‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अग्निहोत्र: अग्निहोत्राची परंपरा आणि त्यामागच्या रहस्याचा शोध घेणारी मालिका
सुरुवातीला मराठी मालिकांसाठी झी मराठी ही एकमेव वाहिनी सुरू झाली होती. त्यानंतर काही वर्षांत ई-टीव्ही म्हणजेच कलर्स मराठी आणि त्यानंतर काही वर्षांत स्टार प्रवाह वाहिनी सुरू झाली. पहिल्या दोन्ही मराठी वाहिन्या रसिकांना उत्तोमोत्तम मालिकांचा नजराणा देतच होत्या; आता याच स्पर्धेत स्टार टीव्हीनेही उडी घेतली आणि स्टार प्रवाह वाहिनीचा जन्म झाला आणि अल्पावधीतच ही वाहिनीही लोकप्रिय झाली. याच वाहिनीवर सुरू झालेली ‘अग्निहोत्र’ ही मालिका मराठीमधील उत्कृष्ट मालिकांमध्ये गणली जाते. (Memories of Agnihotra)
अग्निहोत्र ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी होती. त्यावेळच्या स्त्रीप्रधान कौटुंबिक मालिकांच्या मांदियाळीत काहीसं गूढ, वेगळ्या धाटणीचं कथानक प्रेक्षकांसमोर आलं आणि ते त्यांच्या पसंतीही उतरलं. या मालिकेची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. हे कुटुंब म्हणजे अग्निहोत्री कुटुंब.
‘अग्निहोत्र’ म्हणजे एक कौटुंबिक परंपरा, एक संस्कृती आहे. अग्निहोत्र सतत तेवत ठेवून त्याचं अस्तित्व जपणं ही या कुटुंबाची मुख्य जबाबदारी असते. त्या काळात अग्नी निर्माण करण्याचं कोणतंही साधन नसल्यामुळे असेल कदाचित पण अग्निहोत्र ही प्रथा त्या कुटुंबाने जपली होती. ही प्रथा जपणारं कुटुंब म्हणजेच अग्निहोत्री कुटुंब. ‘गणपती’ हे या अग्निहोत्री कुटुंबाचं आराध्य दैवत असतं.
पुढे काळ बदलतो आणि कालानुरूप अनेक गोष्टीही बदलत जातात. आधुनिक काळात कुटुंबातील पुढची पिढी गाव सोडून इतरत्र स्थायिक होतात. आपला नोकरी व्यवसाय आणि दिनचर्या यामध्येच ते व्यग्र होतात. या कुटुंबातला तरुण मुलगा नील याला मात्र आपली कौटुंबिक परंपरा आणि त्यामागचा इतिहास याबद्दल प्रचंड कुतूहल असतं. त्याला ‘अग्निहोत्राबद्दल’ सर्वकाही जाणून घ्यायचं असतं. या शोध प्रवासात अनेक अनाकलनीय, गूढ गोष्टी त्याच्या समोर येतात. या गोष्टींचा आणि त्या अनुषंगाने समोर आलेल्या रहस्याचा तो शोध घेत राहतो. (Memories of Agnihotra)
अग्निहोत्रींचा वाडा, त्यांच्या देवघरात दडलेलं रहस्य, कुटूंबियांचे एकमेकांमधील संबंध, नील आणि सईची प्रेमकहाणी या मुख्य कथानकासोबतच काही उपकथानकंही मालिकेमध्ये आहेत. मालिकेमध्ये मोहन जोशी, विक्रम गोखले, मोहन आगाशे, शुभांगी गोखले, सुहास जोशी, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे अशा मराठीमधील नामवंत कलाकारांसह सिद्दार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, स्पृहा जोशी, आस्ताद काळे, मृण्मयी गोडबोले, चिन्मय मांडलेकर असे त्या काळातले निवेदित कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.
मराठीमधील मातब्बर कलाकारांच्या भूमिकांविषयी काय बोलणार? त्या भूमिका सहजसुंदर होत्याच. पण नीलच्या भूमिकेत सिद्धार्थ चांदेकर आणि आणि सईच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे यांनी आपली जबरदस्त छाप सोडली आहे. ही मालिका मृण्मयीची पहिलीच मालिका होती. तरीही ती अजिबात नवखी वाटली नाही.
कौटुंबिक रहस्यमय कथानकाला समंजस प्रेमाची किनार असल्यामुळे कथानक अजूनच आकर्षक झालं होतं. पोलीस इन्स्पेकटच्या भूमिकेत सतीश राजवाडे यांनी एकदम मस्त छाप सोडली होती. तर वैदेही (मृण्मयी गोडबोले) आणि उमा (स्पृहा जोशी) यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. (Memories of Agnihotra)
एक उत्तम कथा, अनुभवी आणि गुणी तरुण कलाकार या साऱ्यासोबत आवर्जून उल्लेख करायला हवा तो मालिकेच्या दिग्दर्शकांचा. या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं सतीश राजवाडे यांनी. सतीश राजवाडेंच्या रूपात मराठी मनोरंजनसृष्टीला एक गुणी दिग्दर्शक लाभला आहे. मुंबई पुणे मुंबई सारखा रोमँटिक चित्रपट असो किंवा एक डाव धोबी पछाड सारखा विनोदी चित्रपट सतीश राजवाडे यांनी दोन्ही चित्रपटांसाठी कमाल दिग्दर्शन केलं आहे. अग्निहोत्र मालिकेच्या आधीही त्यांनी झी मराठीवर ‘असंभव’ या अशाच रहस्यमय कौटुंबिक मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. आणि ती मालिकाही कमालीची लोकप्रिय झाली होती. (Memories of Agnihotra)
========
हे देखील वाचा – असंभव: प्राईम टाईमला प्रसारित झालेली गूढ, रहस्यमय मालिका
========
काही वर्षांपूर्वी मालिकेचा दुसरा भाग अग्निहोत्र २ या नावाने स्टार प्रवाहवर प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेला मात्र अग्निहोत्र मालिकेइतकं प्रेम मिळू शकलं नाही आणि अल्पावधीतच मालिकेनं गाशा गुंडाळला. मालिकेच्या दुसऱ्या भागात अनेक कलाकार बदलले होते. तसंच दिग्दर्शकही बदलले होते. अनेकदा रसिकांच्या मनात एखादी मालिका व त्यामधील कलाकार हे गणित इतकं पक्कं बसलेलं असतं की, प्रेक्षक त्यामध्ये झालेला थोडासा बदलही स्वीकारायला तयार नसतात. नेमकं असंच काहीसं अग्निहोत्र २ च्या बाबतीतही झालं असावं. (Memories of Agnihotra)
अग्निहोत्र ही मालिका पाहायची असल्यास ती डिस्ने + हॉटस्टार तसंच यु ट्यूब वरही उपलब्ध आहे. IMDB वर या मालिकेला ९ रेटिंग देण्यात आलं आहे.