‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नायक- द रियल हिरो: एका दिवसाचा मुख्यमंत्री झालेल्या पत्रकाराची कथा आणि व्यथा
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. न्यूज चॅनेल्सवर दिवसभर इतर सर्व बातम्या सोडून केवळ राजकारणाचाच बातम्या दाखवल्या जात आहेत. सोशल मीडियावरही राजकारण हाच विषय जास्त चर्चिला जातोय. तसंही राजकारण आणि मीडिया हे असे विषय आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटतं आणि त्यावर नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. या दोन्ही विषयांवर आधारित २००१ साली एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं ‘नायक- द रियल हिरो’. (Nayak: The Real Hero)
‘नायक- द रियल हिरो’ या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आहे. कथेचा नायक शिवाजी राव गायकवाड (अनिल कपूर) एका न्यूज चॅनेलचा रिपोर्टर असतो. एका मुलाखतीदरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (अमरीश पुरी) तो उलट सुलट प्रश्न विचारतो. यावर मुख्यमंत्री चिडतात आणि त्याला एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन दाखवण्याचं आव्हान देतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याचं आव्हान तो स्वीकारतो आणि ‘सिस्टीम’मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा प्रयत्न करतो. त्याचा हा प्रवास, आव्हान स्वीकारण्याआधीचं आणि त्यानंतरचं बदललेलं आयुष्य या साऱ्यासोबतच त्याची प्रेमकहाणीही यामध्ये दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट म्हणजे ‘परफेक्ट मसालापट’ आहे. यामध्ये कॉमेडी, ड्रॉमा, ॲक्शन, थ्रिल सारं काही आहे. थोडक्यात हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं ‘एक्सक्लुसिव्ह पॅकेज’ आहे.
एस शंकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, शिवाजी साटम, पूजा बत्रा, परेश रावल आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९९९ सालच्या ‘मुधलवन’ या तामिळ भाषेतील चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची कथा तर भन्नाट आहेच, पण मेकिंगचे किस्सेही एकदम भन्नाट आहेत. त्याबद्दलच थोडंसं – (Nayak: The Real Hero)
अनिल कपूर नव्हता पहिली पसंती
या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी एस शंकर यांनी सर्वात आधी अमीर खानची निवड केली होती. पण त्याच्याशी यासंदर्भात व्यवस्थित बोलणं न झाल्याने ते शाहरुख खानकडे गेले. शाहरुखने त्याच्या होम प्रॉडक्शनच्या ‘फार भी दिल है हिंदुस्थानी’ या चित्रपटात ‘मीडिया रिपोर्टर’चीच भूमिका केलेली असल्यामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि अखेर ही भूमिका अनिल कपूरला मिळाली. आन त्याने ती अतिशय उत्तमरीत्या साकारली. आता ‘नायक’ चित्रपटाचा विचार करताना प्रेक्षक अनिल कपूरशिवाय कोणाचा विचारच करू शकत नाहीत.
चित्रपटातील नायकाचं नाव आहे राजनीकांतचं मूळ नाव
लेखक – दिग्दर्शक एस शंकर यांना मूळ तामिळ चित्रपटात नायकाच्या भूमिकेसाठी राजनीकांतच हवे होते. परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे हिंदीमध्ये हा चित्रपट बनवताना त्यांनी रजनीकांत यांचंच नाव वापरलं. चित्रपटातील अनिल कपूरचं ‘शिवाजी राव गायकवाड’ हे नाव प्रत्यक्षात रजनीकांत यांचं मूळ नाव आहे. (Nayak: The Real Hero)
अनिल कपूरने दिला बॉडी शेव्हिंगला नकार
चित्रपटातील कार मधील ‘3D फायटिंग दृश्यासाठी अनिल कपूरने ७ महिन्यांचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं. अशा दृश्यांसाठी कॉम्प्युटर इफेक्टचा वापर करणारा हा भारतीय सिनेमातील पहिला ‘ॲक्शन सीन’ होता. या दृश्यामध्ये त्याला पाण्यात टाकलेलं दाखवायचं होतं. परंतु चित्रीकरणाच्या वेळी त्याने ‘बॉडी शेव्हिंग’ करण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी त्याला चिखलात टाकलेलं दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका दृश्यासाठी वापरले तब्बल ३६ कॅमेरे
चित्रपटात अनिल कपूर न्यूज चॅनेल मध्ये नोकरी करत असतो. त्यामुळे त्याच्या ऑफिसमधलं एक दृश्य दाखवताना एकाच वेळी ३६ वेगवेगळे कॅमेरे एकाच वेळी वापरले गेले होते. (Nayak: The Real Hero)
मनीषा कोईरालाला वगळून राणी मुखर्जीला घेतलं
मूळ तामिळ चित्रपटात नायिकेची भूमिका मनीषा कोईराला हिने केली होती. हिंदीमध्ये मात्र एस शंकर यांनी ही भूमिका तिला ऑफर केली नाही. कारण त्यांना या भूमिकेसाठी हिंदीमधील नवा चेहरा हवा होता आणि मनीषा तेव्हा बऱ्यापैकी बॉलिवूडमध्ये परिचित होती. त्यामुळे या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी मनीषाचं नाव वगळण्यात आलं. या भूमिकेसाठी प्रिती झिंटाच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. परंतु तिच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे या चित्रपटात राणी मुखर्जीची वर्णी लागली.
=============
हे देखील वाचा – कालजयी सावरकर: सर्वसामान्यांना अपरिचित असणारे सावरकरांचे आयुष्य उलगडणारा लघुपट
=============
संपूर्णपणे भारतात चित्रित झालेला ‘बिग बजेट’ चित्रपट
‘नायक- द रियल हिरो’ हा संपूर्णपणे भारतात चित्रित झालेला ‘बिग बजेट’ चित्रपट होता. या चित्रपटाचं बजेट होतं २१ कोटी रुपये. २००१ साली ही रक्कम खूप मोठी होती. (Nayak: The Real Hero)
या चित्रपटाला IMDB वर ७.८ रेटिंग देण्यात आलं आहे. हा चित्रपट बघायचा असेल, तर तो युट्युबवर उपलब्ध आहे. त्यामुळे एकदम फ्री मध्ये बघू शकता.