
‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman
संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं होतं. नुकतीच ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांची झलक समोर आली असून यात संत तुकारामांची भूमिका अभिनेते योगेश सोमण साकारणार आहेत… तर, त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात की, ‘तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे”.

‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.
================================
हे देखील वाचा: Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!
=================================
मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी , अजय पुरकर, अवधूत गांधी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचन्द्र, नुपूर दैठणकर, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे, तेजस बर्वे आदि कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi