‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जस्सी जैसी कोई नही: एका कुरूप मुलीची हटके कहाणी
कोणत्याही कलाकृतीची मग तो चित्रपट असो, नाटक असो किंवा मालिका नायिका म्हटल्यावर ती सुंदरच असते. अर्थात सध्या काही नवनवीन कथानकांमुळे हा संदर्भ बदलला असला तरीही जवळपास १९ वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती वेगळी होती. त्याकाळात एका कुरूप मुलीची कथा दाखवणारी मालिका प्रसारित करणं तसं जोखमीचं काम होतं. पण ही जोखीम उचलली सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजनने आणि मालिकेचं नाव होतं ‘जस्सी जैसी कोई नही’.
सोनी टीव्हीने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या आणि विषयांवरच्या मालिका आणि कार्यक्रम प्रसारित केले आहेत. या चॅनेलचा टीआरपी रेटिंग कितीही असला तरी या चॅनेलचा खास असा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे, हे मान्य करावंच लागेल. ज्यावेळी ‘फॅमिली मेलोड्रामा’ मालिका टीआरपी खेचत होत्या त्याकाळात सोनीने ‘जस्सी जैसी कोई नही’ ही एका वेगळ्या विषयावरची मालिका प्रसारित केली आणि अल्पावधीतच या मालिकेने प्रचंड लोकप्रियताही मिळवली. (Memories of Jassi Jaissi Koi Nahin)
‘जस्सी जैसी कोई नही’ ही कथा आहे जस्मित वालिया उर्फ ‘जस्सी’ नावाच्या सर्वसामान्य पंजाबी कुटुंबातल्या एका कुरूप पण अत्यंत हुशार मुलीची. ती उच्चशिक्षितही असते. पण तिच्या कुरूप रुपामुळे तिच्यामध्ये अजिबात आत्मविश्वास नसतो. यामुळेच हुशार आणि उच्चशिक्षित असूनही तिला चांगली नोकरी मिळत नसते. अखेर तिला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळते पण पर्सनल सेक्रेटरीची! अरमान सूरी नावाच्या हँडसम बिझनेसमनची सेक्रेटरी म्हणून जस्सी कामावर रुजू होते.
दरवेळी मुलींशी फ्लर्ट करणाऱ्या अरमानची सिक्रेट्स त्याची प्रेयसी मल्लिकापासून लपवणारी, अनेकदा त्याला ‘रेड हँड’ पकडलं जाण्यापासून वाचवणारी जस्सी मल्लिकाच्या नजरेत मात्र तिची शत्रू बनते. त्यात मल्लिकाला तिची मैत्रीण परीला अरमानची सेक्रेटरी म्हणून नोकरी द्यायची असते. कारण परी अरमानची सर्व सिक्रेट्स मल्लिकाला सांगेल याची तिला खात्री असते. परंतु अरमानने जस्सीची निवड केल्यामुळे मल्लिका आणि परी दोघीही तिचा राग करत असतात. (Memories of Jassi Jaissi Koi Nahin)
जस्सीवर मनापासून प्रेम करणारे तिला प्रत्येक दुःखातून सावरणारे तिचे आई – वडील, तिचा भाऊ नंदू नेहमीच जस्सीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. जस्सीची आजी म्हणजे तिची ‘बेबे’ तिची खूप चांगली मैत्रीण असते. पण जस्सी मात्र समाजकडून होणाऱ्या अवहेलनेमुळे नेहमीच उदास राहत असते. कुरूप जस्सी नकळत आपल्या हँडसम बॉसच्या – अरमानच्या प्रेमात पडते. पुढे अपेक्षेनुसार कुरूप जस्सीचा मेकओव्हर होतो.
मालिकेचा विषय थोडा वेगळा होता आणि विनोदी पद्धतीने मांडण्यात आला होता. त्यामुळे मालिका कुठेही कंटाळवाणी झाली नाही. कुरूप मुलीची व्यथा दाखवताना तिला सहानुभूतीची गरज नाही, पण तिची अवहेलना करू नका; हा मुख्य संदेश या मालिकेतून देण्यात आला. माणसाचे गुण महत्त्वाचे असतात, रूप नाही, या गोष्टी फक्त पुस्तकांतच वाचण्यापुरत्या ठीक आहेत. कारण प्रत्यक्षात मात्र बाह्यसौंदर्याला तितकंच महत्त्व दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि हेच मालिकेतून ठळकपणे मांडण्यात आलं आहे. (Memories of Jassi Jaissi Koi Nahin)
ही मालिका ‘Yo soy Betty, la fea’ या स्पॅनिश मालिकेवर आधारित होती. मालिकेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेची मुख्य नायिका ‘जस्सी’ला मूळ रूपात बघण्यासाठी प्रेक्षकांना भरपूर वाट बघावी लागली. कारण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यक्षात कशी दिसते हे गुप्त ठेवण्यात आलं होतं. अर्थात तो काळ सोशल मीडियाच्या आगमनाच्या आधीच काळ होता त्यामुळे हे सहज शक्य झालं. अन्यथा आजच्या काळात अशा प्रकारची मालिका बनवणं आणि मुख्य नायिकेची ओळख आणि तिचं रूप गुप्त ठेवणं जवळपास अशक्यच.
या मालिकेमध्ये जस्सी (मोना सिंग), अरमान (अपूर्व अग्निहोत्री), मल्लिका (रक्षंदा खान), राज मल्होत्रा (परमित सेठी), मानिनी मिश्रा (परी), नंदू (गौरव गेरा), जस्सीची आजी – बेबे (उत्तरा बावकर), जस्सीचे वडील बलवंत वालिया (वीरेंद्र सक्सेना) जस्सीची आई – अमृता वालिया (सुरिंदर कौर), समीर सोनी (पूरब मेहरा) मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहेत. मालिकेमध्ये जस्सीच्या मेकओव्हरच्या भागांमध्ये मंदिरा बेदी आणि दिव्या दत्ता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या. (Memories of Jassi Jaissi Koi Nahin)
=======
हे देखील वाचा – मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?
=======
या मालिकेचं शीर्षक गीत “हम जैसे लाखो है पर.. जस्सी जैसी कोई नही… ” लोकप्रिय गायक ‘शान’ याने गायलं होतं. १ सप्टेंबर २००३ रोजी प्रसारित झालेल्या या मालिकेचे एकूण ५५० भाग प्रदर्शित झाले होते. ही मालिका यु ट्यूब तसंच सोनी Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ४ मे २००६ रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला आणि मालिकेने निरोप घेतला. पण जस्सी मात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे कारण जस्सी जैसी कोई नही…