मराठी चित्रपट महामंडळ – अस्तित्व आहे.. प्रतिष्ठेचं काय?
सध्या राजकीय वातावरण पुरतं तापलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या सत्ताकारणातला पेच अधिकाधिक गहिरा होताना दिसतोय. अशा सगळ्याच टीव्ही चॅनल्सवर केवळ आणि केवळ शिवसेनेतल्या बंडखोरीच्या बातम्या २४ तास चालवल्या जातायत. या दोन दिवसांत अनेक इतर बातम्या मेल्या. यातलीच एक होती वारीची. शिवाय इतरही अनेक बातम्या यात आहेत. यातच आणखी एक बातमी बुधवारी संध्याकाळी येऊन धडकली ती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या अध्यक्षाांच्या नियुक्तीची. (Sushant Shelar- New President of Marathi Chitrapat Mandal)
चित्रपट महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने पाठवलेल्या माहितीनुसार महामंडळाच्या कार्यकारिणीने अध्यक्ष म्हणूुन सुशांत शेलार (Sushant Shelar) यांची नियुक्ती केली आहे. या पत्रानुसार यापूर्वीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याचंही यात सांगण्यात आल्याचं कळतं. पण त्याचवेळी राजेभोसले यांनी मात्र रात्री उशीरा एक क्लिप पाठवून ही नव्यानं झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर महामंडळातल्या आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
अध्यक्षपदाची ही रस्सीखेच पुढचे काही महिने चालणार आहेच. आत्ता झालेली निवड योग्य की अयोग्य? मेघराज राजेभोसलेंनी कोणत्या बैठका घ्यायला हव्या होत्या, त्या का घेतल्या गेल्या नाहीत? महामंडळात कोणता असंतोष होता, का होता? मग पुढे कुणी कुणावर कशी कुरघोडी केली.? कुणी कुणाच्या पाठीत कसा खंजीर खुपसला? या सगळ्या बाबी यथावकाश समोर येतील. कारण, पुढच्या काळात महामंडळाच्या निवडणुका लागणार आहेतच. त्या निवडणुकांमध्ये पुन्हा या सगळ्या संचालकांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. पण आत्ता तो मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की, महामंडळाला आत्ता नक्की काय काम करायचं आहे? (Sushant Shelar- New President of Marathi Chitrapat Mandal)
खरंतर गेल्या दोन वर्षांपासून महामंडळ शांत आहे. पूरपरिस्थितीमध्ये किंवा लॉकडाऊन काळात महामंडळाने काम केलं असेलही. पण आता ती परिस्थिती निवळली आहे. कोरोनाही मागे सरला आहे. चित्रपट पुन्हा थिएटरवर लागू लागले आहेत. अशामध्ये महामंडळ म्हणून आपण नक्की काय काम करायचं आहे याचा विचार चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी करायची गरज आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाचं चित्रपटसृष्टीतलं महत्त्व दिवसेंदिवस कमी होऊ लागलं आहे. अलिकडे तर नव्याने येणाऱ्या अनेक कलाकारांना हिंदीतल्या इतर असोसिएशन्सची आयकार्ड जवळ असणं आवश्यक वाटतं, पण महामंडळाचं कार्ड आपल्यासोबत असण्याची गरज वाटत नाही. मुळात महामंडळ काय काम करतं, हेच आता नव्याने येणाऱ्या आणि गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीत असलेल्या लोकांना कळेना झालं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आंदोलन छेडलं गेलं आहे. १०० पेक्षा जास्त दिवस या आंदोलनाला झाले. दिग्पाल लांजेकर, उषा नाईक आदी अनेक कलाकारांनी या आंदोलनस्थळी जाऊन आपला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात चित्रपट महांडळही सहभागी आहे. असं असलं तरी हा पेच अनेक दिवसांपासून सुटलेला नाही. खरंतर चित्रपट महामंडळाला आपलं म्हणणं सरकार दरबारी मांडणं सहज शक्य आहे. पण या आंदोलनाबाबत महामंडळाने केवळ आंदोलनकर्त्याची भूमिका घेतली. ती भूमिका रास्त आहेच. पण महामंडळ म्हणून त्यांचं तेवढंच काम नाही. राज्य सत्तेचं लक्ष वेधून घेणं. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडणं या गोष्टीही महामंडळाने करणं अपेक्षित आहे. पण असं काही झालं नाही. (Sushant Shelar- New President of Marathi Chitrapat Mandal)
लॉकडाऊन संपल्यापासून एक पडदा थिएटर्सची अवस्था बिकट झाली आहे. राज्य सरकारने त्यांना विविध कर लावल्यामुळे कर भरायचे की थिएटर सुरू करायचे, अशा द्विधा मानसिकतेत ही मंडळी अडकली आहेत. अशावेळी काही कर कमी करणं, थिएटरवाल्यांच्या तक्रारी सरकार दरबारी नेऊन त्यातून तोडगा काढणं हे महामंडळाने करणं अपेक्षित आहे. पण त्यावर अद्याप कुणीच पाऊल उचललेलं दिसत नाही.
आज परिस्थिती अशी आहे की, महामंडळात कुणीही निवडून आलं तरी इंडस्ट्रीला काहीच फरक पडणारा नाही. उलट पक्षी महामंडळ कायमचं बरखास्त केलं तरी त्यावर रडणारं कुणी नसेल. मंडळी असलीच तर ती केवळ ही संचालक-कार्यकारिणी इतकीच. कारण, महामंडळामुळे कुणाचंच काही अडत नाही. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असं हे महामंडळ अखिल भारतीय जरी असलं तरी याचा आवाका मुंबई-पुणे-कोल्हापूर पलिकडे गेलेला नाही.
===========
हे देखील वाचा – तिकडे केके…. आता इकडे कोण???
===========
गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस अशक्त होत चाललेल्या महामंडळाचं महत्त्व वाढवणं हे सध्याचं आव्हान आहे. महामंडळाने लोकाभिमुख काम करणं अपेक्षित आहे. हे कमी म्हणून की काय महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत होणारा हीन राडा तर सवयीचा होऊन गेला आहे. दरवेळी अर्वाच्च भाषेत होणारी शिवीगाळ, एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, खुर्च्यांची होणारी मोडतोड आणि घाईगडबडीत आवरती घेतली जाणारी सभा हाच खरंतर महामंडळाचा आरसा बनला आहे. अशा वातावरणात कुणीही संवेदनशील, सुसंस्कृत कलाकार रमणं निव्वळ अशक्य आहे.
या बाबी लक्षात घेऊन महामंडळाच्या कार्यकारिणीने, संचालकांनी.. विरोधकांनी एकत्र येऊन विचार करायला हवा. तसं झालं तरच या मंडळाला महत्व उरेल. अन्यथा याचं अस्तित्व असेल मात्र प्रतिष्ठा मात्र लयाला गेली असेल.