‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
केवळ यशस्वी अभिनेत्री नाही तर, तापसी आहे उत्तम बिझनेसवुमन…
सध्याच्या काळातील बॉलिवूडमधल्या गुणी नायिकांमध्ये एक नाव आवर्जून घेतलं जातं, ते म्हणजे तापसी पन्नू (Taapsee Pannu). तापसी पन्नूने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तापसी म्हटलं की, सर्वात आधी आठवतो तो थप्पड चित्रपट. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. अर्थात हे अवॉर्ड तिच्यासाठी विशेष महत्त्वाचं होतं कारण या अवॉर्डसाठी तिला स्पर्धा होती ती दीपिकाच्या बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपटामधल्या मालतीच्या भूमिकेची. पण तापसीला मिळालेलं हे अवॉर्ड अनेकांसाठी सुखद धक्का होता.
जाट शीख कुटुंबात १ ऑगस्ट १९८७ साली जन्मलेल्या तापसी पन्नूचं सुरुवातीचं आयुष्य दिल्लीमध्ये गेलं. तिथेच तिचं शिक्षण पूर्ण झालं. कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअर असणाऱ्या तापसीच्या घरी कोणतीही ‘फिल्मी’ पार्श्वभूमी नव्हती. वडील रिअल इस्टेट एजंट तर आई गृहिणी आणि शगुन नावाची धाकटी बहीण. पदवी प्राप्त केल्यानंतर, तापसीने एका कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीही केली. याच दरम्यान तिला मॉडेलिंगमध्ये रस निर्माण झाला.
तापसी प्रिंट आणि टीव्हीसाठी मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंगच्या विश्वात ती बऱ्यापैकी स्थिरस्थावर होत होती. २००८ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ती सहभागी झाली. यामध्ये तिला ‘पँटालून्स फेमिना मिस फ्रेश फेस’ आणि ‘सफी फेमिना मिस ब्युटीफुल स्किन’ ही अवॉर्ड्स मिळाली.
तापसी (Taapsee Pannu) उत्तम मॉडेल म्हणून नाव कमवत होती. याच दरम्यान ‘गेट गॉर्जियस’ या ‘V’ चॅनेलच्या टॅलेंट शोसाठी तिने ऑडिशन दिली. यामध्ये तिची निवड झाली आणि या शोमुळे तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं कारण याच कार्यक्रमामुळे तिला अभिनयात रुची निर्माण झाली.
तापसीने २०१० साली राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘झुमंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली, तर धनुष्य सोबतचा ‘अदुकलम’ हा तिचा दुसरा चित्रपट. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. त्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला एकूण ६ पुरस्कार मिळाले होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये यश मिळवत असतानाच तिने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. अर्थात दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणं तिने सुरूच ठेवलं.
२०१३ मध्ये आलेल्या ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटाद्वारे तापसीने (Taapsee Pannu) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटावर समीक्षकांनी टीका केली. परंतु बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट हिट ठरला. यानंतर तापसीने बेबी, पिंक, नाम शबाना, बदला, मिशन मंगल, सांड कि आँख, मनमार्जिया, जुडवा २, रश्मी रॉकेट, थप्पड अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. पिंक, नाम शबाना, मनमार्जिया, थप्पड अशा चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचं कौतुक झालं. पिंक आणि बदला चित्रपटात तर अमिताभ बच्चन समोर ती तितक्याच ताकदीने उभी राहिली.
तापसी पन्नूच्या यशाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१८ सालच्या फोर्ब्स इंडिया यादीमध्ये ती ६७ व्या तर, २०१९ मध्ये ती ६८ व्या क्रमांकावर होती. तसंच २०१९ मध्ये ‘टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन’ मध्ये तिला ३६ व्या क्रमांकावर, तर २०२० मध्ये २३ व्या क्रमांकावर स्थान मिळाले होते.
नुकताच तापसीचा ‘दोबारा (2.12) या चित्रपटाचा ऑफिशीअल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर बघून लोकांच्या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर वरून तरी चित्रपटाचं कथानक सस्पेन्स क्राईम थ्रिलर प्रकारातलं असावं,असं वाटतंय, पण यामध्ये टाइम ट्रॅव्हल संकल्पनाही मांडण्यात आल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. तापसी आणि पवन गुलाठी ही जोडी थप्पड नंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हल मध्ये या चित्रपटातील भूमिकेसाठी तापसीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
===========
हे ही वाचा: शबाना आझमी यांनी दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न कारण…
रणवीर ‘दाखवतोय’ ना दाखवू दे की… बघायचं तर बघा.. नाहीतर राहू दे
============
तापसीच्या (Taapsee Pannu) मालकीची ‘द वेडिंग फॅक्टरी’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. तसंच प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये खेळणाऱ्या ‘पुणे 7 एसेस’ या बॅडमिंटन फ्रँचायझीचीही ती मालक आहे. तसंच तिने नुकतंच तिचे प्रॉडक्शन हाऊस ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ सुरु केलं आहे. या बॅनरखाली ती ‘ब्लर’ आणि ‘धक धक’ सारखे चित्रपट बनवत आहे. जवळपास १० पेक्षा जास्त नामांकित ब्रॅंड्सची ती ब्रँड अँबेसेटर आहे. कोणत्याही गॉडफादरशिवाय दिल्लीच्या या इंजिनिअर मुलीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.