दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिवाना: जेव्हा दिव्या भारती घाबरून तब्बल एक तास गाडीत बसून राहिली…
ती आली, तिने जिंकलं आणि ती गेलीही…! नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये आलेल्या एका अभिनेत्रीने आपल्या निस्सीम सौंदर्याने सिनेरसिकांना वेड लावलं होतं. ही अभिनेत्री होती दिव्या भारती. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ‘निला पेन्ना’ तामिळ चित्रपटामधून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या दिव्याचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं. ‘अपघाती मृत्यू’ अशी तिच्या मृत्यूची नोंद झाली असली तरी, प्रत्यक्षात मात्र तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.
दिव्या भारतीने १९९१ साली ‘विश्वात्मा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९९२ सालच्या ‘दिवाना’ या चित्रपटामुळे. ‘दिवाना’मधली तिची ‘काजल’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाने चित्रपटसृष्टीला शाहरुख नावाचा सुपरस्टारही मिळवून दिला.
राज कंवर दिग्दर्शित ‘दिवाना’ या चित्रपटाची कथा थोडी वेगळ्या धाटणीची त्रिकोणी प्रेमकहाणी होती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच काजलच्या (दिव्या भरती) डोळ्यासमोर तिचा पती रवीची (ऋषी कपूर) हत्या करून त्याला पाण्यात फेकून देण्यात येतं. ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून रवीचा काका धीरेंद्र प्रताप सिंग (अमरीश पुरी) असतो. काजल आणि रवीची आई आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडून निघून जातात.
लहान वयातच विधवा झालेल्या काजलच्या आयुष्यात राजा (शाहरुख खान) स्वप्न घेऊन येतो. तो तिच्याशी लग्न करतो. सुरुवातीला काजल त्याला पती म्हणून स्वीकारत नाही. पण राजाचं प्रेम पाहून हळूहळू ती त्याच्या स्वीकार करते. इथे थोडा कहाणीमध्ये ‘ट्विस्ट’ येतो कारण याच दरम्यान तिचा पहिला पती ‘रवी’ परत येतो. पाण्यात फेकून दिलेला रवी जिवंत असतो. अखेर पुन्हा धीरेंद्र प्रताप सिंग आपला खलनायकी रंग दाखवतो. हाणामारी, मेलोड्रामा सारं काही होतं आणि शेवटी काजलला वाचवताना रवीचा मृत्यू होतो.
या चित्रपटाची गाणी प्रचंड सुपरहिट झाली होती. या चित्रपटासाठी दिव्या भारतीला ‘फेस ऑफ द इअर, शाहरुखला उत्कृष्ट पदार्पणाचा, समीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार (तेरी उम्मीद तेरा इंतजार…), नदीम- श्रवण यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार, तर कुमार सानू यांना सर्वोत्कृष्ट गायक (सोचेंगे तुम्हे प्यार..) असे एकूण ५ फिल्फेअर पुरस्कार मिळाले होते. हा चित्रपट त्यावर्षीचा दुसरा सुपरहिट चित्रपट होता. पहिला सुपरहिट चित्रपट होता, अनिल कपूर – माधुरी दीक्षितचा ‘बेटा’.
सुरेल गाणी, उत्कृष्ट कथा, उत्तम दिग्दर्शन आणि कलाकारांची अचूक निवड या दिवाना चित्रपटाच्या जमेच्या बाजू होत्या. पण हे सर्व जमवून आणताना पडद्यामध्ये बरंच काही घडलं होतं त्याबद्दलच थोडंसं (Lesser Known facts about Deewana) –
दिव्या भारती नव्हती पहिली पसंती
या चित्रपटातील दिव्या भरतीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती होती माधुरी दीक्षित. पण नंतर मात्र ही भूमिका दिव्या भारतील ऑफर करण्यात आली. (Lesser Known facts about Deewana)
ऋषी कपूर यांच्या सांगण्यावरून चित्रपटाचा शेवट बदलला
चित्रपटामध्ये शेवटी रवीचा म्हणजेच ऋषी कपूर यांचा मृत्यू झालेला दाखवण्यात आलं आहे. परंतु मूळ स्क्रिप्टमध्ये असा शेवट नव्हता. मूळ स्क्रिप्टनुसार शेवटी दिव्या भारती शाहरुखला सोडून आपल्या पहिल्या पतीकडे म्हणजे ऋषी कपूरकडे परत जाते. पण हा शेवट ऋषी कपूर यांना पसंत पडला नाही. कारण जर ती पुन्हा पहिल्या पतीकडे परत गेली तर, हे तिचं तिसरं लग्न ठरलं असतं. तीन लग्न आणि दुसऱ्या पुरुषाकडे राहून पुन्हा पहिल्या पतीकडे परत आलेली नायिका प्रेक्षक स्वीकारणार नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. दिग्दर्शकांनाही ते पटलं आणि शेवट बदलण्यात आला. (Lesser Known facts about Deewana)
भीतीमुळे दिव्या भारती एक तास कारमध्ये बसून होती
‘तेरे दर्द से दिल आबाद रहा’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी दिव्या भारतीला थोडा उशीर झाला. पण समोर निर्माते गुड्डू धनोआ बसलेले बघून ते आपल्याला ओरडतील या भीतीने ती १ तास गाडीतच बसून राहिली. गुड्डू यांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते दिव्याला म्हणाले, “मी तुला अजिबात ओरडणार नाही. तू आधी गाडीतून बाहेर ये..” यानंतर दिव्या गाडीतून घाबरत घाबरत बाहेर आली आणि तिने चित्रीकरण पूर्ण केलं. (Lesser Known facts about Deewana)
शाहरुख होता शेवटची पसंती
शाहरुखच्या भूमिकेसाठी आधी सनी देओलच्या नावाचा विचार करण्यात आला होता. परंतु या भूमिकेसाठी कोणीतरी तरुण नायक हवा असा विचार करून राज कंवर यांनी ही भूमिका अरमान कोहलीला ऑफर केली. अरमानने ही भूमिका करायला होकारही दिला होता. परंतु काही कारणांनी त्याचा चित्रपटाच्या निर्मात्यांशी वाद झाला. हा वाद पुढे इतक्या टोकाला गेला की, अरमानने हा चित्रपट सोडला. पुढे ही भूमिका सलमान खानला ऑफर करण्यात आली होती. परंतु त्याचं मानधन परवडण्यासारखं नसल्यामुळे दिग्दर्शकांनी तो विचार सोडून दिला. अखेर निर्माते गुड्डू धनोआ यांचे मित्र धर्मेद्र यांनी त्यांना शाहरुखचं नाव सुचवलं आणि चित्रपटात शाहरुखची वर्णी लागली. (Lesser Known facts about Deewana)
=========
हे देखील वाचा – मुंबईचा फौजदार: प्रत्येकाने आवर्जून बघावी अशी लग्नांनंतरची धमाल-विनोदी प्रेमकहाणी
=========
दिवाना हा नव्वदच्या दशकामधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट बघायचा असेल, तर तो युट्युबवर उपलब्ध आहे. त्यामुळे केव्हाही हा चित्रपट तुम्ही अगदी फ्री मध्ये बघू शकता.