दिलचस्प किस्सा किशोरच्या ‘दूर गगन की छाव में’च्या रिलीजचा!
साठच्या दशकात किशोर कुमारने एक अतिशय भावगर्भ संवेदनशील विषय असलेला आणि अतिशय ‘मिनिंग फुल’ म्हणता येईल असा चित्रपट बनवला होता. गंमत म्हणजे इतरांच्या सिनेमांमध्ये उनाडक्या करणारा किशोर या सिनेमात मात्र अतिशय गंभीरपणे वावरताना दिसला होता. हा चित्रपट होता ‘दूर गगन की छाव मे’ १९६४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. किशोर कुमारने रेडीओ वरील एका कार्यक्रमामध्ये हा किस्सा सांगितला होता. त्याचा हा चित्रपट फार चालणार नाही असे त्याला वाटत होते कारण विषय गंभीर होता. लोक हा विषय स्वीकारतील की नाही याची त्याला शंका होती. या सिनेमाला थिएटर देखील मिळत नव्हते. चित्रपट तर बनवून तयार झाला होता. रिलीज करणे भाग होते. पण मुंबईत थिएटर काही केल्या मिळत नव्हते.
याच काळात त्याची भेट सुबोध मुखर्जी यांच्यासोबत झाली. सुबोध मुखर्जी किशोर कुमारचे मेहुणे शशीधर मुखर्जी यांचे धाकटे बंधू होते. ते किशोरकुमारला म्हणाले,” माझा ‘एप्रिल फूल’ हा चित्रपट बनवून तयार आहे. यासाठी मी मुंबईचे अलंकार हे थिएटर आठ आठवड्यांसाठी बुक केले आहे. यातील एक आठवडा मी तुला तुझ्या चित्रपटासाठी देऊ शकतो. नाही तरी हा चित्रपट तू म्हणतो त्याप्रमाणे एखादा आठवडाच चालू शकेल! त्यानंतरचे सात आठवडे मी माझा चित्रपट तिथे लावू शकतो.” किशोरला वाटले एक आठवडा तर एक आठवडा! म्हणून त्याने हा चित्रपट अलंकार थिएटरमध्ये रिलीज केला. किशोर कुमारने ज्या पद्धतीने भविष्यवाणी केली होती, त्या पद्धतीनेच त्याचे स्वागत झाले. पहिल्या शोला केवळ दहा लोक उपस्थित होते! पण हळूहळू माऊस पब्लिसिटीने चित्रपटाला गर्दी वाढू लागली आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी पासून तर थिएटरला हाउसफुलचा बोर्ड लागू लागला.किशोर करीता ही ब्रेकिंग न्यूज होती. ज्यावेळी प्रेक्षकांना कळाले की, हा चित्रपट फक्त एक आठवडासाठीच या थिएटरमध्ये आहे तेव्हा लोकांची आणखी गर्दी होऊ लागली! इतकी गर्दी की पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे किशोर कुमारने आपल्या सिनेमाचा मुक्काम आणखी काही आठवडे त्या थिएटरमध्ये ठेवायचा निर्णय घेतला. तब्बल आठ आठवडे हा सिनेमा तिथे हाउसफुल चालला. तिथे आठ आठवड्याचे बुकिंग होते; त्यामुळे त्यानंतर हा सिनेमा मुंबईच्या ‘सुपर’ थिएटरला शिफ्ट केला गेला. या थिएटरला तब्बल २१ आठवडे ‘दूर गगन की छाव मे’ या चित्रपटाचा मुक्काम होता. जो सिनेमा एक आठवडा देखील चालणार नाही, असे किशोर कुमारला वाटत होतं त्या सिनेमाने तब्बल २९ आठवडे मुंबईमध्ये मुक्काम केला होता.
======
हे देखील वाचा : महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!
======
तिकडे ज्या ‘एप्रिल फुल’ सिनेमासाठी अलंकार थिएटर सुबोध मुखर्जी यांनी बुक केले होते तो चित्रपट त्यांनी नंतर प्रदर्शित केला आणि दुर्दैवाने पहिल्याच आठवड्यात सुपर फ्लॉप झाला प्रेक्षकांनी अक्षरशः त्याच्याकडे पाठ फिरवली. गंमत पहा जो सिनेमा सुपर डुपर हिट होईल असं सुबोध मुखर्जींना वाटत होतं तो सिनेमा अवघ्या एका आठवड्यामध्ये थेटर मधून उतरवावा लागला आणि जो सिनेमा अवघा एखादा आठवडा कसातरी चालेल असं खुद्द त्याचा निर्माता दिग्दर्शकच म्हणत होता तो सिनेमा धो धो चालला सुपर हिट झाला. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. कुणाच्या भाग्यात काय मांडून ठेवलं असतं हे कोणालाच माहीत नसतं म्हणून तर त्याला प्राक्तन म्हणतात!
धनंजय कुलकर्णी