ताज डिव्हायडेड बाय ब्लडः वेबसिरीजचा फोलपणा
ZEE5 ची नवीन वेबसिरीज (Webseries) ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ ची घोषणा झाल्यापासून खूप चर्चेत राहिली. एकतर त्यातील स्टारकास्ट. या सिरिजमध्ये नसरुद्दीन शाह पासून धर्मेंद्र पर्यंत सर्व स्टार आहेत. त्यात अकबरची भूमिका साकारत असलेल्या नसरुद्दीन शाह यांच्याबरोबर त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेली संध्या मृदुल ही जोधाबाईच्या भूमिकेत आहे. या जोडीवरुन बरीच चर्चा झाली. शिवाय ताज डिव्हायडेड बाय ब्लड मध्ये अपरिचित असलेला मुघल इतिहास दाखवण्यात आला आहे. एकूण हा ताज मात्र काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. या वेबसिरीजला (Webseries) सर्वात कमी रेटींग मिळालं आहे.
सायमन फॅन्टुझो आणि विल्यम बोर्थविक यांनी लिहिलेल्या या वेबसिरिजचे (Webseries) दिग्दर्शन रॉन स्कॅल्पेलो यांनी केले आहे. अभिमन्यू सिंग आणि रुपाली काद्यान हे या वेबसिरीजचे निर्माते आहेत. 3 मार्च रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजसाठी (Webseries) 2/5 एवढे कमी रेटींग मिळाले आहे. ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ या सिरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी, आशिम गुलाटी, ताहा शाह, शुभम मेहरा, संध्या मृदुल, जरीना वहाब, दीपराज राणा आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काहीतरी वेगळं करायला जायचं आणि नेमकं फसायचं असंच या सिरीजच्या बाबतीत झालं आहे. वेगळा इतिहास दाखवला जाणार अशी याची जाहीरात होती. मात्र पात्रांच्या निवडीपासून ते स्क्रीप्टपर्यंत ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ ची गाडी रखडतच चालली आहे. मुळात सत्तरी पार केलेल्या नसरुद्दीन शाह अकबराच्या भूमिकेत चाचपडतांनाच दिसत आहेत आणि अन्य पात्रही तशीच वावरताना आढळतात.
ZEE5 ची नवीन वेबसिरीज (Webseries) ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ ही तरुण अकबरपासून सुरू होते. अनेक लढाया जिंकलेला अकबर वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखी असतो. कारण त्यानं लढाया करुन जिंकलेल्या साम्राज्याला कोणी वारसच नसतो. तीन लग्न केल्यानंतरही अकबरला मूलबाळ होत नाही. तेव्हा हा सम्राट शेख सलीम चिश्ती यांना भेटायला जातो. शेख सलीम चिश्ती यांची भूमिका धर्मेंद्र यांनी केली आहे. सम्राटाला शेख सलीम चिश्ती प्रार्थना करण्यास सांगतात. 10 भागांच्या या मालिकेत, धर्मेंद्र पहिल्या एपिसोडमधील या पात्रासाठीच आहे. अकबरला तीन मुलं होतात. पण आता या तीन मुलांपैकी कोणाला सम्राट म्हणून साम्राज्याची जबाबदारी द्यायची आणि त्यातील मुळ राजकारणापासून कसे रोखायचे या चकव्यूहात वयोवृद्ध अकबर सापडला आहे. अकबरने निर्णय घेतो की, मुघल साम्राज्याचा वारस त्याच्या गुणवत्तेवर निवडला जाईल. प्रथम जन्म घेतल्याने एखाद्या व्यक्तीला सिंहासनाचा अधिकार मिळणार नाही. अकबराच्या या निर्णयानंतर त्याच्या तिन्ही मुलांमध्ये वाद सुरू होतो. मोठा मुलगा सलीम हा नेहमी दारूच्या नशेत असतो. दुसरा मुलगा, मुराद, शूर आहे, पण त्याला दयामाया नाही. तिसरा मुलगा दानियाल हा सुद्धा सम्राटपदाच्या शर्यतीत आहे. काहीतरी वेगळे करायचे या प्रयत्नात या सिरिजमध्ये सलीम अनारकली हे प्रेमप्रकरणही वेगळे दाखवण्यात आले आहे.
‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ या वेबसीरिजनुसार (Webseries) अकबरने अनारकलीला 14 वर्षांपासून आपल्या हरममध्ये कैद करून ठेवले आहे. अकबराला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तो हरममध्ये अनारकलीला भेटायला जातो. त्यानंतर सलीम आणि अनारकली भेटतात आणि दोघेही प्रेमात पडतात. अकबराला ही गोष्ट कळल्यावर तो प्रचंड संतापतो. सलीमला साम्राज्यातून काढून टाकले जाते. शिवाय अनारकलीला भेटण्यास मदत केल्याबद्दल दुर्जन सिंगला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. यात अकबर कोणाला आपल्या सम्राज्याची सूत्रे द्यावीत हा प्रश्नही अकबरसमोर आहेच. सगळ्या उलथापालथीनंतर, अकबरला वाटतं की दानियालच त्याचा वारसदार होऊ शकतो. दानियालला सम्राटपदाची सूत्रे द्यायला घोषित करणार एवढ्यात अकबरला सलीम जिवंत असल्याची माहिती मिळते. अर्थात या वेबसिरीजचा दुसरा भाग येणार हे स्पष्ट होतं.
=====
हे देखील वाचा : ऑस्कर पुरस्काराआधीच RRR चा डंका…
=====
नसीरुद्दीन शाह, आशिम गुलाटी सारख्या कलाकारांची उपस्थिती असूनही ही वेबसिरीज (Webseries) प्रभावी ठरत नाही. अनारकलीची भूमिकेत अदिती राव हैदरी आहे. पण तिचाही प्रभाव पडलेला नाही. मुख्य म्हणजे संध्या मृदूल आणि नसरिद्दीन शाह यांची जोडी. ‘ताजः डिव्हाइड बाय ब्लड’ मध्ये सम्राट अकबराच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राणी जोधाची भूमिका संध्या साकारत आहे. संध्याने तिच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठे असलेल्या नसीरुद्दीन शाहसोबत काही बोल्ड सीनही दिले आहेत. पण याचाही सिरीजच्या रेटींगसाठी काहीही फायदा झालेला नाही.