नयनताराचे शुभमंगल: सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर घेतला लग्नाचा निर्णय
बॉलिवूडमधील लग्नसमारंभानंतर आता टॉलिवूडमध्येही सनईचे सूर आळवले जाऊ लागले आहेत. टॉलिवूडमध्ये लेडीसुपरस्टार म्हणून दबदबा असणारी ‘नयनतारा’ दिग्दर्शक विग्नेश विजन यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नाला अवघं टॉलिवूड अवतरलं होतंच, शिवाय बॉलिवूडमधील मान्यवर कलावंतही उपस्थित होते. नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाचा स्वागत समारंभ मोठा खर्चिक होणार असून सध्या सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)
महाबलिपुरम येथे एका शानदार हॉटेलमध्ये नयनतारानं विग्नेशसोबत सातफेरे घेतले. आता या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी अवघं टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र येणार आहे. नयनतारा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील वलयांकित नाव. नयताराने आत्तापर्यंत तामिळ, तेलुगु, मल्याळम अशा 75 चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.
मल्याळम चित्रपट मनसिनक्करे मधून नयनतारानं 2003 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर हिट चित्रपटांबरोबर तिची प्रेमप्रकरणंही गाजली. यामुळे नयनतारा हे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये कायम प्रकाशझोतात राहिलं. तिचं नाव तिच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि प्रेमप्रकरणांमुळेही बरेच गाजले आहे.
नयनतारानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अभिनेता सिलंबरासन राजेंदर सोबतचं तिचं नातं गाजलं. मात्र दुबई येथील एका चित्रीकरणादरम्यान या दोघांचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर आले आणि त्यातूनच हे नातं दुरावलं. यानंतर नयनताराच्या आयुष्यात अभिनेता प्रभुदेवाची एंट्री झाली. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)
सन 2008 मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनीही गुप्तपणे विवाह केल्याच्या बातम्याही आल्या. प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्यानं तिच्या नावाचा टॅटूही काढला. अर्थात नयानताराचेही प्रभुदेवावर प्रेम होते. त्यामुळेच ख्रिश्चन असलेल्या नयानतारानं 2011 मध्ये हिंदू धर्माचा स्विकार केला. मात्र या प्रेमप्रकणात प्रभुदेवाची पत्नी, लता मध्ये आली. प्रभुदेवाला घटस्फोट द्यायला तिने नकार दिला. तसंच मुलांची जबाबदारीही प्रभुदेवा घेत नसल्याचा आरोप तिनं केला. लतानं प्रभुदेवाविरोधात कोर्टात धाव घेतली. ही केस खूप गाजली.
दाक्षिणात्य जनतेला आपल्या हिरोनं असं विवाह मोडून दुसरं लग्न करणं मान्य झालं नाही. जनमत लताच्या बाजूनं होतं. त्यात लोकांनी नयनताराला व्हिलनची उपमा दिली. तिचा धिक्कार होऊ लागला. अगदी तिच्याविरोधात मोर्चेही निघाले. या सर्वांमुळे नयनतारानं माघार घेतली. प्रभुदेवासोबत लग्नाच्या निर्णयापर्यंत आलेली नयनतारा या सर्वांपासून दूर म्हणजे, अभिनयापासूनही काही काळ दूर गेली. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)
त्यानंतर नयनताराच्या आयुष्यात 2015 मध्ये विग्नेश या चित्रपट दिग्दर्शकाची एन्ट्री झाली. सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विग्नेश हा प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक असून त्याचा कथुवाकुला रेंडुकधल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात विजय सेतुपति, नयनतारा आणि समंथा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय विग्नेशचा O2 हा चित्रपट 17 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. यातही नयनतारा प्रमुख भूमिकेत आहे. याबरोबरच नयनतारा आणि विग्नेश आगामी एके 62 या चित्रपटाचं चित्रीकरण करत असून, हा चित्रपटही लवकरच मोठ्या पडद्यावर येईल.
नयनताराचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे वडील एअर फोर्समध्ये ऑफीसर होते. त्यामुळे तिचे शालेय शिक्षण चेन्नई, जामनगर, दिल्ली, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे. यामुळेच नयनतारा अनेक भाषा बोलू शकते. चित्रपटात आल्यावर या भाषाबहुल्याचा तिला फायदा झाला. अर्थात तिला चित्रपटात करिअर करण्याची इच्छा नव्हती. तिला सीए व्हायचं होतं. मात्र कॉलेजमध्ये असताना तिला मनसिनक्करे चित्रपटाची ऑफर आली. हा चित्रपट हिट ठरल्यानं नयनतारा शिक्षणाला रामराम ठोकून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्थिरावली. पुढे कन्नड, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम चित्रपटात नयनतारा नावाची जादू कायम राहिली. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)
==========
हे देखील वाचा – या पाकिस्तानी चाहत्यामुळे हेमा मालिनीने गमावली आपली जवळची व्यक्ती..
==========
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री म्हणूनही नयनताराचा उल्लेख केला जातो. नयनतारा, 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 या लिस्टमध्ये सामिल झालेली पहिली दाक्षिणात्य अभिनेत्री होती.
याच नयनताराच्या लग्नाची आणि स्वागत समारंभाची धूम सध्या चालू आहे. त्यासाठी शाहरुख खाननंही उपस्थिती लावली आहे. शाहरुख आणि नयनतारा ही जोडी ‘जवान’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. याबरोबरच रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपति, समंथा, रुथ प्रभु असे सर्व कलाकार या समारंभात सहभागी होतील. याशिवाय या समारंभाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिनही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)