धाकडवर भारी पडला हंबीरराव…प्रवीण तरडेंमुळे कंगनावर आली ही वेळ…
“मराठी पाऊल पडते पुढे…” याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून येतच होती, पण आता तर मराठी पावलं सुसाट वेगानं धावायला लागली आहेत आणि त्याचा फटका बसलाय आपल्या कंगना ताईंना. नेहमीच काहीतरी सनसनाटी विधानं करून चर्चेत राहणाऱ्या ताईंवर आता रडायची वेळ आली आहे. याला कारण म्हणजे ताईंचा बहुचर्चित ‘धाकड’ सिनेमा पार तोंडावर आपटलाय. पण गोष्ट इथेच संपली नाही.
धाकड सिनेमाची सुरवातच तशी खराबच झाली. हा भव्यदिव्य बिगबजेट सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला, पण तो बघायला सिनेमागृहात फारसे प्रेक्षकच नव्हते. एक दिवस तर बुकिंग न झाल्याने सिनेमाचा खेळ रद्द करावा लागला. मराठी सिनेमांसाठी या अशा गोष्ट नवीन नाहीत, पण बॉलिवूडच्या इतिहासात असं क्वचितच कधी झालं असेल आणि ते नेमकं कंगना ताईंच्या सिनेमाच्या बाबतीत घडलं.
आता धाकडची एवढी वाईट अवस्था कोणी केली, तर प्रवीण तरडेंनी! म्हणजेच त्यांच्या ‘सर सेनापती हंबीरराव’ या सिनेमाने! धाकड नंतर आठवड्याभराने म्हणजेच २७ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी १ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली. प्रवीण तरडेंनी नुकतंच फेसबुक लाइव्ह येऊन सिनेमाच्या यशाची आकडेवारी सांगितली आहे. (Sarsenapati Hambirrao vs Dhaakad)
‘सर सेनापती हंबीरराव’ सिनेमाच्या कमाईपुढे धाकडची कमाई अगदीच ‘अतिसामान्य’ म्हणावी इतकी कमी आहे. गेल्या रविवारी अख्ख्या भारतभरात १० हजार रुपयांची कमाईही हा सिनेमा करू शकला नाही. १०० कोटी खर्चून बनवलेला हा सिनेमा पार डब्यातच गेला की! (Sarsenapati Hambirrao vs Dhaakad)
एकीकडे ‘धाकड’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, तर दुसरीकडे.सर सेनापती हंबीरराव आणि ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ तुफान गर्दीत सुरु आहेत. अलीकडेच एका चाहत्याने ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा निवांत बघता यावा, म्हणून अख्ख थिएटर बुक केलं होतं.
अगदी पावनखिंड पासून मराठी सिनेमांना सुगीचे दिवस आले आहेत. चंद्रमुखीपासून तर मराठी सिनेमांची ‘लै भारी’ घोडदौड चालू आहे. इतके दिवस दाक्षिणात्य सिनेमे बॉलिवूडवर भारी पडत होते. पण आता मराठी सिनेमांच्या जबरदस्त स्पर्धेलाही बॉलिवुडवासीयांना तोंड द्यावं लागणार आहे. मराठी प्रेक्षक आता मराठी बाणा दाखवणाऱ्या सिनेमांना डोक्यावर घेऊ लागलाय.
======
हे ही वाचा: ‘युट्युब’वरील पायरसीविरुद्ध जपानी निर्मात्यांची एकजूट
‘या’ कारणासाठी बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकाने गोळ्या झाडून कुटुंबाला आणि स्वतःला देखील संपवलं….
======
कंगनानंतर आता पुढचा फटका कोणाला बसणार, हे येणार काळच ठरवेल. आजच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमालाही याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे जर का असंच जर चालत राहिलं तर, “तेरा क्या होगा बॉलिवूड?”