
बॉईज ३: खळखळाटी हास्याची रोलरकोस्टर
जशी मागणी तसा पुरवठा! हा जगमान्य नियम आहे. मागणी आहे म्हणूनच आता सिनेमांचा सिक्वल आलाय. आणि आता सिक्वल आलाय म्हंटल्यावर तो पाहायला हवा. कारण, असं नेमकं काय आहे? ज्यासाठी निर्मात्यांनी तिसऱ्या सिनेमांचा घाट घातला आहे. त्यामुळे तुमचं नाय.. माझं नाय तुम्ही सिनेमा जरूर एकदा तरी पाहावा. असं मी अगोदरच सांगून टाकतो. (Boyz 3 Movie Review)
हा सिनेमा तुम्हाला ‘हास्याची रोलरकोस्टर’ घडवण्यास पूर्ण सक्षम आहे. आणि हा, ज्यांच्यासाठी ही ‘बॉईज’ची सिरीज नवी आहे त्यांनीही हा तिसरा सिनेमा थेट पाहण्यास हरकत नाही. थोडक्यात तुम्ही स्वतंत्रपणे ‘बॉईज ३’ हा सिनेमा पाहू शकता. मागच्या-पुढच्या संदर्भात तुम्ही सिनेमा पाहताना अडकणार नाही. याची काळजी दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि लेखक ऋषिकेश कोळी यांनी घेतली आहे.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा आणि विनोदाचा डोस हा सिनेमा तुम्हाला देतो. विशेष म्हणजे या सिनेमाचे सादारकर्ते अवधूत गुप्ते असल्यानं त्यांनी यापूर्वीच्या दोन सिनेमांच्या चुका यावेळी केलेल्या नाहीत. एकदम दमदार आणि प्रेक्षकांचं हमखास मनोरंजन करेल; असा सिनेमा त्यांनी यावेळी प्रेक्षकांसमोर आला आहे.
आता अवधूत गुप्ते आहे म्हंटल्यावर सिनेमातील गाणी दमदार असणारच! गाणी हा या सिनेमांचा हुकमी एक्का आहे, असं म्हणायला हरकत नाही. विविध घटना-प्रसंगांत आणि पटकथेत चपखल बसतील अशा गाण्याची पेरणी सिनेमात करण्यात आली आहे. त्यामुळे गाणी वाजली की टाळ्या, शिट्ट्या वाजल्याशिवाय राहणार नाही. सोबतच सिनेमाची बांधणी पूर्णतः विनोदी काहीशी प्रौढ विनोदाची झालर असलेला आहे. या अगोदरच्या दोन सिनेमांपेक्षा यंदाचा सिनेमा अधिक सुपीक आहे. तो प्रौढ जरुर आहे. पण, अश्लिल मुळीच नाही. (Boyz 3 Movie Review)

दिग्दर्शक विशाल देवरुखकर याने ‘बॉईज ३’ हा सिनेमा शिताफीने आणि सर्वसमावेश प्रेक्षकांना विचारात घेऊन दिग्दर्शित केला आहे. सोबतच लेखक म्हणून ऋषिकेश कोळी याने देखील शब्दाच्या योग्य चौकटीत सिनेमांचे लेखन केलं आहे. खासकरून सिनेमाचे संवाद हे प्रत्येक पात्राप्रमाणे बदलत जातात. त्यात एकसुरीपणा दिसत नाही.
एकदम चकचकीत आणि खिळवून ठेवणारा हास्याचा पट दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर आणलाय. सिनेमातील बहुतांश विनोद हे प्रासंगिक आहेत. शाब्दिक विनोदांचा मोह लेखकाला जरूर झाला आहे, पण त्याचं प्रमाण पचनी पडणारे आहे. सिनेमा भरगच्च विनोदांनी भरलेला असला, तरी तो काही ठिकाणी कंटाळवाणा होतो. काही प्रसंग पाणी टाकून वाढवल्याचे भासतात, तर काही प्रसंग लेखक-दिग्दर्शकाने अधिकच शब्दबंबाळ केले आहेत.
ढुंग्या (पार्थ भालेराव), धैर्या (प्रतीक लाड) आणि कबीर (सुमंत शिंदे) या त्रिकुटाची धमालमस्ती म्हणजे ‘बाईज ३’. बेधुंद आणि बेजबाबदार असे हे ‘चड्डी’ मित्र आहेत. हे असं मी का म्हणतोय? ते यापूर्वीचे दोन सिनेमे पाहिलेल्यांना चटकन समजलं असेल आणि ज्यांना समजलं नाही, त्यांनी समजून घेण्यासाठी आता तिसरा सिनेमा पाहावा. बरं या तीन मित्रांना काही कारणास्तव कर्नाटकला जावं लागतं. तशी या सिनेमांची पटकथा ‘रोड ट्रिप’ची आहे. आजवर तुम्ही पाहिलेल्या इतर रोड ट्रिप सिनेमांची मज्जा यातही आहे. कारण, या ‘बॉईज ३’च्या रोड ट्रिपमध्ये असंच काहीसं घडतं जे तुम्ही यापूर्वी इतर सिनेमात पहिल्या सारखं वाटेल. (Boyz 3 Movie Review)
तर, ही रोड ट्रिप कर्नाटकच्या दिशेने निघते. पण, या प्रवासात किंबहुना या त्रिकुटात कीर्ती (विदुला चौगुले) नावाच्या मुलीची एंट्री होते. जी स्वतःच्या लग्नातून पळून आली आहे. तिच्या येण्याने या प्रवासात येणारी रंगत कशी वाढते, हे पाहणं मनोरंजक आहे. सोबतच मुलीची एंट्री झाली म्हणजे प्रेम प्रकरण तर होणारच. ते कसं? का? कोणासोबत? यशस्वी की अपयशी? सगळ्या प्रश्नांची रंजक उत्तर सिनेमात सामावलेली आहेत.
===================
हे ही वाचा: हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
हिरॉईन: या चित्रपटाने बॉलिवूडची ‘अंदर कि बात’ सर्वांसमोर आणली….
==================
पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणि सुमंत शिंदे यांनी पडद्यावर अक्षरशः धमाल केली आहे. खासकरुन पार्थने त्यांच्या विनोदाचं टायमिंग उत्तम जमवलं आहे. तसंच सुमंतच्या अभिनयातील संयमीपणा यावेळी आवर्जून दिसतो. सोबतच समीर चौघुले, गिरीश कुलकर्णी आणि ओंकार भोजने यांनी त्यांच्या खास शैलीनं सिनेमात अधिक रंगत आणली आहे.
विदुलानं तिच्या पदार्पणाच्या सिनेमात सुरेख काम केलं आहे. यापुढे देखील ती, सिनेमांच्या पडद्यावर अधिक चांगल्या भूमिकांमध्ये जरूर दिसायला हवी. सिनेमाचे आणखी एक बलस्थान म्हणजे छायांकन. कर्नाटकचे निसर्गसौंदर्य पटकथेशी एकरुप करुन दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफरने कॅमेराबद्ध केले आहे. तुम्ही या अफलातून ‘रोड ट्रिप’ला जरुर जायला हवं
सिनेमा : बॉईज ३
निर्मिती : लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय
दिग्दर्शक : विशाल देवरुखकर
लेखन : ह्रिषीकेश कोळी
कलाकार : पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, विदुला चौगुले
संगीत : अवधूत गुप्ते
छायांकन : योगेश कोळी
दर्जा : तीन स्टार