दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
देवयानी: “तुमच्यासाठी कायपन….” एक हळवी प्रेमकहाणी
ती एक अशी मालिका होती ज्यामधला एक डायलॉग आजही प्रचंड लोकप्रिय आहे. मिम्स असोत किंवा चॅटिंग करताना केलेलं फ्लर्ट; अगदी प्रोफेशनल आयुष्यापासून वैयक्तिक गप्पांपर्यंत कुठेही हा ‘डायलॉग’ वापरला जातो. हा डायलॉग म्हणजे, “तुमच्यासाठी कायपन..” आणि ती मालिका होती ‘देवयानी (Devyani)’.
स्टार प्रवाह वाहिनीवर २०१२ साली प्रसारित झालेल्या या मालिकेला तेव्हा प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. संग्राम पाटील आणि शिवानी सुर्वे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. त्यावेळी आलेल्या मालिकांपैकी खास करून मराठी मालिकांपैकी निवडक मालिकांनीच तरुणाईला आकर्षित केलं होतं. देवयानी यापैकीच एक मालिका होती
स्टार प्रवाहवर प्राईम टाईमला म्हणजेच दररोज रात्री ८.३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका त्यावेळी सर्वांना आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे यामधली नायिका मुळूमुळू रडणारी, सोशिक नव्हती. तर प्राप्त परिस्थितीला धैर्याने सामोरी जाणारी होती. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यामधून बघायला मिळाली.
‘देवयानी’ ही एका सुसंस्कृत घराण्यातली संस्कारी मुलगी. तिचा होणार नवरा डॉक्टर असतो. लग्न करून एका सुसंस्कृत घरात सून म्हणून जाणाऱ्या देवयानीच्या आयुष्याला अचानक एक वेगळं वळण लागतं. कारण संग्राम पाटीलचा तिच्यावर जीव जडतो. संग्राम तिचा साखरपुडा मोडून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करतो. (Memories of Marathi serial Devyani)
संग्राम पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर सारं काही विकत घेता येतं अशी मानसिकता असणाऱ्या श्रीमंत पण संस्कारशून्य कुटुंबातला बिनधास्त मुलगा, तर देवयानी पैशांपेक्षाही शिक्षण, संस्कार हे शब्द ज्या कुटुंबात अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशा कुटुंबातली हुशार, गुणी मुलगी. किती हा विरोधाभास! शिक्षण, संस्कार या शब्दांशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या कुटुंबात देवयानीला मनाविरुद्ध राहावं लागतं. संग्राम मनाने वाईट नसतो. फक्त त्याची जडणघडण चुकीच्या पद्धतीने झालेली असते. त्याचं देवयानीवर जीवापाड प्रेम असतं. तिच्याबद्दल मनात प्रचंड आदर असतो.
आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून देवयानी नाईलाजाने मन मारून संग्रामसोबत संसार करत असते. आपल्या नशिबात आलेल्या या दुःखामुळे ती रडत बसत नाही, तर प्रसंगाला सामोरं जायचं धैर्य दाखवते. संग्रामच्या कुटुंबात देवयानीच्या तिरस्कार करणारी माणसंही असतात. तिच्यासारख्या संस्कारी मुलीला पाटीलांच्या कुटुंबात जुळवून घेताना अनंत अडचणी येतात. पण संग्राम मात्र तिला सर्वोतपरी जपत असतो.
हळूहळू संग्रामचा चांगुलपणा देवयानीच्या लक्षात यायला लागतो. देवयानीला त्रास होऊ नये म्हणून सतर्क असणारा, सावलीसारखा सतत तिची पाठराखण करणारा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा संग्राम तिला उमगू लागतो. नकळत ती त्याच्या प्रेमात पडते आणि ती त्याला सुधारायचं ठरवते. “तुमच्यासाठी कायपन..” म्हणणारा संग्राम तिची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. पण तरीही पाटीलांच्या घरात हे सर्व सहज सोपं नसतं. (Memories of Marathi serial Devyani)
मालिकेमध्ये प्रेम, दुःख, विरह, फॅमिली मेलोड्रामा या सर्व गोष्टी आहेत. पण ही मालिका वेगळी ठरली ती कथेमधल्या वेगळ्या धाटणीच्या प्रेमकहाणीमुळे. त्यावेळी संग्राम आणि देवयानीची प्रेमकहाणी प्रचंड हिट झाली आणि मालिका यशाच्या शिखरावर पोचली. तेव्हा कित्येक आठवडे ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. नंतर मात्र काही मतभेदांमुळे देवयानीच्या भूमिका शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने ही मालिका सोडली आणि मालिकेचं टीआरपी रेटिंग घसरलं. अर्थात मुख्य नायिका बदलणं हा धक्का प्रेक्षकांनी सहज स्वीकारावा हे अपेक्षितच नव्हतं. त्यात शिवानी आणि संग्राम- देवयानी या जोडीची लोकप्रियता एवढी प्रचंड होती की, तिच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्रीला प्रेक्षकांनी स्वीकारणं तसं अशक्यच होतं.
या मालिकेमध्ये शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, नागेश भोसले, सुरेखा कुडची, सई रानडे, खुशबू तावडे, समिधा कुलकर्णी असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. शिवानी नंतर देवयानीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली ती दीपाली पानसरे ही अभिनेत्री. या मालिकेचा दुसरा भागही आला होता. पण त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (Memories of Marathi serial Devyani)
==========
हे देखील वाचा – मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका
==========
देवयानी ही मालिका स्टार प्लस वरच्या ‘मन कि आवाज प्रतिग्या’ या हिंदी मालिकेचा रिमेक होती. पण देवयानी मालिकेला प्रतिग्या मालिकेपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली. इतर कोणत्याही जोडीपेक्षा संग्राम आणि देवयानी या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही मालिका पुन्हा बघायची असल्यास डिस्ने+हॉटस्टारवर उपलब्ध आहे.