Fashion Journey of Bollywood: 1950 पासून सुरु झालेला बॉलिवूडचा फॅशन प्रवास…
पूर्वी भारतामध्ये सर्वात जास्त फॅशन कुठली ‘फॉलो’ केली जात असे, तर ती चित्रपटांमधली खास करून बॉलिवूडच्या चित्रपटांमधली. सध्याच्या काळात मनोरंजन विश्वाचा आवाका वाढला आहे. डेली सोप, वेबसिरीज असे अनेक पर्याय रसिकांसमोर उपलब्ध झाले त्यातच तंत्रज्ञानाची प्रगती आणि इंटरनेटची सहज उपलब्धता यामुळे सगळी इतर गोष्टींसोबत फॅशनच्या दुनियेचं समीकरणंही बदलून गेली आहेत. (Fashion Journey of Bollywood)
जरा मागे वळून बघीयल तर, साधारणतः ५० च्या दशकापासून सुरु झालेला बॉलिवूडचा फॅशन प्रवास अत्यंत रंजक आहे. अगदी साडीपासून आजच्या शॉर्ट्स पर्यंत आलेला हा प्रवास अविरतपणे २००० च्या दशकापर्यंत चालू होता. आताही चालू आहेच. परंतु, बॉलिवूडचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव तुलनेने बराच कमी झाला आहे. ५० च्या दशकापासूनचा बॉलिवूडचा फॅशन प्रवास कसा होता, याचा थोडक्यात आढावा (Fashion Journey of Bollywood) –
५० च्या दशकातील बॉलिवूड फॅशन
१९५० चे दशक भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हटला जातो. त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. सिनेजगतातील तंत्रज्ञान फारसे विकसित झाले नव्हते. राष्ट्रप्रेम, संस्कृती, श्रीमंत- गरिबी अशा वातावरणात स्वतंत्र भारतातील चित्रपटसृष्टी आकार घेत होती.
त्यावेळच्या चित्रपटांमध्ये आघाडीच्या भारतीय नायिका साडीच नेसत असत. ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटांच्या जमान्यात साडीपेक्षाही लोकप्रिय होती ती ब्लाउजची फॅशन. साडी व्यतिरिक्त शरारा म्हणजे ब्लाउज, लांब स्कर्ट आणि दुपट्टा ही फॅशनही बऱ्यापैकी लोकप्रिय होती. हेअरस्टाईलचा विचार केला तर, लांबसडक केसांची वेणी आणि क्वचित चेहऱ्यावर रुळणारी एखाद दुसरी बट अशा अगदी साध्या वेषातही नायिका आपल्या दिलखेचक अदांनी आणि आपल्या नेत्रकटाक्षांनी प्रेक्षकांना घायाळ करत असत. (Fashion Journey of Bollywood
१९६० च्या दशकातील बॉलिवूड फॅशन
बॉलीवूडसाठी साठचे दशक हा एक विलक्षण काळ होता. या काळात नायिका ‘फॅशन’ या संकल्पनेबद्दल खास करून आपल्या हेअरस्टाईलबाबत अधिक सतर्क झाल्या होत्या. गंमत म्हणजे त्या काळात तयार झालेल्या काही हेअरस्टाईल आजही लोकप्रिय आहेत.
‘मुघल-ए-आझम’ मध्ये पारंपरिक मुघलकालीन दागिने आणि घेरदार ड्रेस घालून वावरणारी अनारकली कोण विसरेल? आजही तशा प्रकारच्या ड्रेसना ‘अनारकली ड्रेस’ म्हणूनच ओळखले जाते.
या दशकातील म्हणण्यापेक्षा एकूणच बॉलिवूडमधील हेअरस्टाईलचा विषय ‘साधना’ या अभिनेत्रीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ‘वो कौन थी’ या चित्रपटातील तिचा हेअरकट इतका लोकप्रिय झाला की, आजही तो हेअरकट तिच्या नावाने ओळखला जातो. त्या काळात देशभरातील ब्युटी पार्लर्स आणि सलून्समध्ये ‘साधना कट’ची मागणी प्रचंड वाढली होती.
‘आराधना’ चित्रपटात शर्मिला टागोरने परिधान केलेल्या ब्लाउजची फॅशनही प्रचंड लोकप्रिय झाली होती. घट्ट ब्लाउज, खोल नेकलाइन्स आणि कुरकुरीत प्लेटेड साड्या तरुणींच्या विशेष पसंतीच्या होत्या. याच काळात ‘साहेब बीवी और गुलाम’ मधील मीना कुमारीने परिधान केलेल्या सिल्कच्या साड्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. (Fashion Journey of Bollywood)
७० च्या दशकातील बॉलिवूड फॅशन
रोमान्स आणि हिप्पी संस्कृतीचा थोडा तडका असलेल्या बॉलीवूड चित्रपटांसाठी तो ॲक्शन चित्रपटांचा काळ होता. अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन आणि ऋषी कपूरची रोमँटिक स्टाईल तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती.
शर्मिला टागोर, परवीन बाबी, झीनत अमान, हेमा मालिनी, नीतू सिंग, डिंपल कपाडिया यासारख्या बॉलीवूडच्या आघाडीच्या नायिकांनी या काळात वेशभूषा आणि केशभूषेच्या विविध फॅशन्स लोकप्रिय केल्या. वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबँड्स आणि क्लिप्सची फॅशन या काळापासूनच सुरु झाली.
या काळात नायिका काहीशा बोल्ड झाल्या. झीनत अमानचा रेट्रो हिप्पी लूक, शर्मिला टागोर, डिंपल कपाडिया यांचा बिकिनी लूक प्रेक्षकांसाठी धक्का होता, तर पोल्का डॉटेड ब्लाउज आणि घट्ट चुणीदार सलवारची फॅशनही लोकप्रिय झाली होती. या दशकातील विशेष उल्लेखनीय ट्रेंड होता, बेल बॉटम्स आणि बेल स्लीव्हज. (Fashion Journey of Bollywood)
८० च्या दशकातील बॉलिवूड फॅशन
या काळात डिस्कोचा ट्रेंड आला. शिफॉन आणि क्रेपच्या घट्ट आणि चमकदार कपड्यांची फॅशन विशेष लोकप्रिय झाली होती. त्या काळात रेखा आणि श्रीदेवी ग्लॅमरस फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जात असत.
या काळात ‘कयामत से कयामत तक’ मधली जुही, ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘चांदनी’ मधली श्रीदेवी आणि ‘उमराव जान’ मधली रेखा ‘फॅशन स्टेटमेंट्स’ बनल्या होत्या. या युगाला सामान्यतः ‘पॉटबॉयलर’ असं संबोधलं जातं. साधारणतः या शकाच्या उत्तरार्धात कुरळ्या केसांची स्टाईल लोकप्रिय झाली होती.
९० च्या दशकातील बॉलिवूड फॅशन
९० चं दशक हे उंबरठ्यावरचे दशक म्हणून ओळखलं जातं. आजचं जग आणि कालचं जग या दोन्ही गोष्टींचा साक्षीदार असणाऱ्या या दशकात बॉलिवूडमधील फॅशनमध्ये आमूलाग्र बदल झाले. हा काळ होता रोमँटिक, कौटुंबिक आणि कॉमेडी चित्रपटांचा. ‘हम आपके है कौन’ सारखी कौटुंबिक कथा, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, हम दिल दे चुके सनम सारख्या प्रेमकहाण्या आणि गोविंदाच्या कॉमेडी चित्रपटांनी हा काळ गाजवला होता.
माधुरी दीक्षित, जुही चावला, करिश्मा कपूर, रवीना टंडन, काजोल, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा या नायिका फॅशन आयकॉन होत्या. शॉर्ट स्कर्ट, मॅक्सी, डेनिम जॅकेट, जंपर्स आणि इतर अनेक फ्यूजन वेअर्सची फॅशन या काळातच सुरु झाली. याच काळात कुरळ्या केसांची क्रेझ मागे पडून स्ट्रेट हेअर्सची फॅशन सुरु झाली. (Fashion Journey of Bollywood)
२००० च्या दशकातील बॉलिवूड फॅशन
या काळात तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग वाढला होता. इंटरनेटचा प्रसार झाला होता. याच काळात ऑफशोअर लोकेशन्स आणि बिग बजेट चित्रपटांचा काळ सुरु झाला. चित्रपटातील नायिका वेस्टर्न वेअर सह फ्युजन वेअर मोठ्या प्रमाणावर वापरू लागल्या.
ऐश्वर्या राय, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, करीना कपूर यांनी या दशकात वेस्टर्न वेअर्स आणि फ्युजन वेअर्स खूप मोठ्या प्रमाणावर वापरले आणि लोकप्रिय केले. (Fashion Journey of Bollywood)
===============
हे ही वाचा: राम गोपाल वर्मा यांचा घटस्फोट उर्मिला मातोंडकरमुळं झाला होता?
‘तो’ चित्रपट सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामधली खूप मोठी चूक होती
===============
आता मात्र बॉलीवूडला फॅशन आयकॉन म्हणण्यासारखे दिवस राहिलेले नसले तरी आजही अधून मधून बॉलिवूडमधल्या काही फॅशन्स लोकप्रिय होत असतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे फॅशनसाठी बॉलीवूडला फॉलो करण्याचे दिवस मागे पडले असले तरी फॅशनच्या दुनियेत मात्र दररोज नवनवीन फॅशन्स येत असतात.