जिंदगी ना मिलेगी दोबारा- एक ब्रेक तो बनता है
८४ लक्ष योनीतून गेल्यावर एक मानव जन्म मिळतो असं म्हणतात. त्यामुळे या एका जन्माचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे असं आपण ऐकतो वाचतो. याचाच चित्रमय अनुभव म्हणजे चित्रपट जिंदगी ना मिलेगी दोबारा.
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ ने तीन मित्रांची अनोखी कहाणी वेगळ्या शैलीत मांडली होती. त्यामुळे १५ जुलै २०११ ला प्रदर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपट त्याच धर्तीवर असावा असा अनेकांचा अंदाज होता. पण त्यापलीकडे तीन मित्रांची गोष्ट, त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन या चित्रपटाने मांडला. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले.
या चित्रपटाचं बरचंसं शुटींग स्पेनमध्ये झालं आहे.त्याआधी खरंतर मॅक्सीकोचा विचार झाला होता. पण चित्रपटाशेवटीच्या बुल रनिंगसाठी स्पेनमध्ये शुटींग करायचं ठरलं. चित्रपटाचं आधीचं नाव ‘रनिंग विथ द बुल’ असं होतं. जे बदलून ‘रॉक ऑन’ या चित्रपटातील जिंदगी ना मिलेगी दोबारा या गीतावरुन निश्चित केलं गेलं. या चित्रपटातील फरहान अख्तर, ॠतिक रोशन, अभय देओल या तिन्ही नायकांची अदाकारी प्रेक्षकांना बेहद्द आवडली. पण प्रत्यक्षात इम्रान खान आणि रणवीर सिंग यांना या भूमिकेसाठी विचारलं गेलं होतं. त्यांनी नकार दिल्याने तिथे ऋतिक आणि अभयची एंट्री झाली.
हा चित्रपट एक रोड मुव्ही आहे.पूर्ण चित्रपटाच्या शुटींग दरम्यान जवळपास १५०० कि.मी.चा प्रवास झाला. स्काय डायव्हिंग,स्कुबा डायव्हिंग आणि बुल रनिंग ही तीन साहसं या तीन नायकांनी पार पडली.त्यापैकी स्काय डायव्हिंगचा थरार फरहानने घेतला होता पण ऋतिक आणि अभयने तो पहिल्यांदाच अनुभवला. स्कुबा डायव्हिंग चित्रीत करण्याआधी या मंडळींनी स्विमींग पूलमध्ये सराव केला. त्यानंतर स्कुबा डायव्हिंग शूट झालं. गंमत म्हणजे शूटींगनंतर ३ आठवड्यांनीच हा सागरी भाग शार्क हल्ल्यामुळे बंद केला गेला.
हा चित्रपट परफेक्ट होण्यासाठी सगळ्यांनीच बारीकसारीक गोष्टींची खबरदारी घेतली. १५०० कि.मी रोड ट्रीप करुन कोणी चिकणंचुपडं दिसू शकत नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या सिनेमेटोग्राफरने तिघा नायकांना पहिले टॅन व्हायला लावलं.
हे हि वाचा : अंदाज अपना अपना.. फ्लॉप का हिट
या चित्रपटातील सगळीच गाणी भन्नाट गाजली. पण ‘सॅनोरीटा’चा स्पेशल फॅनक्लब आहे. या गाण्यात तिन्ही नायकांचा आवाज वापरण्यात आला. फरहान तर उत्तम गातो. पण ऋतिक आणि अभय दोघं हे गाणं गायला खूप नर्व्हस होते. संगीतकार शंकर महादेवन यांनी आपण रफटेक करु असं सांगत अभयला गायला लावलं. प्रत्यक्षात तो रफ कटच गाण्यात वापरला गेला. ऋतिकला तर गायचं आहे याची कल्पनाच नव्हती. त्याला गाणं ऐकायला स्टुडीयोत बोलावून थेट गायलाच लावलं. हे गाणं स्पेनच्या छोट्याशा खेड्यात ३ रात्री ७-८ तासांमध्ये चित्रीत झालं. शेवटच्या दिवशी तिथले मेयरही चित्रीकरणात सहभागी झाले.
चित्रपटात टोमॅटिनो फेस्टीवल दाखवला असला तरी ख-याखु-या फेस्टीवलमध्ये शुटींग शक्य नव्हतं. १६ टन टोमॅटो वापरुन हा माहोल तयार करण्यात आला.
ह्या चित्रपटाने भारतातच नाही तर जगभरात तुफान कमाई केली. ५९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला बेस्ट कोरीओग्राफी आणि बेस्ट ऑडीओग्राफी पुरस्कार मिळाले.
जगण्यासाठी धडपड करत असताना एक ब्रेक जरुरी है हा संदेश देणा-या या चित्रपटाने अनेकांना आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढण्यासाठी प्रेरीत करताना जगण्याचं वास्तव पुन्हा अधोरेखित केलं… सचमें जिंदगी ना मिलेगी दोबारा’