दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
2022 च्या बॉक्स ऑफीसवर बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडचं वर्चस्व!
2022 हे वर्ष कसं होतं. कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या या वर्षानं बॉलिवूडमध्ये उलटापालट केली आहे. कोरोनाच्या सावटाखाली गेलेल्या या वर्षी प्रेक्षकांसाठी मोठा पडदा खुला झाला. ओटीटीच्या छायेखाली गेलेला प्रेक्षकवर्ग पुन्हा मोठया पडद्याकडे वळला. मात्र या प्रेक्षकांना साथ देण्यासाठी बॉलिवूडमध्ये तेवढ्या दर्जाचे चित्रपट झाले नाहीत. वर्षभरात अगदी हातावर मोजण्यासारखे चित्रपट सोडले तर बाकी बॉलिवूड या वर्षी फ्लॉपच्या छायेखालीच वावरले. अगदी मोठे स्टार्सही अपयशी ठरले. अमीर खान, अक्षय कुमारसारखे बॉलिवूडचे हक्काचे स्टार बॉलिवूडला यश देऊ शकले नाहीत. मात्र विवेक अग्निहोत्रीच्या काश्मिर फाईल्सला मिळालेलं यश अनोखं ठरलं. बॉलिवूडला अपयशानं ग्रासलं असलं तरी टॉलिवूड अर्थात दक्षिणी चित्रपटांनी यशाचे नवे शिखर गाठले. KGF, आरआरआर, कांतारासारख्या चित्रपटांनी हिंदी प्रेक्षकांनाही वेड लावलं. एकूण बॉलिवूडसाठी 2022 साधारण ठरलं. कोविडचा उद्रेक झाल्यानंतर बंद झालेली चित्रपटगृह यावर्षात प्रेक्षकांसाठी उघडण्यात आली. ही चित्रपटसृष्टीसाठी सर्वात चांगली गोष्ट ठरली. ओटीटीच्या माध्यमातून चित्रपट बघण्याची सवय लागलेला प्रेक्षकवर्ग पुन्हा काही प्रमाणात मोठ्या पडद्याकडे वळला. काही निर्बंध वगळता चित्रपटगृहांमध्येही गर्दी होऊ लागली. पण ब्लॉकबस्टरचा हंगाम मात्र हिंदी पेक्षा दाक्षिणी चित्रपटांना मिळाला.
या चित्रपटांमध्ये पहिला नंबर लागला तो रॉकीभाईच्या KGF 2 चा. 150 कोटीचे बजेट असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर (Box Office) 1228.3 कोटींची कमाई केली. KGF-1 चा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. रॉकीभाईची जादू एवढी चालली की हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला. कन्नड चित्रपटसृष्टीच्या या चित्रपटाने बॉलीवूडलाही मागे टाकले. त्यानंतर दबदबा होता आरआरआर या चित्रपटाचा. एसएस राजमौलीच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत होता. 425 कोटींचं बजेट या चित्रपटाचं होतं आणि त्यानं कमाई केली 1131.1 कोटींची. जूनिअर एनटीआर आणि राम चरण या जोडीनं आपल्या अभिनयानं आणि अक्शननं प्रेक्षकांची मनं जिंकली. 1920 च्या दशकावर आधारित हा चित्रपट दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा आहे. चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स अप्रतिम ठरले.
त्यानंतर अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा बॉलिवूडपट आला. 315 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटानं 412.7 कोटींची कमाई केली. हा चित्रपट गाजला तो अनेक कारणांनी. मुळात चित्रपट होण्यासाठी तब्बल पाच वर्ष लागली. चित्रपटाला बॉयकॉटच्या चक्रातून जावे लागले. रणवीर कपूर आणि आलियाच्या जोडीवर खूप टिकाही झाली. त्यामुळेच ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाल्यानंतर संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण कलेक्शननुसार पाहिलं तर तो या वर्षातील सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. ब्रह्मास्त्रचे स्पेशल इफेक्ट त्याचे तारक ठरले. दक्षिण भारतीय चित्रपामध्ये आणखी एक चित्रपटांनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तो चित्रपट म्हणजे विक्रम. ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांचा हा चित्रपट हुकूमाचा एक्का ठरला. 115 कोटींचे बजेट आणि 424 कोटींची (Box Office) कमाई केलेला हा चित्रपट कमल हसन यांच्या कारकीर्दीमधला महत्त्वाचा चित्रपट म्हणावा लागले. यानंतर आलेल्या आणखी एका दक्षिण भारतीय चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्याचे भव्य सेट आणि तत्कालिन कपडे, दागिने यांची चर्चा अनेक दिवस राहिली. हा चित्रपट म्हणजे, पोन्नियिन सेल्वन – भाग 1. या चित्रपटाचे बजेट होते 210 कोटींचे आणि चित्रपटानं कमाई केली 500.8 कोटींची. PS-1 हा चोल साम्राज्यावर आधारित चित्रपट मणिरत्नम यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा राज सिंहासन यांची आहे. या चित्रपटातील वेशभूषेचे खूप कौतुक झाले. यात ऐश्वर्या राय दुहेरी भूमिकेत आहे. PS-1 च्या दुस-या भागाची नुकतीच घोषणा झाली आहे. नव्या वर्षात PS-1 चा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता आहे.
बॉलिवूडचा तारणहार ठरला तो चित्रपट म्हणजे काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर आधारीत असलेला हा चित्रपट एकाच नाण्याच्या दोन बाजुंसारखा ठरला. अनेकांनी त्याच्यावर टिका केली. तर दुसरीकडे काश्मिरी पंडितांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दिली. विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला. मात्र बॉक्सऑफीसवर 344.2 कोटींची कमाई करुन हा चित्रपट अग्रेसर ठरला. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा या चित्रपटात मांडण्यात आली. या चित्रपटाला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढेच वादही झाले. अगदी अलिकडे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही चित्रपटावर इस्त्रायली दिग्दर्शकानं टिका केली आणि त्यावर इस्त्रायली राजदूतांनी भारताकडे माफी व्यक्त केली होती.(Box Office)
कांतारा या कन्नड लोककथेवर आधारित हा चित्रपटानं पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची वेगळी नजर प्रेक्षकांसमोर सादर केली. अगदी 15 कोटी मध्ये झालेल्या या चित्रपटानं 340 कोटींची टप्पा ओलांडला. अगदी मुलभूत कथा…लोककथा…मुळात यावर चित्रपट होऊ शकेल आणि तो एवढा सुंदर असेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र कांतारानं भाषेच्या मर्यादा ओलांडल्या. भारतीय चित्रपटाचं अपूर्वरुप यातून दिसलं. ऑस्करसाठीही कांतारा गेल्यामुळे भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत. या चित्रपटात भूत कोला नावाचा उत्सव दाखवला गेला आहे. चित्रपटाचे मुख्य पात्र शिव आहे जो आपल्या गावाला वाचवतो.
भूल भुलैया 2 या कार्तिक आर्यनच्या चित्रपटानं हिंदीमध्ये चांगली हलचल केली. 75 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट 263.9 कोटींची कमाई करुन गेला. कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपटही लोकांना आवडला. हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट आर्यन कार्तिकसाठी महत्त्वाचा ठरला. संजय लीला भन्सालीचा रखडलेला गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट अपेक्षित अशी कमाई करु शकला नाही पण साधारण यशस्वी ठरला. गंगूबाई काठियावाडीचे बजेट 125 कोटींचे होते. त्यानं बॉक्स ऑफीसवर (Box Office) 203.9 कोटींची कमाई केली.
=======
हे देखील वाचा : झेप अभी बाकी है मेरे दोस्त!
=======
2022 हे वर्ष ख-या अर्थानं दक्षिण भारतीय चित्रपटांचे ठरले. दोन किंवा तीन चित्रपट वगळता सर्वच बॉलीवूड फ्लॉपच्या लेबलखाली राहिले. सर्वात मोठा फ्लॉप ठरला अमिर खानचा लालसिंग चढ्ढा. बराच गाजावजा झालेला हा चित्रपट करिश्मा कपूर आणि अमिर खान यांचा सर्वाधिक फ्लॉप चित्रपट ठरला. याशिवाय तापसी पन्नूचा लूप लपेटा, दिपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वैदी आणि अनन्या पांडेचा गेहराईयां हे चित्रपट चर्चेत राहिले पण प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाहीत. नागराज मंजुळेंचा अमिताभ बच्चन यांना घेऊन केलेला झुंडही फारसा चालला नाही. प्रभास आणि पुजा हेगडेचा राधे श्याम जेवढा चर्चेत राहिला तेवढा बॉक्स ऑफीसवर(Box Office) जादू दाखवू शकला नाही. यावर्षी सर्वाधिक फटका बसला तो अक्षय कुमारला. अक्षयचा बच्चन पांडे, रामसेतू या चित्रपटांना प्रेक्षकांनी पाठ दाखवली. त्यामानानं आर माधवनचा रॉकेट्री-द नांबी इफेक्ट याला चांगलं यश मिळालं. या वर्षाच्या शेवटचा फटका मोठ्या बॅनरच्या चित्रपटांना बसला त्यामध्ये रोहीत शेट्टीचा सर्कस, करण मल्होत्रा, रणबीर कपूर, संयज दत्तचा शमशेरा, विजय देवेरकौडा, अनन्या पांडेचा लिगर आणि सैफ अली आणि ऋतिक रोशनचा विक्रम वेधा यांचा समावेश झाला.
बॉलिवूडला लागलेलं ग्रहण अजय देवगणच्या दृष्यम-2 नंतर थोडं कमी झालं होतं. अजय देवगणच्या दृष्यम-2ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. अगदी दोन आठवड्यांपर्यंत या चित्रपटाचं कलेक्शन चढतं राहिलं. पण वर्षाच्या अखेरच्या पंधरा दिवसात हॉलिवूडपट अवतार-2 नं पुन्हा सर्व हिंदी चित्रपटांना चितपट केलं. आता हा हॉलिवूडपट बॉक्स ऑफीसवर (Box Office) तुफान कमाई करत आहे. 2022 च्या बॉक्स ऑफीसवर बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडचं वर्चस्व होतं. आता पुढच्या वर्षीही अशीच परिस्थिती राहिल अशी अपेक्षा आहे. पुढच्या वर्षी बॉलिवूडचे पठाण, आदिपुरुष, शेहजादा, सालर, रॉकी और रानी की प्रेम कहानी, मैदान हे चित्रपट रांगेत आहेत. पण यासोबत टॉलिवूडचा पीएस टू हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या या लढाईत प्रेक्षकांचा कल कोणाकडे राहिल हे बघण्यासारखे आहे. शिवाय यासर्वात अवतार या हॉलिवूडपटाचा तिसरा भागही येत आहे. त्यामुळेच बॉलिवूडला यशासाठी तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.
सई बने