जाने तू… या जाने ना: कॉलेजची मैत्री, मजा, मस्ती आणि एक रोमँटिक प्रेमकहाणी
एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड्स’ आजच्या काळात ‘बेस्टी’ म्हणू हवंतर.. जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि याबद्दल सर्वांना माहिती असतं.. अंधारात असतात ती ही दोघंच. एकीकडे सर्व त्यांना तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, हे पटवून द्यायचा प्रयत्न करत असतात, तर दुसरीकडे ‘ती’ दोघं, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत”, हे पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरी आणि तिसरा येतात तेव्हा मात्र त्यांना आपल्या प्रेमाची जाणीव होते. एक साधी सरळ प्रेमकहाणी पण अतिशय सुंदर पद्धतीने दाखवली आहे ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटामध्ये. (Lesser Known Facts about Jaane Tu Ya Jaane Na)
ही कहाणी आहे जय आणि अदितीची. यामध्ये प्रेम, कॉलेजची मैत्री, ग्रुपची धमाल, मजा मस्ती, सारं काही आहे. जय आणि अदिती यांच्या मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा खरंतर आपण प्रेमात पडलोय याची जाणीव होईपर्यतचा प्रवास म्हणजे ‘जाने तू…या जाने ना’ यामध्ये अदिती आणि तिचा भाऊ अमित यांचं हळवं नातं, जय आणि त्याच्या आईचं नातं, त्याच्या आईची तत्व, जय आणि अदितीच्या मित्र मैत्रिणीचा ग्रुप या साऱ्या उपकथानकांची सुसंगत मांडणी केल्यामुळे चित्रपट अधिकच रंगतदार झाला आहे. तसंच जयची प्रेयसी मंजिरी आणि अदितीचा होणार पती सुशांत मोदी यांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. (Lesser Known Facts about Jaane Tu Ya Jaane Na)
जाने तू…या जाने ना’ या चित्रपटातील गाणी तर सुपरहिट होतीच शिवाय जय आणि अदिती (इम्रान खान; जेनेलिया डिसुझा) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आमिर खानचा पुतण्या असणाऱ्या इम्रान खानने पदर्पणातच रसिकांची मनं जिंकली, तर जेनेलिया डिसुझा कित्येकांच्या आवडत्या नायिकांच्या यादीत सामील झाली. या दोघांव्यतिरिक्त मंजिरी फडणीस या मराठमोळ्या अभिनेत्रीचंही भरपूर कौतुक झालं. या तिघांसोबत चित्रपटात प्रतीक बब्बर, नसरुद्दीन शहा, रत्ना पाठक, अयाझ खान, परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांची पाहुणे कलाकारांची भूमिकाही प्रचंड लक्षवेधी ठरली आहे.
‘जाने तू या जाने ना..’ एक रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट बघताना आणि बघून झाल्यावर अनेकजण आपल्या कॉलेजच्या रम्य, सुरस आठवणीत रमले असतील. चित्रपटाची कथा साधी असली तरी लेखक – दिग्दर्शक अब्बास टायरवाला यांनी ती अत्यंत प्रभावीपणे मंडळी आहे. त्यामुळेच चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. रोमँटिक कथेला किंचितसा ड्रामा आणि भरपूर कॉमेडीची फोडणी दिल्यामुळे चित्रपट एकदम रंगतदार झाला आहे. चित्रपट तर रंगतदार आहेच पण मेकिंगचे किस्सेही आवर्जून वाचण्यासारखे. त्याबद्दलच थोडंसं (Lesser Known Facts about Jaane Tu Ya Jaane Na)
अदितीच्या भूमिकेसाठी मिनिषा लांबाने दिली होती ऑडिशन
अदितीच्या भूमिकेसाठी अनेक मुलींनी ऑडिशन दिली होती. परंतु दिग्दर्शक अब्बास टायरवाला यांना ‘परफेक्ट मॅच’ मिळतच नव्हती. या भूमिकेसाठी मिनिषा लांबानेही ऑडिशन दिली होती. अखेर जेनेलिया डिसुझाच्या रूपाने अब्बासजींना त्यांची ‘अदिती’ मिळाली.
“पप्पू कान्ट डान्स साला” आणि “पापा कहते है बडा नाम करेगा” या गाण्यांचा परस्पर संबंध
“पप्पू कान्ट डान्स साला” या गाण्यात “पापा कहते है बडा नाम करेगा” अशी ओळ आहे. “पापा कहते है” हे इमरान खानचे काका आमिर खान यांच्या कयामत से कयामत तक (1988) चित्रपटातील पहिलं गाणं होतं. तसंच, कयामत से कयामत तक’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानचे काका नासिर हुसैन यांनी केली होती, तर इम्रान खानच्या पहिल्या चित्रपटाची (जाने तू…या जाने ना) निर्मिती त्याचे काका मन्सूर खान आणि आमिर खान यांनी केली आहे. हा पूर्णपणे योगायोग आहे कारण या चित्रपटाची निर्मिती आधी निर्माते ‘झामु सुगंध’ करणार होते. परंतु दुर्दैवाने चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (Lesser Known Facts about Jaane Tu Ya Jaane Na)
चित्रपटात काही सेकंदासाठी दिसली होती भावी पत्नी
आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील “पापा कहते है बडा नाम करेगा…” या गाण्यात काही सेकंदासाठी त्याची भावी पत्नी रिना दिसली होती. (दुर्दैवाने पुढे त्यांचा घटस्फोट झाला), तर ‘जाने तू…या जाने ना’ चित्रपटात क्लबमधल्या एका दृश्यात जयच्या शेजारी बसलेली मुलगी म्हणजे त्याची भावी पत्नी अवंतिका आहे.
==========
हे देखील वाचा – पंढरीची वारी: वारीचा नितांतसुंदर प्रवास घडवणारी विठ्ठल भक्ताची आणि भक्तीची कहाणी
==========
अदितीची भूमिका आणि इम्रानचं खरं आयुष्य
चित्रपटात अदिती फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी न्यूयार्कला जाणार असं दाखवण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र इम्रानने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून फिल्म मेकिंगची पदवी घेतली आहे. (Lesser Known Facts about Jaane Tu Ya Jaane Na)
हा चित्रपट बघायचा असल्यास नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ७.४ रेटिंग देण्यात आलं आहे.