अवघ्या पंधरा मिनिटात चाल लावून अशोक पत्की यांनी बनवलं हे अजरामर गीत!
मराठी चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत, जाहिराती आणि मालिकांची शीर्षक गीते याच्या सोबतच जिंगल्समुळे रसिकांच्या हृदयात अजरामर स्थान मिळवणारे संगीतकार म्हणजे अशोक पत्की (Ashok Patki)! पत्की काकांनी तब्बल सात हजाराहून अधिक जिंगल्स बनवले. ते खऱ्या अर्थाने जिंगल्सचे बादशहा आहेत. त्यांचा कामाचा झपाटा इतका प्रचंड असायचा की, अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचे जिंगल तयार व्हायचे. पत्की काका सांगतात, ”ज्यावेळेला एखादी जिंगल माझ्याकडे येते तेंव्हा ती वाचली की, लगेच माझ्या डोक्यात त्याची चाल गुनगुणू लागते! “इतकी अफाट प्रतिभा आणि कर्तृत्व अशोक पत्की (Ashok Patki) यांची आहे. अर्थात चाल घाईची जरी असली तरी दर्जामध्ये कुठेही तडजोड नसायची. त्यामुळेच आज पन्नासहून अधिक वर्षे उलटून गेली तरी ‘झंडू बाम झंडू बाम वेदना हारी बाम किंवा ‘धारा धारा शुद्ध धारा..’ ही त्यांची जिंगल्स त्यातील वाद्यांच्या पिसेस सोबत आपल्या लक्षात आहेत. अशोक पत्की यांचे सर्वात मोठे हिमालय वर्क म्हणजे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ याचबरोबर अशोक पत्की (Ashok Patki) यांनी दूरदर्शनच्या काळामध्ये एक साक्षरता मोहीम वरचं जिंगल बनवलं होतं जे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी अशोक पत्की यांनी त्यांच्या ‘सप्तसूर माझे’ या आत्मचरित्रात सांगितली आहे. कर्तृत्ववान प्रतिभा संपन्न व्यक्ती कमी वेळात किती क्वालिटी वर्क करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं.
साधारणत: ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला एकदा वेस्टर्न स्टुडिओमध्ये दिवसभराच्या रेकॉर्डिंग नंतर ते घरी जायला निघाले होते. सोबत कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर हे देखील होते. रात्रीचे पावणेदहा वाजले होते. आता निघायचेच असं ठरत होतं. सकाळी दहा पासून अव्याहतपणे हे लोक काम करत होते त्यामुळे खरं तर सगळेजण थकले होते. परंतु त्याच वेळेला ऍड गुरु पियुष पांडे धावत धावत तिथे आले आणि म्हणाले,” अशोकजी (Ashok Patki) एक गाना बनाना है…” त्यावर पत्की घड्याळ त्यांच्यासमोर दाखवत म्हणाले,” आता रात्रीचे दहा वाजत आलेत आता इथून पुढे कसं गाणं करणार?” तेव्हा पियुष म्हणाले,” नाही नाही, ते काही नाही. मला उद्याच प्रेझेंटेशन साठी ते गाणं हवं आहे आणि तुम्ही असल्यानंतर असा काय वेळ लागणार?” असं म्हणून त्यांनी पत्कींना हरभऱ्याच्या झाडावर चढवू लागले. त्यावर पत्की म्हणाले,” अहो इथून पुढे गाण्याची तयारी करायची, चाल लावायची रेकॉर्डिंग करायचे कसं शक्य आहे? आणि मुख्य म्हणजे गाणार कोण?” त्यावर पियुष म्हणाले ,”कुणी पण चालेल. इथे सुरेश वाडकर आहे. कविता कृष्णमूर्ती आहे. या दोघांपैकी कोणीही चालेल किंवा दोघांनी गायले तरी चालेल पण मला कुठल्याही परिस्थितीत हे गाणं उद्या सकाळी प्रेझेंटेशन साठी हवं आहे” त्यावर “ठीक आहे” असं अशोक पत्की (Ashok Patki) म्हणाले. पियुष पांडे यांनी गाण्याचा कागद त्यांच्यापुढे सरकावला. ते गाणं पियुष पांडे यांनीच लिहिले होते. गाण्याकडे बघून पत्की म्हणाले ,” पियुष जी, या गाण्याला तीन-तीन कडवी आहेत. इतक्या कमी वेळामध्ये कसे शक्य आहे?” त्यावर पियुषजींनी पुन्हा सांगितलं,” अशोक जी तुम्ही असल्यानंतर काहीच अशक्य नाही!”
आता आपली काही सुटका नाही असं लक्षात आल्यानंतर अशोक पत्की यांनी ते आव्हान स्वीकारले. ते बाहेर जाऊन कॉफी घेऊन आले तोंडात मस्तपैकी मसाला पान टाकले आणि गाण्याचा कागद वाचू लागले. गाण्याचे बोल होते ‘पूरब से सूर्य उगा फैला उजियारा जागी हर दिशा दिशा जागा जग सारा….’ पत्कींना या गाण्याचा प्रहर लक्षात आला. त्यामुळे पहाटेचा राग या गाण्यासाठी वापरावा असे त्यांनी ठरवले. आणि त्यांच्या मनात अनेक चाली गुणगुणू लागल्या. अशोक पत्की(Ashok Patki) सांगतात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासोबत त्यांनी संगीत मत्स्यगंधा पासून पुढच्या सर्व नाटकांसाठी सहाय्यक म्हणून काम केलं होतं. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘तेजो निधी लोह गोल भास्कर हे गगन राज’ या पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या नाट्यगीताची चाल आठवली. अशाच प्रकारची ट्रीटमेंट या गाण्याला द्यावी असं त्यांनी ठरवलं. ताबडतोब त्यांनी कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांना रेकोर्डिंग ला बोलावून घेतलं आणि त्यांना चाल सांगितली. मूळ गीताची चाल राग ललत पंचम मध्ये होती इथे मात्र त्यानी राग भटियार वापरला. चाल पंधरा-वीस मिनिटात झाली लगेच ते रेकॉर्डिंग रूम मध्ये दाखल झाले आणि तीन कडव्यांचे गाणे पुढच्या तासाभरात ध्वनिमुद्रित झालं!!! हा करिष्मा होता अशोक पत्की यांचा. दुसऱ्या दिवशी पियुष पांडे हे गाणे घेऊन निघून गेले. नंतर या गाण्याचे काय झालं कुणालाच माहिती नाही. कारण हे गाणे काही चित्रपटासाठी नव्हतं किंवा नाटकासाठी नव्हतं त्यामुळे या गाण्याला काय प्रतिसाद मिळाला हे कुणालाच कळालं नाही. सर्वजण विसरून गेले होते.
======
हे देखील वाचा : या कव्वालीमधील चूक मनमोहन देसाईंनी दुरुस्ती केली…
======
त्यानंतर तब्बल आठ वर्षानंतर १९८८ साली पियुष पांडे पुन्हा एकदा अशोक पत्की (Ashok Patki) यांच्याकडे आले आणि म्हणाले ,” आपण आठ वर्षांपूर्वी एक गाणं केलं होतं. आठवतं कां? त्यातील फक्त मुखडा घेऊन आपण एक जिंगल बनवणार आहोत. ही जिंगल राष्ट्रीय साक्षरता मिशन साठी वापरली जाण्याची शक्यता आहे!” मोठे राष्ट्रीय काम आपल्या हाती येत आहे असे समजून अशोक पत्की (Ashok Patki) यांनी पुन्हा एकदा कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांना बोलावले आणि या गाण्याचा मुखडा पुन्हा घासून पुसून एकदा रेकॉर्ड केला. पुढे हे गाणं राष्ट्रीय साक्षरता मिशन साठी निवडले गेले आणि देशभर प्रचंड गाजले. या गाण्याचा एक व्हिडिओ देखील बनवण्यात आला. आज देखील हि जिंगल आपल्या सर्वांच्या ओठावर आहे. भटियारा या रागात बांधलेली चाल अशोक पत्की यांनी अजरामर केली. केवळ तासाभरात तयार झालेले गाणं त्यावेळी काही गाजलं नाही परंतु आठ वर्षानंतर मात्र एका वेगळ्या सामाजिक कारणाने प्रचंड गाजले. अशोक पत्की (Ashok Patki) सर आजही कार्यरत आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या वयाची ८१ वर्ष पूर्ण केली आहे. या वयातही त्यांचा उत्साह आणि करिष्मा भल्याभल्यांना आश्चर्यचकीत करणार आहे.