‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; सनबर्न एरेना,
‘डर’ सिनेमातून आमिर खानचा पत्ता कसा काय कट झाला?
आपल्याकडे एक म्हण आहे ‘जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो एक दिवस त्यालाच त्या खड्ड्यात पडावे लागते’ अभिनेता आमिर खान याच्या बाबतीत असेच झाले.कुणासाठी त्याने खोदला खड्डा? यश चोप्रा यांच्या ‘डर’ या चित्रपटाच्या वेळेचा हा किस्सा आहे . यश चोप्रा जेव्हा ‘डर’ या चित्रपटाची जुळवा जुळवा करत होते त्यावेळी सुरुवातीला या सिनेमाची सनी देवल, दिव्या भारती आणि आमिर खान ही स्टार कास्ट ठरवली होती. मात्र आमिर खानला या चित्रपटाची नायिका म्हणून दिव्या भारती सारखी नवोदित अभिनेत्री नको होती. त्याचा चॉईस होता जुही चावला. त्यामुळे त्याने यश चोप्रांकडे तिच्या नावाचा आग्रह धरला. यश चोप्रा यांनी अर्थातच नायकाच्या डिमांडचा (आमिरच्या खानच्या मागणीचा) (Aamir Khan Demand)विचार करून दिव्या भारतीला चित्रपटातून काढून तिच्या जागी जुही चावलाची वर्णी लावली. अशा प्रकारे दिव्या भारतीचा चित्रपटातील पत्ता कट झाला. चोप्रा सोबत फिल्म करायला मिळतेय हे दिव्याचे स्वप्न एका फटक्यात भंगले. ती अर्थातच खूप नाराज झाली.
चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते परंतु आमिर खान (Aamir Khan Demand)सिनेमातील आपल्या भूमिकेबाबत थोडासा कन्फुज्ड होता. त्याला त्याच्या इमेजची खूप काळजी होती. निगेटिव्ह शेडची भूमिका प्रेक्षक स्विकारतील का आणि त्याचा आपल्या करिअरवर किती परिणाम होईल याचा तो कायम विचार करत होता. टू बी ऑर नॉट टू बी असं मनात द्वंद्व चालू होतं. चित्रपटाच्या क्लायमॅक्स बद्दल त्याच्या मनात खूप शंका होत्या. तो रोज यश चोप्रांच्या खनपटीला बसून स्क्रिप्ट मध्ये चेंजेस करत होता. यश चोप्रांना अर्थातच ही गोष्ट आवडत नव्हती. कारण यश चोप्रा दिग्दर्शनातील मोठे प्रस्थ होते. त्यामानाने आमिर खान हा खूपच नवखा होता. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी सहन केले पण नंतर मात्र आमिर खान (Aamir Khan Demand)आणि यश चोप्रा यांच्यात खटके उडू लागले. त्यांच्यातील ‘क्रिएटिव्ह डिफरन्स’ इतके वाढू लागले की एक दिवस यश चोप्रांनी आमिर खानला चित्रपटातून डच्चू दिला. ज्या जुही चावला ला सिनेमात घ्यावे म्हणून आमिर खानने दिव्या भारतीचा ‘डर’ मधील पत्ता कट केला ; (ती जुही सिनेमात राहिली!) आणि त्याच आमिर खानचा पत्ता पुढे यश चोप्रानी कट केला! एका अर्थाने हा काव्यगत न्याय झाला असेच म्हणावे लागेल.
आमिरच्या जागी शाहरुख खानची निवड झाली. अर्थात आमिर खानला हा चित्रपट सोडल्याचा पश्चाताप नक्कीच होत होता कारण या चित्रपटापासूनच शाहरुख खानच्या स्टारडम ची सुरुवात झाली! हा बॉलिवूडचा कदाचित पहिला चित्रपट असावा ज्यामध्ये निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी जास्त प्रेम दिले. शाहरुख खान च्या समोर सनी देओल खूपच फिका पडलेला दिसत होता त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सनी देओल ने जाहीरपणे आपले कॅरेक्टर पटकथेत नीट मांडले गेले नसल्याची खंत व्यक्त केली होती.दिव्या भारती बिचारी दुर्दैवी ठरली . आधी हातातून सिनेमा गेला आणि नंतर ती स्वत:च या दुनियेतून निघून गेली.
=======
हे देखील वाचा : जेंव्हा लंडन मध्ये अमिताभ-जया ला कुणीच ओळखले नाही!
=======
२४ डिसेंबर १९९३ रोजी प्रदर्शित झालेला ‘डर’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. त्या वर्षीच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटात हा तिसर्या क्रमांकावर होता. याच्या आधी आंखे आणि खलनायक या चित्रपटाचे क्रमांक होते. डर हा सिनेमा ‘व्हायलेंट लव स्टोरी’ म्हणून तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. शाहरुख खान याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता याच चित्रपटातून मिळाली. जुही चावला साठी हे वर्ष खूप लक्की होतं यावर्षी तिचे दोन सिनेमे सुपरहिट ठरले होते.आमीर सोबतचा ‘हम है राही प्यार के’ प्रचंड लोकप्रिय ठरला. शिव हरी यांनी ‘डर’ लां दिलेले संगीत खूप गाजले. या सिनेमावर पुरस्कारांची बरसात झाली. यश चोप्रा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. फिल्मफेयर चे तब्बल १० नामांकने मिळाली तर सर्वोत्कृष्ट विनोदवीर (अनुपम खेर) आणि सर्वोत्कृष्ट छायांकन (मनमोहन सिंग) हे पुरस्कार मिळाले.
धनंजय कुलकर्णी