
Yashraj Studio, टेक्नॉसॅव्ही आणि फोकस्ड
तुम्हाला अनुष्का शर्माने सौभाग्यवती विराट कोहली होण्यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघासाठी अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ (२०१६) या चित्रपटाचा स्पेशल प्रिव्ह्यू खेळ आयोजित केला होता हे आठवतंय? संध्याकाळी उशिरा त्याचे खास आयोजन करण्यात आले होते आणि एकाच वेळेस चित्रपट आणि क्रिकेट असा छान योग असल्याने हे खेळाडू चित्रपट पाह्यला आले हे लाईव्ह कव्हरेज होते (यात थेट प्रक्षेपण करण्यासारखे इतकं काय आहे असा प्रश्न पडू शकतो, पण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाचे लोणचं एव्हाना फार मुरले होते आणि त्यांच्या लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला असल्याचे ते दिवस होते.)

हे सगळे क्रिकेटर्स मुव्हीज एन्जॉय करताना खुश होतेच, पण त्याबरोबरच त्यांना मिनी थिएटरची अद्ययावत आलिशान खुर्ची आणि उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम यामुळे ते प्रचंड खुश झाले. ते मिनी थिएटर होते, यशराज स्टुडिओतील! मुंबईतील माझ्या अतिशय आवडत्या चित्रपट स्टुडिओतील हा एक आजच्या ग्लोबल युगातील स्टुडिओ. अर्थात yrf studio.
आज एकिकडे गोरेगाव पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्थान स्टुडिओ, महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळचा फेमस स्टुडिओ हेदेखील पाडले जाऊन काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यावेळी मुंबईतील मालाड येथील बॉम्बे टॉकिज स्टुडिओपासून एकेक करत करत कामराज स्टुडिओ, मोहन स्टुडिओ असे अनेक चित्रपट स्टूडिओ बंद होत गेले आणि काहीचे अस्तित्व केवळ आणि केवळ बसस्थानकाला नाव देण्यापुरते राहिले आहे, असा फ्लॅशबॅक चर्चेत आला, अशा वेळी २००० सालानंतर मुंबई आणि उपनगरांमध्ये उभे राहिलेले अथवा सुरु झालेले नवीन चित्रपट स्टूडिओ महत्त्वाचे आहेत आणि त्यात एक स्टुडिओ हा यशराज स्टुडिओ.( YRF)
================================
हे देखील वाचा : Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….
================================
अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवर हा अद्ययावत असा स्टुडिओ आहे. २००६ साली तो कार्यरत झाला आणि आजच्या चित्रपट, मालिका, वेबसिरीज, अल्बम, जाहिरातपट यांच्या युगातील हा अतिशय उच्च दर्जाचा असा स्टुडिओ आहे. उच्च दर्जाच्या अत्याधुनिक तांत्रिक सुविधा हे या स्टुडिओचे विशेष. मेकअप रुमही मोठा आरसा अहसणारे आणि प्रशस्त. कार्पोरेट युगातील स्टुडिओ असल्याने त्याच्या सगळ्याच गोष्टी नियोजनबद्ध.इन सिंक रेकार्डिग स्टुडिओ हे एक वैशिष्ट्य.१, ४१,९३० असा चौरस फूट इतका भव्य असा हा स्टुडिओ आहे. यशराज स्टुडिओ म्हणजे यशराज फिल्म्स निर्मिती संस्थेचे पुढचे पाऊल.
यशराज फिल्म्स हे दिग्दर्शक यश चोप्रा यांचे सुपरिचित बॅनर. यश चोप्रा यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात आपले बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरखाली ‘धुल का फुल’ (१९५९) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाने केले आणि ‘इत्तफाक’ (१९६९) च्या यशानंतर यश चोप्रा यांनी बी. आर. फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली, तेव्हा चित्रपती व्ही. शांताराम यांनी यश चोप्रा यांना पूर्ण सहकार्य करत परेल येथील आपल्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत यशराज फिल्म्सच्या कार्यालयासाठी जागा दिली.

पहिला चित्रपट ‘दाग’. राजेश खन्ना, शर्मिला टागोर, राखी यांच्या प्रमुख भूमिका असलेला यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल १९७३ रोजी पडद्यावर आला तोच त्याचे पब्लिकने हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी स्वागत केले आणि यशराज फिल्म्सची यशस्वी घौडदौड सुरु झाली, आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ (१९९५) पर्यंत यशराज फिल्म्सचे कार्यालय राजकमल कलामंदिर स्टुडिओत होते. तेथेच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा मुहूर्त आणि काही चित्रपटाचे चित्रीकरण झाले.
त्यानंतर यशराज फिल्म्सचा सगळा कारभार जुहू येथील कार्यालयात सुरू झाला आणि २००५ पासून या यशराज स्टुडिओतून पुढचा प्रवास सुरू आहे. येथील पहिला चित्रपट ‘फनाह’ (२००६). त्यानंतर यशराज स्टुडिओने अनेक चित्रपटांची निर्मिती केली, त्या चित्रपटांचे आणि इतर चित्रपटांचे चित्रीकरण या यशराज स्टुडिओत झाले. ‘अलविदा ना कहेना’ (२००६), ‘दोस्ताना’ (२००८), ‘रा. वन’ (२००९), ‘थ्री इडियटस’ (२००९), ‘दबंग’ (२०१०), ‘बॉडिगार्ड’ (२०११), ‘चेन्नई एक्सप्रेस’ (२०१३), ‘पीके’ (२०१४) वगैरे वगैरे अनेक चित्रपट. ‘लागा चुनरी मे दाग’, ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’, ‘गुड न्यूज’, ‘कपूर ॲण्ड सन्स’ अशी अनेक नावे सांगता येतील ज्यांचे चित्रीकरण यशराज स्टुडिओत झाले. कौन बनेगा करोडपतीचा एक सिझन,काॅफी विथ करण, सत्यमेव जयते अशा टी. व्ही. शोचेही चित्रीकरण येथे झाले.

यशराज स्टुडिओतील मिनी थिएटर उच्च दर्जाचे. यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचे खेळ येथेच असतात. आणि येथे चित्रपट पाहण्याचा योग अतिशय सुखद असतो. साधारण पन्नास सीटसच्या या मिनी थिएटरमधील अद्ययावत तांत्रिक साऊंड सिस्टीममुळे चित्रपट ऐकण्याचाही सकारात्मक अनुभव मिळतो. विशेषतः आजच्या चित्रपटातील बॅक ग्राउंड संगीत अनेक दृश्ये बोलकी करत असल्याने तर साऊंड महत्वाचा फंडा. रानी मुखर्जीची डॅशिऺग भूमिका असलेल्या ‘ मर्दानी ३’ च्या वेळेसही असाच भन्नाट आणि भारी अनुभव आला. आजच्या डिजिटल युगात चित्रपट फक्त आणि फक्त पाहायचा नसतो तर तो पाहता पाहता अनुभवायचाही असतो आणि यशराज स्टुडिओची ती खासियत.

यशराज स्टुडिओत जाण्याचे योग तसे नेहमीचे. आणि त्यात प्रवेश करताना विचारपूसही. आत शिरताच उजव्या बाजूला छोटेसे देऊळ. आणि मग समोरच स्टुडिओची भव्य दिव्य दिमाखदार इमारत. त्याही पुढे गेल्यावरच्या इमारतीत तळमजल्यावर छान कॅफ्टेरिया आणि त्याच इमारतीत मिनी थिएटर. आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचे खेळ सकाळी अकरा वाजता असतात आणि तो संपल्यावर उंची खाना. मला अशा वेळी आठवतं ते राजकमल कलामंदिर स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये एकेकाळी यशराज फिल्म्स निर्मित चित्रपटांचे खेळ असेच सकाळी अकरा वाजता असत आणि संपल्यावर असाच खाना असे आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट प्रत्येक वेळी यश चोप्रा आम्हा चित्रपट समीक्षकाना भेटण्यासाठी येत. यश चोप्रा दिग्दर्शित मशाल, फासले या चित्रपटांचे आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचे खेळ येथेच झाले.
================================
हे देखील वाचा : NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….
================================
यशराज फिल्म्सच्या प्रगतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा यशराज स्टुडिओ. आणि मग चित्रपट वितरण, वेबसिरीज, ओटीटी असा विस्तार. मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या काळानुसार यशराज आपल्या दृष्टीकोनात आणि वाटचालीत महत्त्वाचे सकारात्मक बदल घडवत आहे. केवळ फ्लॅशबॅकमध्ये ते रमत नाहीत, तर नवीन वाटा स्वीकारत आपली वाटचाल अधिकाधिक फोकस्ड करीत आहेत. आदित्य चोप्रा आणि त्याची व्यावसायिक रणनीती सांभाळणारी टीम कौतुकास्पद वाटचाल करत आहे.

यशराज स्टुडिओत जाण्याचे योग अनेक. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या आम्हा चित्रपट पत्रकारांना भेटीचे आयोजन येथेच करण्यात आले होते. दूरचित्रवाणी संचाची आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीचे एक अतिशय माहितीपूर्ण आणि वैविध्यपूर्ण प्रदर्शन येथेच पाहायला मिळाले. त्यात त्रीमिती ( थ्री डी) दूरचित्रवाणी संच येथेच पाहायला मिळाला. मी १९८२ साली मिडियात आल्यावर माझा सगळाच फोकस प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीतील स्टुडिओ आणि रेकाॅर्डिग स्टुडिओ, चित्रीकरणासाठीचे बंगले यावर ठेवला आणि माझ्या त्याच वाटचालीतील हा यशराज स्टुडिओ. यशराज स्टुडिओची एक वेगळी आठवण, यशराज फिल्म्सचे जनक यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले तेव्हा त्यांचे पार्थिव याच स्टुडिओत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते….दुर्दैव असे की यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ‘ जब तक है जान ‘ त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला….