फिल्मी मुहूर्ताचा थाटमाट
जुन्या पिढीतील हिंदी फिल्मवाले फक्त आणि फक्त ‘पिक्चर एके पिक्चर ‘ यातच रमले नाहीत, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला, खुशीत राहिले. आपले क्षेत्र जमेल तितके आणि तसे एन्जाॅय केले ते त्यांचे टाॅनिक ठरले. त्यांचा असाच एक भारी फंडा पिक्चरच्या मुहूर्ताचा! त्यांच्यासाठी तो एक जबरा सण अथवा आजच्या ग्लोबल युगातील भाषेत इव्हेन्टस. खास मुहूर्ताच्या आमंत्रणापासून त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसे. आणि मुहूर्ताच्या वेळी अनेक पाहुण्याना व फिल्मवाल्यांना गले लगाके भेटणे ही तर त्यांची स्टाईल.
मला आठवतय, मी मिडियात आल्यावर साधारण एकाच सुमारास दोन नवीन चित्रपटांची आमंत्रणे माझ्या हाती आली. ‘गुरुदक्षिणा’ आणि ‘जिम्मेदार ‘ हे ते चित्रपट. १९८३ सालची ही गोष्ट. अर्थात आपण आता मिडियात आलोय तेव्हा असे चंदेरी/योग येणार ( त्यात आपलं असं काही कर्तृत्व नसते याचे भान होते.) याची जाणीव होती.
एक भले मोठे कार्ड हाती येताच ‘फिल्मी संस्कृती’ची ओळख झाली. सोहराब मोदी अभिनित व दिग्दर्शित ‘गुरुदक्षिणा’ या चित्रपटाचा भव्य दिमाखदार मुहूर्त. प्रमुख भूमिकेत पद्मिनी कोल्हापूरे. हे वाचत असतानाच कधी बरे वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत जातोय असे वाटू लागले. तोपर्यंत मुद्रित माध्यमातून मेहबूब स्टुडिओ माहित होता. विशेषत: राजेश खन्नाने आशीर्वाद फिल्म अशी चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करुन येथे कमाल अमरोही दिग्दर्शित ‘मजनून ‘ या भव्य प्रेम कथेसाठी राजेश खन्ना व राखीवरील प्रेमाच्या शेरोशायरीचे असे अतिशय खर्चिक आणि बहुचर्चित मुहूर्त रंगल्याची केवढी पानपानभर वर्णने काही विचारु नका. आपण पाहुण्यांचे किती व कसे भारी स्वागत करु असे डिंपलला झाले होते याचे केवढे कौतुक. एका मुहूर्तावर एवढे रंगवून खुलवून लिहिले जातेय तर पिक्चरवर बहुतेक रंगीत पुरवणीच प्रसिद्ध होईल असा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असतानाच ‘मजनूनचा मुहूर्त राजेश खन्नाचा पब्लिसिटी स्टंट होता. हा चित्रपट बनणार नाही’ अशा बातम्या येऊ लागल्या तरी त्यात मेहबूब स्टुडिओचे नाव होतेच. चित्रपटसृष्टीची ओळख होत जाण्याचा एक मार्ग मिडियात काय काय येते त्यातून जातो. त्यातूनच मनात काही प्रतिमा निर्माण होतात.
‘गुरुदक्षिणा’च्या मुहूर्ताला (Movie time) जाईपर्यंत डोळ्यासमोर सोहराब मोदी यांचे दूरदर्शनवर पाहिलेले झांशी की रानी, मिर्झा गालिब, जेलर हे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट येत होते आणि त्यातील त्यांची जोरदार संवाद फेक आठवत होती. पद्मिनी कोल्हापूरेचेही सत्यम शिवम सुंदरम, थोडी सी बेवफाई, आहिस्ता आहिस्ता, गहराई, इन्साफ का तराजू असे सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पाहिलेले चित्रपट आठवत होते. आपण अगोदर चित्रपटाचा प्रेक्षक आहोत हे मी कधीच विसरत नाही. एकूणच विचारात असतानाच मेहबूब स्टुडिओत कधी पोहचलो ते समजलेच नाही. सेटवर या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताचा (Movie time) फिल येत होता, एका बाजूला पूजा सुरु होती. मला माझेच नवखेपण जाणवत होते. हातातील भले मोठे आमंत्रण जपत होतो. त्यावर दिलेल्या वेळेपेक्षा तासभर उशीर झाला तर मग हा शुभ मुहूर्त का ठरवला असा भाबडा प्रश्न मनात आला आणि त्यानंतर अनेक स्टुडिओत नवीन चित्रपटांच्या मुहूर्ताना (Movie time) हजर राहताना ‘आमंत्रणावरील वेळेनुसार कधीच चित्रपटांचे मुहूर्त होत नाहीत ‘ याची सवय झाली.
‘गुरुदक्षिणा’च्या मुहूर्त (Movie time) दृश्यात पद्मिनी कोल्हापूरेने सहभाग घेतला, उर्दूमिश्रित एक संवाद ती म्हणाल्याचे आठवले. पण तो पर्यंत इतर कलाकारांची निवड करण्यात आली नव्हती. दुर्दैवाने २८ जानेवारी १९८४ रोजी सोहराब मोदी यांचे निधन झाले आणि हा चित्रपट मुहूर्तापुरताच (Movie time) राहिला. कंवल शर्मा दिग्दर्शित ‘जिम्मेदार’ या चित्रपटाचा मुहूर्त अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी लक्षात राहीला. वांद्र्याच्या बॅण्ड स्टॅन्ड येथील तेव्हाच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो असताना आमंत्रण पत्रिकेवर दिलेल्या वेळेनुसार पोहचलो तेव्हा त्या तारांकित हाॅलमध्ये ‘जिम्मेदार ‘चे डिझाईन लावण्याचे काम सुरु होते. आपण खूपच लवकर आलोय याचा चक्क मलाच साक्षात्कार झाल्याने मी गोंधळून गेलो. पण हा मुहूर्त आजही आठवतोय.
=====
हे देखील वाचा : स्टुडिओ कॅमेराच्या आगेमागे….
=====
कंवल शर्मा अनेक वर्षे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक मनमोहन देसाई यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक होता आणि अधूनमधून छोट्या छोट्या भूमिकाही साकारत असे (‘कुली’मधील अतिशय गाजलेल्या त्या पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ बच्चनच्या पोटाला टेबलाचा कोपरा लागला आणि तो आजारी पडला या दृश्यात कंवल शर्माही एक ‘कुली’ आहे.) ‘जिम्मेदार ‘चा मुहूर्त मनमोहन देसाई यांनी करताना धमाल उडवली. ते अनुपम खेरकडे पाहत म्हणाले, आमच्या दोघांच्या चेहरासाम्यामुळे आम्हाला घेऊन लहानपणी हरवलेले भाऊ अशा स्टोरीवर धमाल पिक्चर बनवता येईल, बहुतेक ते मीच बनवेन असे त्यांनी म्हणताच एकच हंशा पिकला. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आम्हा मिडियाला ‘ही चौकटीतील बातमी ‘ मिळाली. (अशा बातम्यांत आज वाढ झालीय इतकेच) मनजींमुळे मुहूर्ताच्या (Movie time)पार्टीतील मूड एकदमच बदलला. म्हणजेच, आपल्या शुभ हस्ते मुहूर्त करतानाही मनजींमधील ‘दिग्दर्शक दिसला.’
‘जिम्मेदार ‘मध्ये राजीव कपूर, टीना मुनिम व अनिता राज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ॲक्शनपॅक्ड मसाला मिक्स मनोरंजक धमाकेदार चित्रपट पडद्यावर येईल असे आपल्याला वाटायला हवे ना? पिक्चर निर्मितीवस्थेत इतके आणि असे रखडले की त्याच्या आगमनाची उत्सुकताच संपली आणि मग कधी तरी तो प्रदर्शित होऊन गेला. एकाद्या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या (Movie time) वेळचीच परिस्थिती तो पडद्यावर येतो तेव्हा असेलच असे नव्हे आणि याला अनेक लहान मोठे घटक ‘जिम्मेदार’ असतात. चित्रपटसृष्टीतील फिल्डवर्कवर असे अनेक रंगढंगाचे अनुभव घेत घेत या क्षेत्रात भटकंती,निरीक्षण आणि लहान मोठ्या भेटीगाठी घेत हा फिल्मी प्रवास एन्जाॅय करायचा असतो.
( क्रमश:)