नाटकांसमोर आव्हान त्याच्या पब्लिसिटीचं…
कोरोनानंतर आता सगळं नव्याने जग नव्याने बहरू लागलं आहे. म्हणूनच सगळीकडे जाहिरातींचा बोलबाला आहे. रेडिओ, वृत्तपत्र, टीव्ही या सगळ्याच माध्यमांमध्ये ज्वेलरी, रिअल इस्टेट, कपडे, खान-पानांच्या जाहिरातींचा सुकाळ दिसतो. ते साहजिकच आहे. कारण, जवळपास दोन वर्षं सगळंच बंद असताना कोंडलेला श्वास आता नव्याने आणि तितक्याच मोकळेपणाने घ्यायची वेळ आली आहे. याला मनोरंजन क्षेत्रही अपवाद नाही. पैकी मालिकाविश्व आणि लॉकडाऊनमध्ये जोमाने वाढलेल्या ओटीटी उद्योगाला चालना मिळालीच.
लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टी बंद असल्याचा फटका या उद्योगाला तितका बसला नाही. उलट घरी बसलेल्या प्रेक्षकाने टीव्हीला जवळ केलं, तर घरी बसून प्रायव्हसी गेलेला वर्ग ओटीटीवर आला आणि आपल्या मोबाईलवर त्याला हवं ते पाहू लागला. त्यानंतरच्या काळाता सिनेविश्व खुलं झालं. आता १०० टक्के प्रेक्षकसंख्येने थिएटर्स खुली झाली असली तरी यापूर्वी असलेल्या ५० टक्के दर सिनेविश्वाच्या नाकात लगाम टाकणारा होता.
हे खरं असलं तरी दोन वर्षं रुतून बसलेलं चाक फिरू लागलं. सिनेमाच्या जाहिराती टीव्हीवर दिसू लागल्या. अनेक यूट्युबर्स कलाकारांच्या मुलाखती घेऊ लागले. यानिमित्ताने सिनेमातली मंडळी सोशल मीडियावर बोलू लागली आणि सिनेमाला प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे सिनेमाचा प्रश्नही हळूहळू मार्गी लागणार आहे याची आता खात्री वाटू लागली आहे. या सगळ्यात अडचण झाली आहे ती नाटकांची. (World Theatre Day)
थिएटर्स खुली झाल्याचा आनंद नाट्यसृष्टीलाही झाला आहे. त्यांनाही आता जोमाने उभं राहायचं आहे. म्हणूनच १०० टक्के आसनक्षमतेनं थिएटर्स खुली झाल्यावर आपला उद्योगही जोमाने वाढावा असं त्यांनाही वाटतंय. म्हणूनच या एप्रिलमध्ये सुट्टीचा हंगाम पाहता अनेक नवी नाटकं येताना दिसतायत.
अनेक नाटकं आली आहेत. पण नव्याने सुरू झालेल्या या दुनियेत एक नवीन अडचण नाट्यउद्योगाभवती घोंगावते आहे, ती आहे पब्लिसिटीची! जशी सिनेमा, ओटीटीला पब्लिसिटीची गरज असते तशी ती नाटकांनाही असते. पण दुर्दैवाने आज नाटकांना पब्लिसिटी नेमकी कुठं करावी तेच कळेनासं झालं आहे. कारण, त्यांच्यासाठी कोणत्याही माध्यमामध्ये तेवढी जागा उरलेली नाही किंवा या माध्यमांनी ती ठेवलेली नाही, असं म्हणायलाही हरकत नाही.
उदाहरणादाखल बोलायचं तर, समजा मी नवं नाटक आणतो आहे. तर ते नाटक येतंय हे मला माध्यमांकरवी सांगायचं असतं. पूर्वी त्याच्या पत्रकार परिषदा व्हायच्या. त्यानिमित्ताने गप्पाटप्पा व्हायच्या. कलाकार मनमोकळेपणाने बोलायचे. त्यानंतर नव्या नाटकाच्या बातम्या छापून यायच्या. त्यातून नाटकांच्या पानभर जाहिराती तर असायच्याच. नाटकात जर मोठे नावाजलेले, अनुभवी चेहरे असतील तर टीव्हीवरही प्रसिद्धी मिळायची. (World Theatre Day)
नाटकांच्या बातम्या व्हायच्या. नाटकाच्या प्रयोगाचं फुटेज दाखवलं जायचं. पण आता हा काळ मागे पडला आहे. माध्यमांमध्ये नाटकाबद्दलची स्थिती फार गंभीर बनली आहे. कारण, मुळात सध्या टीव्ही या माध्यमाकडे मनोरंजनासाठीच मुळात वार्तांकन कमी झालं आहे. त्यातही या वार्ताहरांना सिनेमाचं वेड जास्त आहे.
सिनेमा आला की त्यातले कलाकार आपणहून माध्यमांकडे जातात आणि मग ही मंडळी या आयत्या संधीचा लाभ वर्तांकनासाठी करुन घेतात. नाटकवाल्यांची गोची अशी, की नाटकाची माहीती असणारे.. नाटक ही कला माहीत असणारे.. नाटकाची संहिता.. त्याचं दिग्दर्शन.. त्याची प्रकाशयोजना, ध्वनी कळणारी मंडळीच माध्यमांकडे उरलेली नाही. (World Theatre Day)
अर्थात अपवाद आहेतच. पण बहुतांश माध्यमांमध्ये हीच स्थिती आहे. त्यातल्या त्यात वृत्तपत्रांमध्ये मात्र एखादा मिणमिणता का असेना, पण चेहरा दिसतोय. एरवी सिनेमांच्या बातम्यांवर तुटून पडणाऱ्या वेबसाईट्स तर नाटकाचा विचारही करत नाहीत.
मुळात नाटक ही परफॉर्मिंग आर्ट आहे आणि महाराष्ट्रातला फार मोठा वर्ग त्याच्याशी बांधला गेला आहे, हेच त्यांना मान्य नसतं. त्यातून नाट्यसमीक्षा वगैरे तर फार लांब उरली आहे. मुंबई-पुण्यात नाट्यसमीक्षक म्हणता येतील अशी माणसं अगदी दुर्मिळ झाली आहेत. तर महाराष्ट्राच्या इतर शहरात नाट्यसमीक्षक आहेत खरे. पण त्यांच्यापर्यंत नाटकं सातत्याने पोचत नाहीत. नाही म्हणायला अशा शहरांना असलेली नाटकाची भूक वर्षातून एकदा भागवली जाते ती हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने. त्यापलिकडे प्रकरण जात नाही.
अर्थात याला एक दुसरी बाजूही आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असा नाटकवेडा माणूस विखुरलेला आहे यात शंका नाही. पण मुळात व्यावसायिक नाटक अलिकडे केवळ मुंबई-पुणे आणि नाशिक याच त्रिकोणापुरतं उरलं आहे. नाटकं बाहेर जातच नाहीयेत हल्ली. (World Theatre Day)
अर्थात त्याला कारणंही आहेत. म्हणजे, कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रभर नाटकं घेऊन जायला आवडतंच पण स्थिती अशी झाली आहे की, प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचायचं तर हल्ली फक्त संहिता चांगली असून चालत नाही. त्याच्या सादरीकरणासाठी कलाकारही शक्यतो ग्लॅमरस घ्यावे लागतात. मग त्या कलाकारांना पाहायला म्हणून का होईना, प्रेक्षक येईल या तर्कावर निर्माता श्वास घेऊ शकतो.
मग अशा कलाकारांना घेतलं की, हे कलाकार केवळ नाटक करत नसतात. ते एकाचवेळी मालिका, ओटीटी… एखादा सिनेमाही करत असतात. त्यातून शनिवार-रविवार वेळ काढून या नाटकाचे प्रयोग केले जातात. त्यामुळे नाटक केवळ अशाच शहरांत जातं ज्या शहरात गेल्यावर पुन्हा चार तासात मुंबई गाठता येईल. अशा नाटकांचा दौरा होतो. पण तो फार कमी.
अशामुळे मुंबई-पुणे वगळता राज्यातल्या इतर शहरात उदाहरणार्थ, अमरावती, कोल्हापूर, सांगली, बीड, नागपूर, चंद्रपूर, लातूर आदी शहरांत नाटकं जातच नाहीत आणि गेली की एखादा दौरा करून परत येतात. त्यात सातत्य फारसं नसतं. परिणामी नाटक धंदा शनिवार आणि रविवार त्यातही ठराविक शहरांपुरता मर्यादित राहिला आहे.
याचा परिणाम असा झाला आहे की, केवळ दोन दिवस असलेल्या आणि विशिष्ट शहरांपुरता मर्यादित असलेल्या कलाकृतीला तितका एअर टाईम का द्यायचा असा उलटा प्रश्न माध्यमं विचारू लागली आहेत. शिवाय अलिकडच्या माध्यमांना रंगमंचावर घडणाऱ्या नाटकापेक्षा राजकारणात घडणाऱ्या नाटकांची जास्त ओढ लागली आहे. म्हणूनच नाटकांच्या पब्लिसिटीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
नवं नाटक आणायचं असलं तरी पब्लिसिटी कुठे कशी करायची हेच नाटकवाल्यांना कळेनासं झालं आहे. व्यावसायिक नाटकांची इथे अशी गोची होत असताना प्रायोगिक नाटकांबद्दल तर न बोललेलंच बरं. त्यामुळे नाटकांना पब्लिसिटी तर हवी आहे, पण ती करायची कशी, हा मोठा प्रश्न आहे.
सध्या नाटकं पब्लिसिटीसाठी सोशल मीडियावर फोटो टाकत असतात; रील करतात, व्हिडिओ पोस्ट करतात. जेणेकरून त्यांच्या त्यांच्या फॅनफॉलोअर्सपर्यंत हे पोचेल. पण त्यातून इंटरेस्टिंग कॉंटेंट जनरेट होताना दिसत नाही. असा कॉंटेंट जो ऐकून किंवा वाचून त्यातून प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत पोचेल. म्हणजे एकिकडे आपण ‘जागतिक रंगभूमी दिन’ (World Theatre Day) साजरा करतोय हे खरंय. पण या दिवसाच्या निमित्ताने दिवसेंदिवस आकुंचन पावत जाणाऱ्या नाट्यव्यवसायाला संजीवनी देणं गरजेचं झालं आहे. अर्थात याकडे आता साकल्याने पाहायची गरज आहे आणि त्यावर पर्याय शोधायची निकड आहे.
नाटक येणार आहेतच. पण आता त्या नाटकांना हात पाय पसरणयासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं हे आपलं काम आहे. केवळ शनिवार आणि रविवारमध्ये अडकून पडलेला नाटकधंदा आता सातही दिवस कसा होईल याकडे पाहिलं पाहिजे. तो महाराष्ट्रात सर्वदूर कसा पसरले हे पाहायला हवं. (World Theatre Day)
आपण खरंतर जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day) साजरा करतोय हे खरं असलं, तरी आपलं जग सुरू होतं ते आपल्या घरापासून. आपल्या घरात नाटक कसं वाढेल.. आपल्या शहरात.. आपल्या राज्यात.. नाटक कसं वाढेल.. त्याचे कसे वेगवेगळे प्रयोग होतील हे पाहायला हवं. तरच जागतिक रंगभूमी दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. येत्या काळात असा रंगभूमी दिन साजरा करता यावा अशी स्थिती येवो हीच सदिच्छा! (World Theatre Day).