दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गुंतता हृदय हे: अवघ्या १६० भागांच्या खिळवून ठेवणारी रहस्यमय मालिका
झी मराठीने १०.३० वाजताची वेळ ही जणू रहस्यमय, हॉरर मालिकांसाठीच निश्चित केली आहे. याची सुरुवात झाली ती ‘गुंतता हृदय हे (Guntata Hriday He)’ या मालिकेपासून. २००० साली सुरु झालेली ही मालिका विवाहबाह्य संबंधांवर आधारित रहस्यमय, कौटुंबिक मालिका होती. अत्यंत वेगळ्या वळणावरची अशी ही मालिका अवघ्या १६० भागांत संपवल्यामुळे मालिका कुठेही भरकटली नाही त्यामुळे ती कंटाळवाणीही झाली नाही.
मालिकेचं कथानक एकदम वेगळं होतं. नयना आणि विक्रम एक सुखवस्तू जोडपं. या दोघांना एक मुलगी असते. त्यांच्यासोबत नयनाचे आई वडीलही राहत असतात. नयनाच्या वडिलांचा व्यवसाय आता विक्रम सांभाळत असतो. नयनाच्या आई वडिलांना खास करून वडिलांना विक्रम कधीच पसंत नसतो. पण निव्वळ नयनाच्या हट्टासाठी त्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिलेला असतो.
मयंक विक्रमचा मित्र आणि बिझनेस पार्टनर असतो. विक्रमबद्दल त्याच्याही मनात थोडा राग असतोच. तर, अनन्या विक्रमच्या ऑफिसमध्ये काम करत असते. तिचा नवरा नेव्हीमध्ये नोकरीला असल्यामुळे ती तिच्या आंधळ्या सासऱ्यांसोबत राहत असते. अनन्या आणि विक्रम एकमेकांवर प्रेम करत असतात. थोडक्यात या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झालेले असतात. अर्थातच ही गोष्ट ते दोघे सोडून कोणालाच माहिती नसते. (Memories of Marathi serial Guntata Hriday He).
सगळ्यांचं आयुष्य सुरळीत चाललं आहे, असं वाटत असतानाच आयुष्यात अचानक, अनपेक्षित रहस्यमय घटना घडू लागतात. या घटना कोण घडवून आणत असतं, का घडवून आणत असतं, याबद्दल काहीच कळत नसतं. एकामागून एक अनपेक्षित घटना घडत जातात आणि विक्रम व नयना त्यात गुंतत जातात. या घटनांमुळे दोघांचं भावविश्वाच बदलून जातं. संकटांचा ससेमिरा चुकवत असताना दोघे अगदी हतबल होतात. या दोघांबरोबरच घडणाऱ्या घटनांची झळ अजून एका व्यक्तीला पोचत असते. ती व्यक्ती म्हणजे, विक्रमाची प्रेयसी, अनन्या.
पहिल्या भागापासूनच मालिका अगदी उत्कंठावर्धक झाली होती. एकामागून एक घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे प्रेक्षकही अजिबात एकही भाग न चुकवता ही मालिका बघत होते आणि आपआपल्या परीने रहस्याचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होते. प्रेक्षकांच्या संशयाची सुई कधी मयंकवर फिरत असे, तर कधी विक्रम – नयनाच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर, तर कधी अनन्याच्या सासऱ्यांवर. जस जशी मालिका पुढे सरकत गेली तसतसं विक्रम, नयना आणि अनन्या सोडून प्रत्येकजणच दोषी वाटू लागला होता. जितकं रहस्य उत्कंठावर्धक होतं तितकीच त्याची उकलही धक्कादायक आणि अनपेक्षित होती. (Memories of Marathi serial Guntata Hriday He)
रहस्यमय किंवा हॉरर, थ्रिलर मालिकांमध्ये सामान्यतः दाखवल्या जाणाऱ्या अघोरी गुन्हेगारी घटना या मालिकेत अजिबात दाखवण्यात आलेल्या नव्हत्या, ही या मालिकेची जमेची बाजू. याचबरोबर विक्रम आणि अनन्याची हळवी प्रेमकहाणी प्रेक्षकांना विशेष भावली. त्यामुळे या दोघांचं नातं विवाहबाह्य असूनही प्रेक्षकांनी ते स्वीकारलं. मालिकेमध्येही अनन्याला कुठेही खलनायिका म्हणून दाखवण्यात आलं नाही. विक्रम आणि अनन्या एकमेकांवर प्रेम करत असतात मात्र त्यांना त्यांचे संसारही जपायचे असतात. विक्रमचं नयना आणि मुलीवरही तेवढंच प्रेम असत. तसंच त्याला अनन्या आणि तिच्या पतीमध्ये असणारे मतभेद लवकरात लवकर दूर व्हावेत असंही मनापासून वाटत असतं.
मालिकेमध्ये संदीप कुलकर्णी (विक्रम) आणि मृणाल कुलकर्णी (नयना) ही जोडी अवंतिकानंतर खूप वर्षांनी एकत्र पाहायला मिळाली. पल्लवी सुभाष अनन्याच्या भूमिकेत कमालीची गोड दिसलेय. बाकी सागर तळाशीकर (मयंक) मोहन आगाशे (अनन्याचे सासरे) यांच्या भूमिकाही छान जमून आल्या आहेत. (Memories of Marathi serial Guntata Hriday He)
==============
हे ही वाचा: जेव्हा उमेश कामतला एक ‘नॉन मराठी मुलगा’ पोलिओग्रस्त समजला…
जो जिता वही सिकंदर: कास्टिंगमध्ये होणारे सततचे बदल ठरले होते निर्मात्यासाठी डोकेदुखी
===============
मालिकेची पटकथा आणि संवाद लिहिले होते चिन्मय मांडलेकर याने तर, दिग्दर्शक होते सतीश राजवाडे. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी रहस्यमय मालिका दाखवताना ती कुठेही ट्रॅक सोडणार नाही याची सर्वोतपरी काळजी दिग्दर्शकाकडून घेण्यात आली होती. त्याचबरोबर विक्रम आणि अनन्याच्या विवाहबाह्य हळव्या प्रेमाला पडद्यावर सकारात्मक पद्धतीनं सादर करताना अशा संबंधांचा पुरस्कारही करण्यात आला नाही. अत्यंत प्रभावी पद्धतीने हे नातं मांडल्याबद्दल दिग्दर्शकाचं विशेष कौतुक.
मालिकेचं शीर्षक आणि शीर्षकगीत कथेला अगदी समर्पक होतं. शीर्षकगीत श्रवणीय तर आहेच शिवाय प्रचंड प्रभावी झालं आहे. अवघ्या दीड मिनिटांच्या गाण्यामध्ये मालिकेचा पूर्ण आशय दडलेला आहे. ही मालिका बघायची असल्यास झी 5 ॲप तसंच यु ट्यूबवरही उपलब्ध आहे.