दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
या लोकप्रिय मराठी मालिकांचं कथानक नाही ‘ओरिजिनल’; आहेत अन्य भाषांतील मालिकांचे रिमेक
सध्या आघाडीच्या मराठी मालिकांमध्ये बहुतांश मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील आहेत. परंतु टीआरपी रेटिंग मध्ये सातत्याने टॉपला असणाऱ्या या मालिका केवळ हिंदी नाही, तर काही इतर प्रादेशिक वाहिन्यांवर लोकप्रिय झालेल्या मालिकांचा रिमेक आहेत. या मालिका कोणत्या आणि त्या कोणत्या मालिकांचा रिमेक आहेत याबद्दल जाणून घेऊया. (Marathi serials remake of regional language serials.)
१. आई कुठे काय करते?
‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपी रेटिंग मध्ये सातत्याने टॉप १० मध्ये असतेच असते. यामधील ‘अरुधंती’ ही व्यक्तिरेखा सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखा ठरली आहे. एका यशस्वी माणसाची कर्तव्यदक्ष पत्नी असणाऱ्या अरुंधतीची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. साधी – सरळ, पतीकडून सतत अपमानित होणारी अरुधंती आता मात्र बदलली आहे. अनुराधाची भूमिका साकारली आहे मधुराणी गोखले – प्रभूलकर या अभिनेत्रीने. ही मालिका ‘श्रीमोयी’ या बंगाली मालिकेचा रिमेक आहे.
२. रंग माझा वेगळा
गेले काही आठवडे ही मालिका विशेष चर्चेत आहे. कलाकारांनी मालिका सोडणं आणि त्याजागी नवीन कलाकारांची वर्णी लागणं या गोष्टी काही आता नवीन राहिल्या नाहीयेत. परंतु मालिकेमधील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराने मालिका सोडल्यास त्याबद्दल चर्चा तर होणारच. या मालिकेतील बालकलाकाराने मालिका सोडल्याच्या बातम्या मध्यंतरी चर्चेत होत्या. दीपा आणि कार्तिकच्या प्रेमकहाणीमध्ये येणाऱ्या खलनायकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मालिकेमध्ये अनेक ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ दाखवण्यात येत असल्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकताही वाढतच चालली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी ही मालिका ‘करुथमुथु’ या मल्याळम मालिकेचा रिमेक आहे. (Marathi serials remake of regional language serials.)
३. मुलगी झाली हो
मुलगी झाली हो ही मालिका सध्या टीआरपी रेटिंगमध्ये टॉपला आहे. मध्यंतरी ही मालिका कलाकारांमध्ये झालेल्या वादामुळे चर्चेत होती. त्यांनतर मालिकेचा टीआरपी घसरला. मालिकेची वेळ बदलून दुपारची करण्यात आली. याच दरम्यान मालिका निरोप घेणार असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. पण आज मालिकेने ५०० भागांचा टप्पा पार केला आहे. आणि पुन्हा टीआरपी रेटिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. साजिरी आणि शौनकच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. ही मालिका ‘मौना रागम’ या तेलुगू मालिकेचा रिमेक आहे.
४. फुलाला सुगंधा मातीचा
हलवाई असणारा पती शुभम आणि त्याची आयपीएस ऑफिसर बनायचं स्वप्न बघणारी पत्नी कीर्ती या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. शुभम आपली पत्नी कीर्तीला तिचं आयपीएस ऑफिसर व्हायचं स्वप्न पूर्ण करायला मदत करतो. पत्नीच्या भावनांचा विचार करणारा पती लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आता तर कीर्तीचं ट्रेनिंगही पूर्ण झालं आहे. त्यामुळे मालिकेत अनेक बदल घडायची शक्यता आहे. दरवेळी नवनवीन ‘ट्विस्ट आणि टर्न्स’ घेणाऱ्या या मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये आपलं स्थान बळकट केलं आहे. ही मालिका ‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकेचा रिमेक आहे.
५. सुख म्हणजे नक्की काय असतं (के आपों के पोर – बंगाली)
एका कुटुंबात घडणाऱ्या घटना, प्रेमकहाणी, सरोगसी, फसवणूक असे अनेक कंगोरे असणाऱ्या या मालिकेमधील जयदीप आणि गौरीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिकाही सातत्याने टीआरपी रेटिंगमध्ये टॉप १० मध्ये आहे. ही मालिका ‘के आपों के पोर’ या बंगाली मालिकेचा रिमेक आहे. (Marathi serials remake of regional language serials.)
=========
हे देखील वाचा – मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?
=========
६. सहकुटुंब सहपरिवार (पांडियन स्टोअर्स -तमिळ)
ही एक कौटुंबिक कहाणी आहे. कुटुंबातील मोठा भाऊ आणि त्याची पत्नी मिळून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतात. नायकाच्या भावंडांच्या जबाबदारीची जाणीव अगदी आपल्याला मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतात. पण आता या मोठ्या वहिनीला दिवस गेले आहेत. त्यामुळे मालिकेत अनेक ‘ट्विस्ट आणि टर्न्स’ येत आहेत. टिपिकल कौटुंबिक कहाणी असलेली ही मालिका सातत्याने टीआरपी रेटिंगमध्ये टॉप १० मालिकांमध्ये असते. ही मालिका ‘पांडियन स्टोअर्स’ या तमिळ मालिकेचा रिमेक आहे.