दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कबीर सिंग: या चित्रपटात शाहिद – कियारा पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा आले होते एकत्र
शाहिद कपूरसाठी 2019 हे साल खास ठरलं ते त्याच्या कबीर सिंग (Kabir Singh) या चित्रपटामुळे. या चित्रपटाबद्दलचे समीक्षकांचे रिव्ह्यू तसे फारसे चांगले नव्हते. पण या तरीही कबीर सिंगला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आणि हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकब्लस्टर हिट चित्रपट ठरला. चित्रपटाच्या यशामध्ये गाणी आणि गोड चेहऱ्याची कियारा अडवाणी हिचाही वाटा होताच, पण तरीही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला तो सणकी प्रेमी कबीर सिंग.
कबीर सिंग हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक होता. चित्रपटाची कहाणी म्हणजे फक्त आणि फक्त लव्ह स्टोरी. कॉलेजचे दिवस, पहिलं प्रेम, रॅगिंग, घरातून होणारा विरोध या टिपिकल कथेला सणकी नायकाचा तडका मारून एक हटके कथा सादर केली. हीच गोष्ट प्रेक्षकांना खास करून तरुण वर्गाला विशेष भावली. आजच्या तरुणाईला गुडी गुडी नायक आवडत नाही, तर थ्री इडिटच्या रांचो सारखा खट्याळ किंवा कबीर सिंग सारखा सणकी पण रोमँटिक नायक विशेष भावतो. आणि म्हणूनच तरुणाईने कबीर सिंगला भरभरून प्रतिसाद दिला.
कॉलेजला रॅगिंग करणारा, गर्लफ्रेंडच्या कानाखाली आवाज काढणारा, तिच्या घरी जाऊन राडा करणारा, ब्रेकअप नंतर दिवसरात्र दारूच्या नशेत आणि सिगारेटच्या धुरात बुडालेला कबीर सिंग तरुणाईच्या पसंतीस उतरला. मुख्य म्हणजे यामध्ये तो ‘कॉलेज बॉय’ वाटतोय. म्हणूनच त्याला प्रेक्षकांनी स्वीकारलं. चाळिशीतले नायक कॉलेज बॉय म्हणून स्वीकारायला आजचा प्रेक्षक तयार नाही. कबीर सिंगच्या भूमिकेसाठी शाहिदने तब्बल १४ किलो वजन कमी केलं होतं. लुक्ससोबत अभिनयामध्येही शाहिदने बाजी मारली. २०१६ साली आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटानंतर सुपरहिट चित्रपटासाठी शाहिदला तब्बल तीन वर्ष वाट पाहायला लागली. कबीर सिंगच्या यशाने त्याच्या कारकिर्दीची बुडती नौका तर सावरलीच शिवाय त्याचा भावही वधारला.
कबीर सिंगने बॉलिवूडच्या नायक – नायिकेच्या टिपिकल संकल्पनेला छेद दिला आहे. विचित्र स्वभावाचा नायक आणि लग्नाआधी प्रेग्नन्ट होणारी नायिका यामध्ये दाखवण्यात आली आणि प्रेक्षकांना हे अगदी सहज स्वीकारलं. चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीच. इथे मात्र ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’चा अनुभव कबीर सिंग देतो, असं म्हणावं लागेल. आता थोडंसं चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान घडलेल्या किस्स्यांबद्दल (Lesser Known Facts about Kabir Singh)-
शाहिद कपूर होता दिग्दर्शकाची पहिली निवड
चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी जेव्हा ‘उडता पंजाब’चं ट्रेलर पाहिलं तेव्हाच शाहिद कपूरला मुख्य भूमिका देण्याचा ठरवलं होतं. जेव्हा कबीर सिंगचं कास्टिंग सुरु झालं तेव्हा त्यांनी शाहिदला भेटून त्याला स्क्रिप्ट ऐकवली. शाहिदला स्क्रिप्ट आवडली आणि त्याने होकार दिला. शाहिदचा होकार आल्यावर संदीप रेड्डींनी त्याला त्वरित साइन केलं.
निर्मांत्यांची पसंती होती अर्जुन कपूर
कबीर सिंगच्या निर्मात्यांपैकी एक अश्विन वर्दे यांची मुख्य भूमिकेसाठी पहिली पसंती होती ती अर्जुन कपूरला. पण संदीप वंगा यांनी शाहिद कपूरला आधीच साइन केलेलं असल्यामुळे त्यांनी आपला विचार बाजूला ठेवला. आणि अर्थातच हा सुज्ञपणा शाहिदने सार्थ ठरवला. (Lesser Known Facts about Kabir Singh)
संदीप रेड्डी यांच्या मुलाचं नाव
दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी त्यांच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्यांना मुलगा झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मुलाचं नाव ठेवलं – ‘अर्जुन’. म्हणजे त्यांच्या मुलाचं पूर्ण नाव आहे ‘अर्जुन रेड्डी’. जे चित्रपटाचं नाव आहे. संदीप वंगा रेड्डी यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता.
शाहिद कपूरचे लुक्स आणि चित्रीकरण
चित्रपटात शाहिद कपूरचे तीन मुख्य लुक्स दाखवण्यात आले आहेत. एक लांब केस आणि दाढी, दुसरा लांब केस आणि क्लीन शेव्ह, तर तिसरा क्लीन शेव्ह आणि बारीक केस. याच क्रमाने चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. (Lesser Known Facts about Kabir Singh)
==============
हे ही वाचा: ‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..
अमिताभ बच्चन यांनी मला ठार मारण्याच्या प्रयत्न केला; परवीन बाबी यांनी केला होता गौप्यस्फोट..
==============
शाहिद कपूर – कियारा पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा आले एकत्र
शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ‘उर्वशी’ या व्हिडिओ अल्बममधील एका गाण्यात एकत्र काम केले होते. हे गाणं कबीर सिंगचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणं चित्रपटामध्ये घ्यायचा विचार दिग्दर्शकांनी केला होता. परंतु ते चित्रपटाच्या थीमला शोभत नाही, असं शाहिदने सांगितल्यामुळे संदीप यांनी हा बेत रद्द केला . (Lesser Known Facts about Kabir Singh)
कबीर सिंग हा चित्रपट बघायचा असल्यास नेटफ्लिक्स व युट्युबवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDB वर ७ रेटिंग देण्यात आलं आहे.