‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
यतीन… एक बहुआयामी, गुणी अभिनेते!!!
जाहीराती, मालिका, चित्रपट आणि आता वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले यतिन कार्येकर हे बहुआयामी अभिनेते आहेत. शांती या मालिकेनं त्यांना ओळख दिली.. तर मुन्नाभाई चित्रपटातील आनंदभाईच्या भूमिकेनं त्यांची अभिनय क्षमता सिद्ध झाली. आज या गुणी अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय….
आपला आनंदभाई…..
1994 साली ऑगस्ट महिन्यात दूरदर्शनवर एक हिंदी मालिका झळकली. ‘शांती’. या मालिकेनं अनेक रेकॉर्ड केले. दूरदर्शनवर दुपारी दोनच्या वेळी लागणारी आणि सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका म्हणून शांती कडे बघितलं जातं. शिवाय मंदिरा बेदीची ओळख या मालिकेतून झाली. आणखी एक नाव या मालिकेतून चर्चेत आलं… ते म्हणजे यतिन कार्येकर… या मराठी गुणी अभिनेत्यानं शांतीमध्ये कामेश महादेवन ही भूमिका केली. यात विशेष म्हणजे यतिन तेव्हा अवघ्या 25 वर्षाचे होते. आणि कामेश यांचे वय 60 दाखवण्यात आले होते. करिअरची सुरुवात अशा आव्हानात्मक मालिनकेनं करणारे यतिन त्यामुळे चर्चेत आले.
अभिनय आणि साहित्य यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबात यतिन यांचा जन्म झाला. त्यांच्या आई ज्योत्स्ना कार्येकर या अभिनेत्री होत्या. तर वडील डोळ्यांचे डॉक्टर. त्याचे आजोबा, म्हणजे वसंतराव कामेरकर हे ध्वनिमुद्रिका बनवणा-या एचएमव्ही कंपनीत कामाला होते. हे संपूर्ण कामेरकर कुटुंबच रंगभूमीबरोबर जोडलं गेलं होतं. ज्योत्स्ना कार्येकर यांना दहा भावंड होती. त्यांच्या बहिणी प्रेमा साखरदांडे, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या. भाऊ बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट, आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम केलेलं. आणखी एक बहिण कुमुद या गायिका. अशा समृद्ध आजोळी यतिन यांच्यावर अभिनयाचे संस्कार आपसूक होत गेले. कामेरकरांच्या घरी मान्यवर गायकांच्या मैफली आणि नाटकाच्या तालमी व्हायच्या. याचा प्रभाव घरातील मुलांवर असे. यतिन यांच्या आईचं शिक्षण सिद्धार्थ कॉलेजला झालं. तिथे लालन सारंग त्यांच्याबरोबर होत्या. या दोघींनी अनेक नाटकं केली. दादरला यतिन यांच्या आजोबांकडे गणपतीला मेळाच असायचा. त्यांच्याकडे सर्व नावाजलेले गायक, लेखक गणपतीला यायचे. गणपतीसमोर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. छोटी नाटकं व्हायची. गाणं व्हायचं. वादक असायचे. या सर्वांचे बालकडू आपसूकच घरातील लहानांना मिळत होतं. त्यामुळे पुढे यतिन यांनी अभिनयात करिअर करायचंय असं जाहीर केलं तेव्हा कोणाला आर्श्चय वाटलं नाही.
यतिन यांनी सुरुवातीला जाहीरातींमध्ये काम करायला सुरुवात केली. कॅप्टन कूकची जाहीरात केल्यावर सहज म्हणून ते स्टुडीओत गेले होते. तेव्हा त्यांना शांतीमधील भूमिकेसाठी विचारणा झाली. ही भूमिका साठ वर्षाच्या माणसाची आहे, हे कळल्यावर यतिन विचारात पडले होते. मात्र तेव्हा प्रिया तेंडूलकर त्यांच्या मदतीला आल्या. त्यांनी यतिनला या भूमिकेचं महत्त्व आणि त्यामागील आव्हान सांगितलं. आणि यतिन साठ वर्षाच्या कामेश महादेवनच्या भूमिकेत झळकले. तब्बल चार वर्ष चाललेल्या या मालिकेत आईला न्याय मिळवून देण्यासाठी झटणा-या एका महिला पत्रकारची कथा आहे. आपल्या ख-या वडीलांचा शोध आणि स्वतःची ओळख शोधण्यासाठी ही पत्रकार धडपडत असते. यामागचा सर्व मल्टी ड्रामा या मालिकेत आहे. दूरदर्शनवर पहिल्यांदा अशा स्वरुपाची मल्टी बजेट मालिका झळकली होती. त्यातील कथेची थाटणीही वेगळी होती. त्यामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यात यतिन यांनी केलेल्या साठ वर्षाच्या कमलेश महादेवन यांच्या भूमिकेचं कौतुक झालं. विशेष म्हणजे त्याच वेळी यतिन अनिल सहगल दिग्दर्शित ‘चट्टान’ ही मालिका करत होते. त्यात त्यांची भूमिका तरुण मुलाची होती. या दोन्ही मालिकांमधील फरक ते सहज पार करत असत.
दरम्यान यतिन यांचा जाहीरीती मधील प्रवास जोरदार चालू होता. त्यांनी राजकुमार हिरानी यांच्या प्रोडक्शन होऊस मधून अनेक जाहीराती केल्या. हिरानी यांनी चित्रपटनिर्मिती हाती घेतल्यावर यतिन यांना भेटयला बोलावले. आणि त्यांना मुन्ना भाई एमबीबीएस मधील आनंदभाईची भूमिका मिळाली. अत्यंत माफक संवाद… आणि डोळ्याचे हावभाव या जोरावर यतिन यांनी या आनंदभाईला अजरामर केला. इकबाल चित्रपटतील त्यांच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. नागेश कुकनूर यांनी या भूमिकेसाठी अनेकांच्या ऑडीशन घेतल्या होत्या. पण मुकबधिर मुलाचे वडील त्याच्याबरोबर कसा संवाद साधतील हे अचूक जाणून यतिन यांनी भूमिकेत काही बदल सुचवले आणि ही भुमिका त्यांना मिळाली. बाजीराव मस्तानीमध्येही या गुणी अभिनेत्यांनी केलेली कृष्णाजी भट यांची भूमिका खास ठरली. यतिन यांनी आत्तापर्यंत चाळीसहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यात काही तामिळ चित्रपटांचाही समावेश आहे.
मालिका विश्वात तर यतिन कार्येकर हे मोठं नाव आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी साकारलेला औरंगजेब कायम स्मरणात राहीला. याशिवाय ब्योमकेश बक्षी, थरार, सरस्वतीचंद्र सारख्या मालिकामधूनही यतिन यांच्या भूमिका गाजल्या. सध्या यतिन वेब सिरीजमधून आपल्या चाहत्यांना भेटत आहेत. या गुणी अभिनेत्याला पुढील कारकीर्दीसाठी कलाकृती मिडीयाच्या शुभेच्छा…