनंदाच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या यादीकडे लक्ष दिले, तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल.
दुश्मन, बारिश, सोलवा साल, कालापानी, अमरदीप, लव मॅरेज, मंजिल, कालाबाजार, सरहद, जाली नोट, एक के बाद एक, बंबई का बाबू, रूप की रानी चोरों का राजा, माया, जब प्यार किसी से होता है, हम दोनो, बात एक रात की, असली-नकली, तेरे घर के सामने, किनारे किनारे आणि शराबी. असे देव आनंद यांचे तब्बल २१ चित्रपट १९५७ ते १९६५ या दरम्यान प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांमध्ये देवानंद करिता किशोर कुमारचे एकही गाणे नव्हते. अर्थात याची अनेक कारणे होती.
याच काळात मधुबालाचे आजारपण बळावल्यामुळे किशोर कुमारचे चित्रपटातील गाणे कमी झाले होते. तसेच, नवकेतन या बॅनर सोबत रफी बऱ्यापैकी ‘असोसिएट’ झाला होता. या काळात म. रफी, मन्नाडे, हेमंत कुमार, तलत महमूद, एस. डी. बातीश, द्विजान मुखर्जी देव करीता गात होते.
या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘गाईड’ हा चित्रपट जवळपास पूर्ण झाल्यानंतर एक दिवस देव आनंद किशोर कुमारला सचिन देव बर्मन यांच्याकडे घेऊन गेले. सचिनदाचा अतिशय आवडता गायक म्हणजे किशोर कुमार. दोघांनी आनंदाने परस्परांना मिठी मारली. सचिनदानी लगेच तिथल्या तिथे किशोरला घेऊन हार्मोनियमवर एका गाण्याची रिहर्सल सुरू केली. ते गाणं होतं ‘तीन देवीया’ या चित्रपटातील ‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत कौन हो तुम बतलाओ, देर से कितनी दूर खडी हो और करीब आ जाओ…’
‘गाईड’ या चित्रपटाचा दिग्दर्शक गोल्डी विजय आनंद हे सर्व मोठ्या कुतूहलाने आणि आनंदाने पाहत होता. त्याने तत्काळ विचार केला, ‘तीन देवीया’ हा चित्रपट लगेच प्रदर्शित होणार नव्हता. हा चित्रपट नवकेतनचा जरी असला तरी फार मोठा चित्रपट नव्हता, तर ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमा होता. त्याच्या तुलनेत ‘गाईड’ हा भव्यदिव्य सिनेमा होणार होता. या सिनेमात किशोर कुमारचे गाणे तर, असायलाच हवं.
सचिनदा आणि किशोरचे ट्युनिंग त्याला माहित होतं. गोल्डीने ठरवलं की ‘गाईड’ मध्ये किशोरचं गाणं घ्यायचंच. मग सुरु झाला सिनेमातील गाण्यासाठी सिच्युएशन आणि जागेचा शोध. सिनेमात एकही युगल गीत नाही हे त्याला डाचत होतेच. मग त्याने बरोब्बर सिच्युएशन तयार केली.
सचिनदाना तसे सांगितले गेले. सचिनदा यांनी आनंदाने होकार दिला. ताबडतोब गीतकार शैलेंद्र यांना पाचारण करून गाण्याची सिच्युएशन सांगितली गेली आणि काही काळात एक सदाबहार रोमँटिक गीत जन्माला आले…… गाता रहे मेरा दिल. किशोर आणि लताच्या स्वरातील या गाण्याने प्रचंड मोठी लोकप्रियता मिळवली. आजही आपण काळजीपूर्वक ‘गाईड’ पाहिला, तर हे गाणं तसं ‘पॅचवर्क’च वाटतं, नंतर जोडल्यासारखे! पण गाणं सुंदर असल्याने ते आपल्याला खटकत नाही.
हे ही वाचा: एक असा संगीतकार ज्याच्यामुळे बिग बी बनले गायक!
….जेव्हा तलत महमूद कमालीचे भावनाविवश झाले!
“गाता रहे मेरा दिल” हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की, त्या वर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’ मध्ये हे गाणं दुसऱ्या क्रमांकावर होतं. पहिला क्रमांक अर्थातच ‘सूरज’च्या ‘बहारो फुल बरसावो’ याला मिळाला होता. संपूर्ण चित्रपट तयार झाल्यावर शेवटी ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’ घेवून आलेलं ‘गाता रहे मेरा दिल…’ हे गाणं प्रेमिकांच्या अनेक पिढ्या पुढे गुणगुणत राहतील यात मात्र शंका नाही.