चित्रपटातील इम्रान हाश्मीचे ‘किस सिन’ बघून त्याची प्रेयसी भडकली आणि…
इम्रान हाश्मी (Emraan Hashmi)! बॉलिवूडचा सीरिअल किसर! २०१४ साली आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटात मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी यांनी १४ ‘किस सिन’ दिले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये इम्रान हाश्मीला ‘सीरिअल किसर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीला भट्ट कॅम्पमध्ये रमलेल्या या अभिनेत्याला खरी ओळख मिळाली ती ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटामुळे.
‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटाआधीही ‘आवारापन’ आणि ‘जन्नत’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांचंही कौतुक झालं होतं, पण हे दोन्ही चित्रपट भट्ट कॅम्पचे होते. भट्ट कॅम्पच्या बाहेर पडायची हिम्मत दाखवून, आपला कम्फर्ट झोन सोडून ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात त्याने चक्क ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदची भूमिका स्वीकारली आणि बॉलीवूडला त्याच्या अभिनय क्षमतेची जाणीव झाली. खरंतर महेश भट्ट व मुकेश भट्ट या दोघांनीही त्याला ही भूमिका न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. तरीही इम्रानने ही भूमिका स्वीकारली.
याबद्दल बोलताना एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया देताना महेश भट्ट यांनी सांगितलं, “मी इम्रानला सल्ला दिला होता की, तू ही भूमिका करू नकोस. कारण मला त्याची काळजी वाटत होती. कारकिर्दीच्या या टप्प्यावर सर्वात मोठ्या दहशतवाद्याची – दाऊद इब्राहिमची भूमिका स्वीकारणं खूप धोकादायक आहे. असं मला वाटलं होतं. पण मी नको सांगूनही ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’मध्ये त्याने भूमिका स्वीकारली आणि ती उत्कृष्ट साकारलीही. इम्रानच्या (Emraan Hashmi) धाडसाचे मला कौतुक वाटतेय.”
‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटानंतर इम्रान भट्ट कॅम्पपासून कायमचा दुरावला. इम्रानने भट्ट कॅम्प बाहेरचा चित्रपट स्वीकारल्यामुळे त्याला पुन्हा या कॅम्पची निर्मिती असणाऱ्या चित्रपटात घेत नाहीत, अशा चर्चा मीडियामध्ये रंगू लागल्या. परंतु यासंदर्भात स्पष्टीकरण देताना महेश भट्ट यांनी सांगितलं, “भट्ट कॅम्पच्या चित्रपटात कधीही सुपरस्टारला घेतलं जात नाही कारण त्यांची फी, त्यांचे नखरे आणि कलात्मक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणं आम्हाला पटत नाही.” भट्ट यांचं म्हणणं खरं होतं. २००० सालानंतर त्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये एकाही सुपरस्टारला घेतलं नव्हतं.
इम्रान हाश्मीने (Emraan Hashmi) भट्ट कॅम्पमधून बाहेर पडल्यावर ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ शिवाय इतरही अनेक चित्रपट केले. डर्टी पिक्चर, शांघाय, घनचक्कर, तुम्हारी अधुरी कहानी, अझहर, इ अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं.
एकीकडे इम्रान आपली व्यवसायिक आयुष्यात स्थिरस्थावर होत होता, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात मात्र तो एका मोठ्या दुःखातून जात होता. २०१४ साली त्याच्या अवघ्या ४ वर्षांच्या मुलाला – अयानला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्याला मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. अयान सुपरहिरोजचा चाहता आहे. त्यामुळे इम्रान त्याला फोन करून बॅटमॅनच्या आवाजात त्याच्याशी बोलायचा. अयानला वाटायचं, त्याला खरोखरच बॅटमॅनचा कॉल आला आहे.
हे सर्व सुरू असतानाच प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक एस. हुसेन झैदी. हुसैन यांनी इम्रानला सल्ला दिला की, तुझ्या मनात जे भावनांचं द्वंद्व चालू आहे त्यावर तू एक पुस्तक लिही. यामुळे इतर कॅन्सर रुग्णांनाही याचा फायदा होईल. इम्रानला (Emraan Hashmi) हा सल्ला पटला. २०१६ मध्ये त्यांनी ‘किस ऑफ लाइफ’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. कॅनडात पाच वर्ष उपचार घेतल्यानंतर अयानचा कर्करोग २०१९ मध्ये पूर्णपणे बरा झाला.
इम्रान आता त्याची पत्नी परवीन आणि मुलगा अयान सोबत खुश आहे. त्याच्या पत्नीची एक गमतीशीर आठवण तो आवर्जून सांगतो. इम्रान हाश्मी बॉलिवूडमध्ये यायच्या आधीपासून परवीन शहानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ६ वर्षांच्या अफेअर नंतर १४ डिसेंबर २००६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. हा किस्सा त्यांच्या लग्नाच्या अगोदरचा आहे.
========
हे देखील वाचा – मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका
========
२००४ सालच्या ‘मर्डर’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी तो परवीन सोबत बसला होता. या चित्रपटात ज्या ज्या वेळी त्याचा आणि मल्लिकाचा ‘किसिंग सीन’ आला त्या त्या वेळी परवीन त्याला नखाने जोरात टोचायची. स्क्रीनिंगमधून बाहेर आल्यावर त्याच्या हातावर अनेक ठिकाणी नखांचे ओरखडे उठले होते. अर्थात नंतर परवीनला समजले की, इमरान पडद्यावर जे करतो आहे तो अभिनय आहे. त्याचं खरं प्रेम तिच्यावरच आहे.
वैयक्तिक आयुष्यात स्थिरस्थावर असणाऱ्या इम्रानला (Emraan Hashmi) व्यावसायिक आयुष्यात प्रतीक्षा आहे ती एका सुपरहिट चित्रपटाची. अक्षयकुमार सोबतच्या त्याच्या सेल्फी (Selfie) हा चित्रपट फेब्रवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपटाचा रिमेक असून इम्रानला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.