‘या’ मराठी चित्रपटांचे बनले आहेत दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक
मराठीमधील चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये रिमेक बनतात ही गोष्ट काही नवीन नाही. अलीकडेच सैराट (धडक), लपाछपी (छोरी), मुळशी पॅटर्न (अंतिम – द फायनल ट्रुथ) अशा काही लोकप्रिय मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनून प्रदर्षितही झाले आहेत. पण मराठी चित्रपटांचे केवळ हिंदी नाही, तर भारतातील इतर प्रादेशिक भाषांमध्येही रिमेक केले जातात. यामध्ये मराठी चित्रपटांचे दाक्षिणात्य भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिमेक करण्यात आले आहेत. या लेखात अशाच काही लोकप्रिय चित्रपटांची माहिती घेऊया. (Marathi films remade in South)
डोंबिवली फास्ट
२००५ साली आलेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक होते निशिकांत कामत. या चित्रपटात संदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर, संजय जाधव मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. तसंच चित्रपटाला देशात आणि परदेशातही अनेक अवॉर्ड्स मिळाली होती.
या चित्रपटाचा तामिळ रिमेक स्वतः निशिकांत कामत यांनीच बनवला होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. रिमेक केलेल्या तामिळ चित्रपटाचं नाव होतं ‘इव्हानो ओरुवन (Evano Oruvan)’. यामध्ये आर माधवन याने प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपट अर्थातच सुपरहिट झाला होता.
मुंबई पुणे मुंबई
सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी व मुक्त बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०१० साली आलेला हा चित्रपट एवढा यशस्वी झाला होता की, चित्रपटाचे पुढे दोन भागही प्रर्दर्शीत केले गेले. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.
मुंबई पुणे मुंबई चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘मुंबई दिल्ली मुंबई’ या नावाने प्रदर्शित झाला आहे, हे तर सर्वानाच माहिती असेल. पण या चित्रपटाचा कन्नड रिमेक ‘प्यारगे आगबित्तेत (Pyarge Aagbittaite)’ या नावाने, तर तेलगू रिमेक ‘मेड इन विझाग (Made in Vizag)’ या नावाने प्रदर्शित करण्यात आले होते. मुंबई पुणे मुंबई प्रमाणेच हे दोन्ही चित्रपटही सुपरहिट झाले होते. (Marathi films remade in South)
टाईमपास
रवी जाधव दिग्दर्शित २०१४ साली आलेला टाईमपास या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत होते, तर वैभव मांगले, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर, मेघना एरंडे महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपट, यातील डायलॉग्ज व गाणी या तिन्ही गोष्टी सुपरहिट झाल्या होत्या. पुढे २०१५ साली चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाचा तेलगू रिमेक ‘आंध्रा पोरी (Andhra Pori)’ या नावाने करण्यात आला होता. या चित्रपटानेही चांगली कमाई केली होती.
लय भारी
२०१४ साली आलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ हा चित्रपट रितेश देशमुखच्या पहिला वहिला मराठी चित्रपट होता. घरचीच निर्मिती असलेल्या या चित्रपटात रितेश देशमुखने दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपट, यातील काही डायलॉग्ज व यातील गाणी तेव्हा कमालीची लोकप्रिय झाली होती. यामध्ये रितेश देशमुख व्यतिरिक्त शरद केळकर, उदय टिकेकर, तन्वी आझमी, राधिका आपटे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘लय भारी’ हा चित्रपटाचा ओडिसा भाषेत रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचं नाव होतं ‘जगा हातरे पाघा (Jaga Hatare Pagha)’ तिकडेही हा चित्रपट यशस्वी झाला होता. या चित्रपटात अनुभव मोहंती आणि एलिना सामंत्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi films remade in South)
हॅपी जर्नी
सचिन कुंडलकर दिग्दर्शित २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटात अतुल कुलकर्णी, प्रिया बापट व पल्लवी सुभाष मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला सुपरहिट नाही, पण हिट चित्रपट नक्की म्हणता येईल.
या चित्रपटाचा ‘कूडे (Koode)’ या नावाने प्रदर्शित झालेल्या मल्याळी रिमेकला मात्र प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘कूडे (Koode)’ हा चित्रपट सुपरहिट तर झालाच, शिवाय अनेक अवॉर्ड्स या चित्रपटाला मिळाली.
नटसम्राट
२०१६ साली प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा चित्रपट वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकावर आधारित होता. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, अजित परब, नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. तसंच, त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा झी गौरव पुरस्कार व इतरही पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते.
या चित्रपटाचा गुजराती भाषेत ‘नटसम्राट’ याच नावाने तर, तेलगू मध्ये ‘रंगमार्थंड’ या नावाने रिमेक करण्यात आला होता. हे दोन्ही चित्रपट लोकप्रिय ठरले होते (Marathi films remade in South)
दुनियादारी
२०१३ साली आलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित होता. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्या वर्षीचा सुपर डुपर हिट चित्रपट होता. तसंच या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. (Marathi films remade in South)
=======
हे ही वाचा: सहकुटुंब बघता येतील अशा टॉप ५ वेबसीरिज
लपाछपी: थरारक, रहस्यमय, उत्कट आणि भीतीदायक
=======
या चित्रपटाचा कन्नड मध्ये ‘नूरोंदु नेनापु (Noorondu Nenapu)’, तर गुजरातीमध्ये ‘दुनियादारी’ याच नावाने रिमेक करण्यात आला होता. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते.
========
हे ही वाचा: मेटाव्हर्स: मनोरंजन क्षेत्रासमोर आभासी तंत्रज्ञानाचं नवं आव्हान
सौदीमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली, हॉलिवूडसाठी मात्र पायघड्या
=======