चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या ‘प्रभात चित्र मंडळ’चं यंदा ५५व्या वर्षात होतंय पदार्पण
५ जुलै १९६८ रोजी प्रभात चित्र मंडळाची स्थापना झाली. चित्रपट प्रसिद्धीकुशल पत्रकार वसंत साठे यांच्या नेतृत्त्वाखाली आणि सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल, जयंत धर्माधिकारी यांच्या सहयोगाने स्थापन झालेल्या या संस्थेचं मुख्य ध्येय होतं ते जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणे. गेल्या पन्नास वर्षांहूनही अधिक काळ हे कार्य अविरतपणे सुरू आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात फिल्म कंपनी’चे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात आलेल्या या संस्थेचं सिनेरसिकांना कायम स्मरण राहावं म्हणून संस्थापकांनी या फिल्म सोसायटीला ‘प्रभात चित्र मंडळ’ (Prabhat Chitra Mandal) असं नाव दिलं. किरण व्ही. शांताराम, संतोष पाठारे, गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, यांचंही प्रभातच्या सध्याच्या वाटचालीत मोलाचं योगदान आहे. वास्तव रुपवाणी हे नियतकालिक गेली २८ वर्षे प्रभातच्या वाटचालीचा एक अविभाज्य भाग आहे.
गेली ५० दशकांहूनही अधिक काळ चित्रपटसृष्टीशी जोडलं गेलेलं ‘प्रभात चित्र मंडळ’ (Prabhat Chitra Mandal) यावर्षी ५ जुलै रोजी आपला ५५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने ठाणे येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे यामध्ये ‘मासा’ या लघुपटाचं प्रसारण करण्यात येणार आहे. फुलवा खामकर दिग्दर्शित ‘मासा’ या लघुपटात अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या व्यतिरिक्त या कार्यक्रमामध्ये ‘सिनेमा टू ओटीटी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. भारतीयांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीला महत्त्वाचं स्थान आहे. मनोरंजनाच्या दुनियेत आज कित्येक पर्याय उपलब्ध असताना रसिकांच्या मनात चित्रपटांबद्दलचं आकर्षण आजही कायम आहे. आजच्या ‘ओटीटी आणि डेली सोप’च्या जमान्यातही रसिक चित्रपटांवरही तेवढंच प्रेम करतात. परंतु हे प्रेम असंच कायम राहील का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यादृष्टीने विचार करता परिसंवादाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. (Prabhat Chitra Mandal)
या परिसंवादात रेगे, ठाकरे अशा हटक्या विषयांवर आधारित चित्रपटांचे आणि सध्या चर्चेत असणाऱ्या ‘रान बाजार’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक अभिजित पानसे, चित्रपट समीक्षक अमोल परचुरे, दिग्दर्शक विशाल फुरीया आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार सहभागी होणार आहेत. कलाकृती मिडिया ॲानलाईन पार्टनर म्हणून या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे. (Prabhat Chitra Mandal)
प्रभात चित्र संस्था (Prabhat Chitra Mandal) – ५५ वा वर्धापन दिन
वेळ: मंगळवार ५ जुलै; संध्याकाळी ६.३० वा.
पत्ता: बाळासाहेब ठाकरे स्मृती सभागृह,
ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ,
तीन हात नाका, ठाणे (प.)