यह तो कमाल हो गया…..
१९९३ चा महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा.
स्थळ : रंगभवन, धोबीतलाव
या सोहळ्याचे विशेष म्हणजे, मराठी पुरस्कार सोहळ्यात नामांकन पध्दत सुरु झाली आणि त्यासह झगमगाट, ग्लॅमर, अधिक प्रमाणात गीत संगीत नृत्य यांची रेलचेल पण आली.
आता या महोत्सवाने कात टाकली असल्याने त्यासाठी ‘प्रमुख पाहुणा’ ही तसाच भारी हवा ना? तो होता, कमल हसन.
आता तो दक्षिणेकडील शिस्त आणि सवयीप्रमाणे या इव्हेन्टला वेळेवर आला आणि अगदी शांतपणे एकेक पुरस्कार आणि दरम्यानचा शो बघत होता.
आम्हा सिनेपत्रकारांना त्याच्यामागचीच तिसरी रांग दिली असल्याने कमल हसनचे हावभाव दिसत होते. एक पुरस्कार देण्यासाठी त्याला स्टेजवर बोलावले तेव्हा त्याला बोलायची संधी दिली नाही, शेवटी ती दिली जाईल असे निवेदक इंग्रजीत म्हणाला. त्यावर छान हसून कमल हसनने दाद दिली. पण आम्हा काही सिनेपत्रकाराना प्रश्न पडला होता, त्याला मराठी भाषा अजिबात समजत नसतानाही तो तीन तास एकाच जागी कसा बसून राहिल?
अखेरीस ती वेळ आली. कमल हसनने स्टेजवरुन समोरच्या उघड्या प्रेक्षागृहावर नजर फिरवली….. आणि एकेक शब्द जोडत जोडत मराठीत बोलायला सुरुवात केली. अर्थात, क्षणात प्रचंड टाळ्या पडल्याच (अशी कोणतीही मोठी माणसं मराठीत बोलली की मराठी मन आनंदणे स्वाभाविक आहे). आपण लहानपणी काही काळ सोलापूरला राहिल्याने थोडं थोडं मराठी बोलता येते असे म्हणतच त्याने छान इंग्रजीत बोलायला सुरुवात केली….
एल. व्ही. प्रसाद निर्मित आणि के. बालचंदर दिग्दर्शित ‘एक दुजे के लिए’ ( १९८१) च्या बहुचर्चित, खणखणीत यशाने कमल हसन दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतून देशाच्या विविध भागात पोहचला आणि त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला. यह तो कमाल हो गया, सनम तेरी कसम, यादगार, एक नयी पहेली असे त्याचे काही हिंदी चित्रपट आले. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ (१९८५) मुळे त्याचा चाहतावर्ग वाढला. तरी हिंदीपेक्षा त्याचे मन दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात रमले. आणि त्यातील ‘पुष्पक’ (हा चित्रपट संवादरहित होता आणि यातील त्याच्या ‘कमाल’ अभिनयाने सर्वभाषिक रसिकांची दाद मिळवली) अप्पू राजा (बुटका साकारला. मूळ तेलगू चित्रपट हिंदीत डब झाला) असा कमल हसन ‘पडद्यावर’ दिसायचा. मी एक प्रेक्षक (समिक्षक असलो तरी) आणि तो एक स्टार अशी पडद्यावर भेट व्हायची. ती देखिल सुखावणारी असे.
पण प्रत्यक्षातील भेटीचे काय?
पीआरओ ही तशी चित्रपटसृष्टीत डोकावायची खिडकी असे. सकारात्मक पाहिले की अनेक गोष्टी साध्य होतात आणि त्यात जर एखादा सिनेपत्रकारच एखाद्या चित्रपटाची प्रसिद्धी हाताळतो तेव्हा त्याला अनेक पत्रकारांची मानसिकता, या माध्यम व व्यवसायावरचे प्रेम याची चांगली कल्पना असते. ‘स्क्रीन’ या प्रतिष्ठित सिने साप्ताहिकात करिअर घडलेल्या पीटर मार्टीस याने ‘हे!राम’ ( २०००) या चित्रपटाच्या निमित्ताने कमल हसन भेटीचा स्वतंत्र योग घडवून आणला. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याचेच म्हणून तर ही भेट जास्त महत्वाची.
पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमधील रूममध्ये कमल हसन एकेका सिनेमा पत्रकाराला भेटत होता. मी माझा कॉल येईपर्यंत लॉबीत बसलो होतो. कमल हसनला नेमके काय प्रश्न करायचे याची मनातल्या मनात जुळणी/उजळणी करत होतो. माझा मुलाखत घेण्याचा जास्त भर ‘उत्तरावर प्रश्न’ असा असतो, त्यामुळे ऐकणे हा घटक माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो. यावेळी मी एकाच गोष्टीच्या विवंचनेत होतो, माझ्या अगोदरच्या पत्रकाराने कमल हसनचा मूड खराब करु नये….
सुदैवाने तसे काही झाले नाही. साधारण पंधरा वीस मिनिटांची मुलाखत घेताना प्रकर्षाने जाणवले ते त्याचे ‘फोकस्ड’ बोलणे. आपण ज्या चित्रपटाच्या निमित्ताने भेटलोय तेवढेच बोलूया हे पथ्य त्याने आपल्या बोलण्यातून जाणवून दिले. तात्पर्य, त्याने अमिताभ बच्चनसोबत ‘गिरफ्तार’ या चित्रपटात केलेली भूमिका, त्याचे ‘ते’ थोडं थोडं मराठी हे विषय अगदीच सहज बाद…..
कामासाठी भेटावे, आपल्या कामावरच बोलावे अशा स्वभाव आणि सवयीचे कळत नकळतपणे फायदे खूप असतात हे कमल हसनच्या भेटीतून शिकता आले…..
दिलीप ठाकूर