दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लोकप्रिय सिनेमाचे लेखक: गुलशन नंदा
साठ दशकात सिनेमा सप्तरंगात न्हावू लागला आणि सिनेमाच्या कथानकातील भावनांचे रंग देखील अधिक गहिरे होत गेले. कथानकातील नाट्यमयता वाढत गेली. भावोत्कट सिनेमांना प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळू लागली. याच काळात हिंदीतील एका लेखकाच्या साहित्य कृतीवर निर्मात्यांचे लक्ष गेले आणि अनेक रौप्य महोत्सवी,सुवर्णमहोत्सवी सिनेमांची रांगच लागली. या लेखकाचे नाव होते गुलशन नंदा! १९६० ते १९८० ही वीस वर्षे त्यांच्या लेखणीच्या जादूने तळपून निघाली होती.(Gulshan Nanda)
गंमत म्हणजे हिंदीतील नामवंत साहित्यिकांच्या रांगेत बसण्याचा सन्मान त्यांना कधीच मिळाला नाही. पण तरूणाईच्या गळ्यातील ते ताईत होते. त्या काळातील पॉकेट बुक सिरीजमध्ये त्यांच्या पुस्तकांना भारी मागणी होती. लायब्ररीमध्ये नंदाच्या पुस्तकांना वेटींग असायचे. हिंदी सिनेमाच्या दुनियेत १९६५ सालच्या ’काजल’ ने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.. अप्रतिम भावोत्कट कथानाट्य,नात्यानात्यातील संबंधाचे हळूवार पॆड उलगडत कथा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणत होती. मीना कुमारीचा अप्रतिम अभिनय हे सिनेमाचे आणखी एक बलस्थान होते. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारीत होता. गुलशन नंदा (Gulshan Nanda) या नावाभोवती वलय निर्माण झाले. १९६४ ते १९६८ सलग पाच वर्षे त्यांनी लिहिलेल्या कथांवरील सिनेमांनी मोठे यश मिळविले. हे सिनेमे होते ’फूलोंकी सेज’(१९६४), ’काजल’(१९६५),’सावन की घटा’ (१९६६),’पत्थर के सनम’ (१९६७) ’नीलकमल’ (१९६८).
चाळीस-पन्नासच्या दशकातील नायकावर स्वातंत्र्यपूर्व वातावरणाचा पगडा असायचा.त्यागी,संघर्ष करणारा,आदर्श ,उदात्त अशी नायक,नायिकांची इमेज होती. पण साठच्या दशकात नायक, नायिका बदलले. सिनेमाचा जॉनर बदलला. आता रोमॅंटीक,अॅक्शन,गुन्हेगारी,जासूसी अशा कथांची मागणी वाढू लागली आणि हे सारे रंग ज्यांच्या लेखणीत होते त्या लेखकांची चलती सुरू झाली. गुलशन नंदा (Gulshan Nanda) यांच्या ’पत्थर के होठ’ या कादंबरीवर ’खिलौना’ हा सिनेमा १९७० साली आला या सिनेमातून संजीवकुमार व मुमताज या गुणी कलाकारांना पहिल्यांदा आयडेंटीटी मिळाली.याच वर्षी त्यांच्या कथेवरील ’कटी पतंग’ झळकला. गंमत म्हणजे यातील नायिकेची भूमिका शक्ती सामंत यांनी आधी शर्मिलाला ऑफर केली होती. पण संपूर्ण सिनेमात पांढरी साडी परीधान करून विधवेच्या रूपात वावरणे तिला पटले नाही. मग त्यांनी आशा पारेखला विचारले. ती आनंदाने तयार झाली. कारण तिने ही कादंबरी आधीच वाचली होती व कथानकाची ताकत तिच्या लक्षात आली होती. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नंदा यांच्या कथामध्ये पुढे काय होणार ही उत्कंठा कायम असायची त्यामुळे त्यांची कलाकृती कमालीची यशस्वी होत असे. कंप्लीट फॅमिली मसाला ड्रामा असाही शिक्का त्यांच्यावर बसला पण हाच त्यांचा प्लस प्वांईंट ठरला. सत्तरच्या दशकात गुलशन नंदाच्या हिट सिनेमांची मालिकाच चालू झाली. आता कथे सोबत ते पटकथाही लिहू लागले होते. ’शर्मिली’, ’नया जमाना’(१९७१),’दाग, (१९७३) झील के उस पार,(१९७४)जोशिला (१९७४),जुगनू (१९७३), ’अजनबी’(१९७४), ’मेहबूबा’(१९७६). या सर्व सिनेमांनी सुवर्ण महोत्सवी यश मिळविलेच आणि या यशात कथानकाचा मोठा वाटा होता हे समीक्षकांना मान्य करावे लागले. हिंदी साहित्याच्या वर्तुळात मात्र त्यांना मानाचं स्थान मिळतं नव्हतं. प्रस्थापित प्रकाशकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. पण सिनेमाच्या यशाने चमत्कार घडला.
=======
हे देखील वाचा : मध्यरात्री ‘या’ अप्रतिम भक्तीगीताची चाल सुचली!
=======
त्यांच्या ’झील के उस पार’ या पुस्तकाने लोकप्रियतेचे मागचे पुढचे सर्व रेकॉर्डस मोडून काढले.या पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी देशभरातील सर्व मिडीयात जाहिरात दिली गेली. तब्बल पाच लाख प्रती विकल्या गेल्या. नामवंत प्रकाशन लाभल्याने त्या अर्थाने ते साहित्यिकांच्या बैठकीत प्रस्थापित झाले. त्यांच्या काजल,नीलकमल,खिलौना,कटी पतंग,नया जमाना,मेहबूबा या सिनेमांच्या कथांकरीता त्यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. (Gulshan Nanda)
ऐंशीच्या दशकात भावनिक, कौटुंबिक सिनेमाची संख्या घटू लागली. तशी नंदा यांची मागणी देखील! या काळातही बिंदीया चमकेगी, नजराना असे त्यांचे सिनेमे येतच होते. पॉकेट बुक्सच्या माध्यमातून त्यांच्या शंभरच्या वर कादंबर्या आजही लोकप्रिय आहेत. १६ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचे देहावसान झाले.