Siddharth Jadhav चा पहिला गाजलेला ‘तो’ सिनेमा आता दिसणार छोट्या

Yash Chopra यांचा वादग्रस्त ठरलेला हा चित्रपट आठवतो का?
यशस्वी रोमँटिक सिनेमाचे बादशहा म्हणून आजची पिढी यश चोप्रा यांना ओळखते. पण याच दिग्दर्शकाने आपल्या करीयरच्या सुरुवातीला एक राजकीय विषयावर भाष्य करणारा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ज्यांची आठवण आज फारशी कोणाला होत नाही. विशेष म्हणजे या चित्रपटानानंतर राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता परंतु या चित्रपटाला व्यावसायिक यश अजिबात मिळाले नव्हतं. या सिनेमात मांडलेला विषय विवादास्पद वाटल्या मुळे देशात काही ठिकाणी या सिनेमावर चक्क बंदी देखील घालण्यात आली होती! यश चोप्रांच्या चाहत्यांपैकी किती जणांनी हा चित्रपट ‘धर्मपुत्र’ बघितला असेल हि शंकाच आहे. देशाच्या फाळणीची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात त्यांनी हिंदू-मुस्लिम संघर्ष हा धाडसी विषय खूप संवेदनशील पद्धतीने हाताळला होता.
आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा पुन्हा एकदा हा सिनेमा बघतो आणि महत्वाचे म्हणजे ‘आताच्या’ नजरेतून त्या सिनेमाकडे बघतो तेव्हा असं जाणवतं की, त्या काळाच्या मानाने चोप्रांनी खूप पुढचा विषय यात मांडला होता. खरं तर आपल्या देशातील गंगा – जमुना संस्कृतीचा एक आदर्श वस्तू पाठ यातून दिला गेला होता असे दिसते. दुर्दैवाने प्रेक्षकांना हा विषयच अपील झाला नाही पण यश चोप्रा यांचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा होता हे नक्की. हा चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘धर्मपुत्र’. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळची त्याकाळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती देखील आपण पाहायला पाहिजे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून तेरा वर्षे झाली होती. हळूहळू स्वातंत्र्याची धुंदी कमी होऊन लोक पुन्हा आपल्या मूळ स्वभावाकडे जाऊ लागले होते. धार्मिक संघटना प्रबळ होत होत्या.

राजकीय वातावरण ढवळून निघत होते. देशात अनेक ठिकाणी जातीय दंगली घडत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर हा चित्रपट आला. चित्रपटाचा विषय जरी वादग्रस्त असला तरी यश चोप्रा यांनी या सिनेमाचा पूर्वार्ध त्यांच्या खास शैलीत रंगवला होता विशेषत: यातील गाणी खूप चांगली होती. ‘मै जब भी अकेली होती हो तुम चुपके से आ जाते हो’, ‘भूल सकता है भला कौन ये प्यारी आंखे’, ‘आज की रात बडे मुरादो’, ‘मेरे दिलबर मुझपर खफा न हो’ हि गाणी सुंदर होती. अभिनेता शशी कपूरचा हा पहिलाच सिनेमा होता. यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी फिचर फिल्मचे पारितोषिक मिळाले तसेच राष्ट्रपतीचे रौप्य पदक देखील मिळाले. या सिनेमाच्या संवादासाठी अख्तर उल रहमान यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
या चित्रपटातील विवादास्पद विषयामुळे आणि सिनेमाला अपयश मिळाल्याने पुन्हा कुठल्याही निर्मात्याने असल्या विषयावर चित्रपट काढायची हिंमत केली नाही त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी १९७४ साली एम एस सथू यांनी ‘गर्म हवा’ हा चित्रपट निर्माण केला. चित्रपटाचा विषय म्हटला तर स्फोटक होता. यश चोप्रा यांनी त्याची हाताळणी जरी संवेदनशीलपणे केली असती तरी मूळ विषय त्या काळाच्या मानाने खूप पुढचा होता. सिनेमाची कथा आचार्य चतुरसेन यांच्या कादंबरीवर आधारीत होते. या सिनेमांमध्ये अशोक कुमार, शशी कपूर, मालासिन्हा, रहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत आणि एन दत्ता यांचे होते तर गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती. चित्रपटाचा प्लॉट हा १९२५ ते १९४७ या ब्रिटीश काळातील होता. या काळात भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ मोठ्या वेगाने जोर पकडत होती. ब्रिटीशांच्या आशीर्वादाने धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागले होते.

देशाच्या फाळणीचे संकेत समाजाला दुभंगून टाकत होते. चित्रपटाच्या कथेमध्ये हिंदू डॉ. अमृत राज (मनमोहन कृष्ण) आणि मुस्लिम नवाब बद्रुद्दिन (अशोक कुमार) या दोन जिवलग मित्रांच्या कुटुंबाची कहाणी आहे. यातील या मुस्लिम कुटुंबातील तरुण मुलगी हुस्न बानो(माला सिन्हा) एका मुस्लिम जावेद (रहमान) नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते आणि लग्नापूर्वीच गर्भवती होते. नवाब साहेबांच्या प्रतिष्ठेचा,आबरू चा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मदतीला त्यांचा हिंदू मित्र धावून येतो. मुस्लिम मुलीच्या प्रसूती नंतर तिच्या होणाऱ्या मुलाचा सांभाळ हिंदू दाम्पत्य करते, त्याला दत्तक घेतले जाते आणि त्याला हिंदू पद्धतीने वाढवले जाते. पुढे या माला सिन्हा चा निकाह तिच्या त्याच प्रियकरा सोबत (रहमान) होतो. काळ पुढे सरकतो .
हिंदू कुटुंबात वाढलेला मुलगा दिलीप राय (शशी कपूर) आता कट्टर सनातनी हिंदू बनतो. सभोवतालची देशाच्या फाळणी ची परिस्थिती पाहून त्याच्या डोक्यात इतर धर्मियांबद्दल प्रचंड चीड असते, राग असतो. देश फाळणीच्या अंबरठ्यावर असतो. सर्वत्र रक्तपात, हिंसाचार सुरू असतो. त्यावेळेला हा सनातन हिंदू तरुण (शशी कपूर) डोक्यात सूडाची आग घेवून दंगलीत त्याच्याच सख्या आई-वडिलांना मारायला धावतो. तिथेच ते हिंदू कुटुंब त्या मुलाला त्याच्या जन्माचे सत्य सांगते. ते ऐकल्यावर आता मात्र तो शशी कपूर पूर्णतः उद्ध्वस्त होतो. ज्या धर्माचा संपूर्ण नायनाट करायचा त्याने विडा उचललेला असतो असतो त्याच धर्मात त्याचा जन्म झालेला असतो! स्वतःची अशी विचित्र आयडेंटिटी, मनाची झालेली कोंडी तो सहन करू शकत नाही आणि आत्महत्या करायला निघतो! आपल्या जन्माचे रहस्य तो कसे स्वीकारतो? तो खरोखरंच आत्महत्या करतो का?की दुसऱ्या धर्माचे लोक त्याचा खातमा करतात? नेमकं होतं काय? हे समजण्यासाठी हा सिनेमाच मूळातून पाहायला हवा.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
सिनेमाचा क्लायमॅक्स जबरदस्त घेतला आहे. युट्युब वर हा सिनेमा नि: शुल्क उपलब्ध आहे. आज ओटीटी मुळे प्रेक्षक अधिक मॅच्युअर्ड,समंजस बनला आहे. त्यामुळे आज हा विषय तितकासा स्फोटक वाटणार नाही. पण त्या काळी १९६१ सालच्या भारतीय समाज मनाला हा विषय नाही पटला. या सिनेमाने देशाच्या काही भागात वातावरण पुरते ढवळून निघाले तर काही राज्यात या सिनेवर चक्क बंदी घातली गेली. या अनपेक्षित प्रतिसादाने यश चोप्रा यांनी मात्र या चित्रपटानंतर कानाला खडा लावला आणि पुन्हा कधीच विवाद निर्माण होईल अशा विषयावर चित्रपटाची निर्मिती अगर दिग्दर्शन केलं नाही…!