‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सलीम जावेद यांनी रातोरात पेंटर कडून काय रंगवून घेतले?
“जब तक बैठने को ना कहा जाये शराफत से खडे रहो… ये पुलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही!” खुर्चीला लाथाडत अशा बुलंद डायलॉगने अमिताभ बच्चन यांचा अँग्री यंग मॅन ‘जंजीर’ मधून रसिकांच्या पुढे आला आणि पुढची वीस वर्ष हिंदी सिनेमाचा बाप बनला! अमिताभ बच्चन यांच्या करिअरला हातभार लावण्याचा मोठा वाटा जसा दिग्दर्शकांचा आहे तसाच कथा पटकथा संवाद लेखक सलीम जावेद (Salim Javed) यांचा देखील आहे. ‘जंजीर’ हा चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला होता. ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने हिंदी सिनेमाची व्याख्याच बदलून टाकली. या सिनेमाच्या मेकिंगच्या अनेक गोष्टी रसिकांना ठाऊक आहेत. मुळात ही कथा आधी बऱ्याच जणांकडे फिरून नंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे आली होती. आधी ही स्टोरी धर्मेंद्रने विकत घेतली होती. धर्मेंद्र आपल्या स्वतःच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट बनवणार होता पण नंतर तो अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे त्याने ती कथा सलीम जावेद (Salim Javed) यांना परत केली. त्यांनी ही कथा प्रकाश मेहरा यांना ऐकवली. प्रकाश मेहरा यांना ती कथा प्रचंड आवडली. सलीम खान (Salim Javed) यांचे वडील पोलीस अधिकारी होते चंबळच्या खोऱ्यात टाकून सोबत त्यांचे कायम एन्काऊंटर चालू असायचे. त्या अनेक कथा सलीमला ठाऊक होत्या. याच पद्धतीने त्यांनी ही कथा रचली होती.
यातील नायक लहान असताना त्याच्या आई वडिलांची हत्या होते. दिवाळीच्या रात्री सर्वत्र फटाके उडत असताना त्याच्या आई-वडिलांना मारले जाते. त्यावेळी त्या गुंडाच्या हातातील ब्रेसलेट आणि त्या ब्रेसलेट वरील घोडा एवढेच त्याच्या डोक्यात फिट बसलेला असते. आणि हा ट्रॉमा त्याला आयुष्यभर सतावत असतो. सूडाची आग डोळ्यात घेऊन तो जगत असतो. ही जबरदस्त भूमिका प्रकाश मेहरा यांनी दिलीप कुमार यांना ऐकवली. परंतु त्यांना ती भूमिका खूपच एकांगी वाटली. अर्थात नंतर बऱ्याच वर्षांनी ज्यावेळी सलीम जावेद सोबत ते रमेश सिप्पी यांचा शक्ती चित्रपट करत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की,” काही चित्रपट नाकारल्याचा मला आज खेद वाटतो. त्यापैकी एक जंजीर हा चित्रपट आहे.”(आणखी दोन चित्रपट म्हणजे बैजू बावरा आणि प्यासा!)
त्यानंतर हे कथानक देव आनंद यांना ऐकवण्यात आले. परंतु देव आनंद यांनी प्रकाश मेहरा यांना ,” हा चित्रपट तुम्ही दिग्दर्शित करा परंतु बॅनर नवकेतन असेल!” असे सांगितले. ही अट मेहरा यांना मान्य होणे शक्यच नव्हते. नंतर शम्मी कपूर, राजकुमार यांच्याकडे ही कथा गेली पण या नाही तर त्या कारणाने नकार मिळत गेला. तोवर प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटातील नायका इतकेच महत्त्वाचे पात्र असलेल्या ‘शेरखान’ या भूमिकेसाठी अभिनेता प्राण यांना साइन केले. नंतर प्राण यांनी चित्रपट निर्मितीमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. प्राण यांचे चिरंजीव सुनील सिकंद त्यावेळी मद्रासला होते. मद्रासला त्यांचा रूम पार्टनर होते अमिताभ यांचे बंधू अमिताब बच्चन. सुनील आणि अमिताब यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपट पाहिला होता आणि सुनीलने प्राणला सांगितले की ,”तुमच्या ‘जंजीर’ चित्रपटासाठी ‘बॉम्बे टू गोवा’ चा हिरो अमिताभ बच्चन यांचा तुम्ही विचार करा.” मुलाच्या विनंती नंतर प्राण, प्रकाश मेहरा आणि सलीम जावेद मुंबईला ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपट पाहायला गेले. त्यातील सुरुवातीचे शत्रुघ्न सिन्हा सोबतचे फाईट सीन पाहून प्रकाश मेहरा यांनी मनोमन ठरवले आपल्या सिनेमाचा नायक हाच पाहिजे! अशा पद्धतीने अमिताभ बच्चन यांची या चित्रपटासाठी नायक म्हणून निवड झाली. अन्य भूमिकांमध्ये बिंदू, ओमप्रकाश, अजित यांची निवड झाली नाही. नायिका जया भादुरी फायनल झाली. सलीम जावेद यांची पटकथा बंदिस्त होती. एकदम परफेक्ट! अमिताभ आणि सलीम जावेद यांची दोस्ती इथेच झाली. हा चित्रपट निर्माण होत असतानाच रमेश सिप्पी ‘शोले’ या चित्रपटाची तयारी करत होते. सलीम जावेद या सिनेमाचे पटकथा संवाद लेखक होते. त्यांनीच सिप्पी यांना अमिताभचे नाव सुचवले.
=======
हे देखील वाचा : देव आनंद –सुरैयाची अधुरी एक प्रेम कहाणी
======
‘जंजीर’ चित्रपट तयार झाला. प्रकाश मेहरा देखील आपल्या टीमवर्क खुश होते. परंतु एक गडबड झाली चित्रपटाच्या पोस्टरवर कुठेही सलीम जावेदच्या नावाचा उल्लेख नव्हता. सलीम जावेद (Salim Javed) खूपच हर्ट झाले. कारण या सिनेमाच्या निर्मितीमध्ये त्यांचा फार मोठा असा सिंहाचा वाटा होता आणि पोस्टरवर त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. ते प्रचंड नाराज झाले. त्यांनी स्वत: हून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी एका पेंटरला बोलावले. त्याच्याकडून एक स्टेन्सिल तयार करून घेतली. एक गाडी, ड्रायव्हर आणि रंगाचे डबे घेऊन त्या पेंटरला पाठवून दिले. त्याने रात्रीतून जुहू पासून ऑपेरा हाऊस पर्यंत जिथे जिथे जंजीरचे पोस्टर लागले होते तिथे जाऊन पोस्टरवर स्टेन्सिल लावून ‘रिटन बाय सलीम जावेद’ असे रंगवून घेतले!
हा किस्सा सलीम यांनी एका टीव्हीच्या मुलाखतीत सांगितलं होता. रात्रीच पेंटरने काम केल्यामुळे ते कसेही झाले होते. कधी प्राण च्या चेहऱ्यावर लिहिले गेले तर कधी जया भादुरीच्या हातावर लिहिले गेले. प्रकाश मेहरा प्रचंड रागावले. त्यांनी सलीम जावेद यांना बोलावून झापले. परंतु सलीम जावेद (Salim Javed) देखील जोरात म्हणाले ,”या चित्रपटाचे निर्मितीत आमचा देखील मोलाचा वाटा आहे आणि तुम्ही क्रेडिट आम्हाला का दिले नाही?” थोड्याशा तनातनी नंतर राग मावळला. काही आठवड्यातच चित्रपट सुपरहिट ठरला. प्रकाश मेहरा यांनी सिनेमाची नवीन पोस्टर्स छापून घेतली आणि त्या पोस्टवर आता ठळकपणे लिहिले रिटन बाय सलीम जावेद. त्याकाळच्या लोकप्रिय सिने साप्ताहिक स्क्रीनमध्ये मागच्या पेजवर मोठी जाहिरात देऊन सर्वात मोठ्या अक्षरात ठळकपणे त्यांनी लिहिले ‘रिटन बाय सलीम जावेद!’
धनंजय कुलकर्णी