मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका
लव्ह ट्रँगल किंवा प्रेमाचा त्रिकोण हा समस्त मनोरंजनसृष्टीचा आवडता विषय आहे. अर्थात प्रेक्षकानांही तो आवडतो किंवा आवडत होता असं म्हणू आपण. कारण सध्याच्या काळात प्रेमाची परिभाषाच बदलून गेली आहे. पण काही म्हणा, एक काळ या अशा कथानकांनी गाजवला आहे. आजही नव्वदच्या दशकात जन्माला आलेली पिढी अशा कथानकांमध्ये रमते, नॉस्टॅल्जिक होते. अशीच एक त्रिकोणी प्रेमकहाणी स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली होती; ती म्हणजे ‘मन उधाण वाऱ्याचे’. (Man Udhan Varyache)
‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर ‘अगंबाई अरेच्चा’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील “मन उधाण वाऱ्याचे…” हे गाणं तेव्हा प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मला वाटतं मालिकेला एखाद्या लोकप्रिय गीतातील ओळ वापरायची प्रथा याच मालिकेपासून सुरू झाली असावी. हिंदीमध्ये अर्थातच ही प्रथा आधीच सुरू झाली होती. गेल्या काही वर्षांतील मराठी मालिकांचा विचार केल्यास अनेक मालिकांना एखाद्या जुन्या गीतातील ओळ शीर्षक म्हणून दिलेली आढळेल.
‘मन उधाण वाऱ्याचे’ ही कहाणी होती गौरी, निखिल आणि नीरजाची. गावात राहणारी साधी, सरळ, अल्लड गौरी. मुंबईमधील एका मोठ्या कुटुंबातील काहीसा अबोल पण समंजस मुलगा निखिल आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी; त्याच्यासाठी जीव द्यायची आणि घ्यायचीही तयार असणारी त्याची प्रेयसी नीरजा. एक साधी, सरळ कहाणी अतिशय रंगतदार पद्धतीने मांडण्यात आल्यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. (Man Udhan Varyache)
निखिल आणि नीरजा दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं. लवकरच दोघंजण लग्नही करणार असतात. निखिल आणि त्यांचा अख्खा ग्रुप पिकनिसाठी एका गावात जातात. परंतु काही कारणांनी नीरजा त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्या गावात गेल्यावर त्यांची ओळख होते गौरीशी. बारावी पास म्हणजे आपण खूप शिकलोय अशा अविर्भावात असणाऱ्या गौरीचं लग्न ठरलेलं असतं. लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडून जास्त हुंडा मागितला जातो आणि गौरीच्या वडिलांची तेवढा हुंडा द्यायची परिस्थिती नसते. गौरीचे वडील वरपक्षासमोर हात जोडून लग्न मोडू नका म्हणून विनंती करत असतात. नेमकं त्याच वेळी निखिल आणि त्याचे मित्र तिथे हजर असतात.
निखिल साहजिकच या मनोवृत्तीविरोधात बोलतो आणि वरपक्ष लग्न मोडून निघून जातो. निखिलच्या बोलण्यामुळे लग्न मोडलं म्हणून गावकरी त्याला दोषी धरतात आणि गावकऱ्यांच्या दबावामुळे निखिलला गौरीशी लग्न करावं लागतं. निखिल तिच्याशी लग्न करून तिला मुंबईला घेऊन येतो. (Man Udhan Varyache)
यानंतर नीरजाचं दुःख, आकांडतांडव, निखिलच्या घरच्यांची प्रतिक्रिया, भेदरलेली गौरी हे सगळे प्रसंग घडतात. पुढे गौरीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीची धडपड, शहरी वातावरणात जुळवून घेताना होणारा गोंधळ, निखिल आणि त्याच्या आईची नाराजी, निखिलला मिळविण्यासाठीची नीरजाची कारस्थानं, गौरीचा मेकओव्हर, विरह, त्याग हे सगळे टप्पे यामध्ये दाखवण्यात आले आहेत.
या साऱ्याच्या जोडीने मालिकेमध्ये काही उपकथानकंही दाखवण्यात आली आहेत. यामध्ये निखिलच्या बालवयातील एका घटनेचं उपकथानकही यामध्ये आहे. ही घटना निखिल आणि त्याच्या आईमध्ये आलेला दुरावा आणि अबोल्याला कारणीभूत असते. ही घटना कुठली हे मात्र मालिकेमध्ये बरेच दिवस एक रहस्य होतं.
‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमधून कश्यप परुळेकर (निखिल), नेहा गद्रे (गौरी) आणि शर्मिष्ठा राऊत (नीरजा) हे तीन नवीन कलाकार प्रकाशझोतात आले. बहुदा ही या तिघांचीही पहिलीच मालिका असावी. या तिघांव्यतिरिक्त मालिकेमध्ये वर्षा उसगावकर, संजय मोने, अश्विनी एकबोटे, उदय टिकेकर, रुपाली भोसले, दुष्यन्त वाघ, गिरीश ओक, विशाखा सुभेदार इ. कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. मालिकेमध्ये नीरजाची भूमिका आधी निशा शहा ही अभिनेत्री साकारत होती. परंतु सुरुवातीच्या काही भागांनंतर अचानक शर्मिष्ठा राऊतने तिची जागा घेतली. याचं कारण नेमकं काय, हे मात्र तेव्हा कळलं नाही. (Man Udhan Varyache)
========
हे देखील वाचा – अग्निहोत्र: अग्निहोत्राची परंपरा आणि त्यामागच्या रहस्याचा शोध घेणारी मालिका
========
‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका स्टारचेच बंगाली चॅनेल स्टार जलशावरील ‘बौ कोठा काओ’ या बंगाली मालिकेचा रिमेक होती. यानंतर या मालिकेचा हिंदी रिमेक लाईफ ओके चॅनेलवर ‘गुस्ताख दिल’ या नावाने प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचे निर्माते होते मराठीतील लोकप्रिय कलाकार आणि दिग्दर्शक महेश कोठारे.
२७ जून २००९ मध्ये सुरू झालेली ही मालिका ऑक्टोबर २०११ पर्यंत यशस्वीपणे चालू होती. माझ्या माहितीत तरी ही मालिका सध्या कुठेच उपलब्ध नाहीये. स्टार प्रवाहवरची मालिका असूनही डिस्ने + हॉटस्टारवरही ही मालिका उपलब्ध नाहीये. त्यामुळे ही मालिका केवळ आठवणीतली मालिकाच बनून राहणार.. (Man Udhan Varyache)