Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बोल्ड अँन्ड ब्युटीफूल डिंपल तेवढीच खंबीर स्त्री म्हणून जगली…

 बोल्ड अँन्ड ब्युटीफूल डिंपल तेवढीच खंबीर स्त्री म्हणून जगली…
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

बोल्ड अँन्ड ब्युटीफूल डिंपल तेवढीच खंबीर स्त्री म्हणून जगली…

by सई बने 08/06/2020

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी दि ग्रेट राजकपूरनं तिला हिरॉईन म्हणून निवडलं. वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्या हातात या शोमनचा चित्रपट होता. पुढच्याच वर्षी हा चित्रपट सुपर-डूपर झाला. देशात काय पण विदेशातही या चित्रपटाचा बोलबाला झाला. तेव्हा ही मुलगी कुठे होती, ती एका सुपरस्टारबरोबर विवाहबंधनात अडकली होती. वयाच्या सतराव्या वर्षी ही मुलगी एका मुलीची आई झाली. दहा वर्षांनी दोन मुलींना सोबत घेऊन तिनं नव-याचं घर सोडलं. आणि पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकली. सागर जैसी ऑंखोंवाली म्हणत तरुणांच्या ह्दयाची धडकन झाली. ‘रुदाली’ म्हणून स्त्री च्या जीवनाचा एक पडदा उघडला तर ‘काश’ मधून त्याच स्त्रीच्या ह्दयातला दाह पडद्यावर साकारला. कधी पेपरवालीबाई म्हणून ती अन्याय करणा-यांवर कडाडली. दिल चाहता है मध्ये ती वेदना सहन करणारी प्रेमिका झाली. आता तर ती हॉलिवूडच्या पडद्यावर झळकतेय. तेही वयाची साठी ओलांडल्यावर. तिची जादू तशीच आहे. पहिल्या चित्रपटासारखी… बॉबीसारखी. ती आहे डिंपल. डिंपल कपाडिया-खन्ना…
डिपंल कपाडिया म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील मोहक व्यक्तीमत्व. जेवढं मोहक तेवढंच बंडखोर. तिच्या पहिल्याच चित्रपटात स्विमिग कॉसच्युम. तोही टू पीस. घालून तिनं आपला बिंधास्त अंदाज दाखवून दिला होता. फक्त अंगप्रदर्शनातच आपण पुढे आहोत, असंही नाही तर तिने पहिल्याच चित्रपटात अभिनयही तेवढ्याच सजगपणे केला. राजकपूरसारख्या शोमनच्या हाताखाली मिळालेले अभिनयाचे धडे तिने कायम लक्षात ठेवले.
मुंबईच्या चुन्नीलाल कपाडिया यांची डिंपल ही मोठी मुलगी. डिंपल शिवाय चुन्नीलाल यांना आणखी दोन मुली आणि एक मुलगा होता. त्यापैकी सिंपल ही दुसरी मुलगीही नंतर काही चित्रपटात झळकली. असो चुन्नीलाल यांचे व्यापार क्षेत्र मोठे होते. मुंबईमधील ते धनिक म्हणून ओळखळे जात. ते स्वतः मोठ्या वर्तुळात वावरायचे. त्यामुळे त्यांच्या समुद्र महल या बंगल्यावर नेहमी पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांना अनेक चित्रपट तारेही यायचे. चुन्नीलाल यांनी आपले पैसे चित्रपट निर्मितीमध्येही गुंतवले होते. त्यामुळेही त्यांची बॉलिवूड निर्मात्यांबरोबर उठबस असे. डिंपलला या पार्ट्यांच्या वातावरणाची आवड होती. त्यात तिला कळले होते, की राजकपूर त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका नव्या चेह-याच्या शोधार्थ आहेत. हा चेहरा आपलाच असणार असं डिंपल आपल्या मैत्रिणींना नेहमी विश्वासानं सांगे. पुढे झालंही तसंच. एका पार्टीत शोमन राजकपूर यांनी डिंपल यांना पाहिलं. आणि त्यांना बॉबी सापडली. थोडी फटकळ, थोडी बिंधास्त. आणि प्रेमाची पहिली चाहूल लागल्यावर हळवी होईल अशी. राजकूपर यांनी थेट तिच्या वडीलांना, चुन्नीलाल यांना चित्रपटाबद्दल सांगितले. मेरा नाम जोकर मध्ये राजकपूर यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे आगामी चित्रपटात फ्रेश चेह-यांना त्यांना संधी द्यायची होती. त्यांचा मुलगा ऋषी कपूर त्यात हिरो होता. हिरॉईन म्हणून डिंपल फिट होती. शोमनच्या मागणीला चुन्नीलाल विरोध करु शकले नाहीत. डिंपलला अवघ्या चौदाव्या वर्षातच घरबसल्या चित्रपट मिळाला. तोही राजकपूरचा आणि प्रमुख भूमिका असलेला.

डिंपलला या चित्रपटाआधी नर्गिस यांचे चित्रपट दाखवण्यात आले, का तर अभिनय त्यांच्यासारखाच हवा होता. डिंपल अवघ्या चौदा वर्षाची. सेटवर अनेकवेळा गडबड व्हायची. डायलॉग विसरायची. त्यात प्रेमप्रसंग शूट करतांना तर खूप चुका. एवढ्या लोकांसमोर प्रेमप्रसंग करायचा तरी कसा. अजाणत्या वयातील डिंपल संकोचून जायची. यावेळी राजकपूर यांची खरी कसोटी लागायची. ते तिला हळूवारपणे समजून सांगायचे. मग सीन ओके व्हायचा. ऋषी कपूरही याच कसोटीमधून जात होते. हे दोघं समवयीन या शूट दरम्यान जवळ आले. त्यांच्या मैत्रीपेक्षा पुढचे. म्हणजे प्रेमाचे नाते तयार झाल्याची चर्चा तेव्हा वृत्तपत्रात येऊ लागली होती. राजकपूरचा बॉबी बोल्ड असणार अशी चर्चा आधीपासूनच होती. त्यामुळे बॉबीमधील छोटीशी गोष्टही मोठ्या बातमीच्या स्वरुपात समोर यायची. पण या सर्व चर्चा रंगत असतांनाच डिंपलनं मात्र वेगळाच ट्रॅक पकडला. ती चक्क लग्नाच्या बेडीत अडकली. राजकपूर यांच्या चित्रपटातील अपकमींग तारका आपल्या भविष्याचा विचार न करता चक्क लग्न करते. तेही चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण व्हायच्या आधी. एका बॉम्ब सारखी ही बातमी फुटली. कितीतरी गजहब झाला. नेमका तिनं विवाह तरी कोणाबरोबर केला होता…
डिंपलनं विवाह केला होता तो तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबर. राजेश खन्ना आणि डिंपल या दोघांमध्ये तब्बल पंधरा वर्षांचं अंतर होतं. राजेश खन्ना यांच्यावर अनेक तरुणी फिदा होत असत. त्यांच्या बंगल्याबाहेर त्यांची एक झलक बघण्यासाठी अनेक तरुणी तासनतास उभ्या असत. डिंपलही या मोह जालात होती. अनेकवेळा ती राजेश खन्ना यांचे चित्रपट बघण्यासाठी शाळेला बंक मारुन जायची. पण त्यांच्या बंगल्यासमोर उभं राहण्याची वेळ तिच्यावर आली नाही. कारण राजेश खन्नाच तिच्या घरी नेहमी यायचे. तेव्हा त्यांच्यासमोर जाण्याची एकही संधी डिंपल सोडत नसे. अर्थात तेव्हा ती त्यांना काका म्हणायची आणि राजेश खन्ना तिला डिंपी. पुढे बॉबीच्या चित्रीकरणा दरम्यान या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. सुमुद्र किना-यावर या दोघांना फिरतांना काहींनी बघितलं. पण दोघांच्या वयातील अंतरामुळे कोणालाही सुगावा लागला नाही. पण या दोघांनीही लग्नाचा धमाका उडवून दिला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न लागले. चुन्नीलाल यांचा या लग्नाला विरोध होता. कारण डिंपल यांचा बॉबी अद्यापही पडद्यावर आला नव्हता. त्याचे काही सीनही शुट व्हायचे होते. त्यातील डिंपल यांच्या बिंधास्त अदेची आणि अभिनयची चर्चा वृत्तपत्रात चांगलीच होती. त्यामुळे बॉबी नंतर त्यांच्याकडे चित्रपटाची रांग लागली होती. आपली मुलगी टॉपची अभिनेत्री बनणार हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. अशात एका सुपसस्टारबरोबर विवाहबंधनात मुलींनं अडकणं त्यांना मान्य नव्हतं. पण लवकरच मुलीच्या हट्टापुढे ते तयार झाले आणि पहिला चित्रपट येण्याआधीच डिंपलचं लग्न झालं. लग्नाच्या वेळी हाताला मेहंदी लावण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटाचे शुट करतांना ब-याचवेळा डिंपल यांना आपले हात लपवावे लागले आहेत. चित्रपट पूर्ण झाल्यावर हे काका आणि डिंपी जोडपं हनिमुनसाठी युरोपला रवाना झालं. तिथं म्हणे राजेश खन्ना यांनी आपल्या लाडक्या बायकोच्या वाढदिवसाची मोठी पार्टी दिली. त्यात अमिताभ आणि जया बच्चनही सहभागी झाले होते.
लग्नानंतर डिंपल यांचा बॉबी पडद्यावर आला. टू पीस स्विंमींगसूट घातलेल्या डिंपलचा बोल्ड लूक प्रचंड लोकप्रिय झाला. तरुण मंडळी तर डिंपल यांच्यावर घायाळ झाली. कित्येक तरुण तिच्या प्रेमात पडले. हा चित्रपट भारतात तर सुपरहिट झाला. पण परदेशातही तो चांगलाच लोकप्रिय झाला. डिंपल यांना पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअरची बाहुली मिळाली. 1973 मध्ये आलेल्या बॉबीनं अभिनेत्रींच्या बाजुला असलेल्या सोज्वळ कुंपणाला बाजूला सारलं. बोल्डलूक म्हणजे काय हे प्रेक्षकांना दाखवून दिलं. बॉबी नंतर डिंपल स्टार झाली. तिच्याकडे अनेक चित्रपट निर्मीत्यांच्या रांगा लागल्या. पण ती विवाह बंधनात होती. यातील बंधन हा शब्द तिच्यावर लादला होता की तिनं स्विकारला होता हे तिलाच माहित. पण या सर्वांना राजेश खन्ना यांनी परत पाठवलं. कारण डिंपल तेव्हा आई होणार होती. पुढच्याच वर्षी तारुण्यात पदार्पण करणारी डिंपल आई झाली. 1974 मध्ये तिच्या पहिल्या मुलीचा. ट्विंकलचा जन्म झाला. तर 1977 मध्ये दुस-या मुलीचा रिंकींचा जन्म झाला.

डिंपल आता बॉबी राहीली नव्हती ती आई झाली होती. आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांची पत्नी झाली होती. पूर्णपणे गृहिणी. पण या सुखी संसाराची पडझड सुरु झाल्याची चर्चा सुरु होती. राजेश खन्ना यांच्या चित्रपटाला उतरती कळा लागली होती. एकामागोमाग एक चित्रपट कोसळत होते. नव्या हिरोंनी त्यांच्यावर मात केली होती. हाती काही काम नव्हतं. अशावेळी राजेश खन्ना दारुच्या हवाली गेले. त्यामुळे डिंपल आणि त्यांच्यात मतभेद सुरु झाले. त्यात डिंपललाही चित्रपटाच्या ऑफर येत होत्या. पण राजेश खन्ना यांचा त्याला विरोध होता. शेवटी लग्नानंतर दहा वर्षांनी डिंपल यांनी आपल्या नव-यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपल्या ट्विंकल आणि रिंकी या मुलींना घेऊन त्या वडिलांकडे आल्या. अर्थात त्या राजेश खन्ना यांच्यापासून वेगळ्या झाल्या. त्यांनी घटस्फोट घेतला नाही.
दहा वर्षात बॉलीवूडमध्ये खूप बदल झाले होते. अनेक चेहरे प्रस्थापित झाले होते. त्यात श्रीदेवी, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री आणि जयाप्रदा या सर्वामध्ये आपली ओळख करायचं आव्हान डिंपल यांच्यासमोर होतं. जख्मी शेर हा चित्रपट त्यांना मिळाला. हिरो होता जितेंद्र. जितेंद्र हे राजेश खन्ना यांचे खास मित्र. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच पडला. निराश झालेल्या डिंपल यांना पुन्हा चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांनी मदतीचा हात दिला. रमेश सिप्पी यांच्या सागरमध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाली. ऋषी कपूरसोबत त्यांची जोडी पुन्हा जमली. आणि हिटही झाली. सागर जैसी ऑंखोंवाली या गाण्यामधून त्यांच्या दिसलेल्या लूकमुळे पुन्हा डिंपल नावाच्या मोहक अभिनेत्रीची जादू पसरली. बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख झाली. 1985 मध्ये आलेल्या सागरमधील भूमिकेसाठीही डिंपलच्या हाती फिल्मफेअरची काळी बाहुली विराजमान झाली… ऑस्कर पुरस्कारासाठीही भारतातर्फे सागर हा चित्रपट पाठवण्यात आला.
मग जिकडे तिकडे डिंपल दिसू लागली. अगदी तिच्या केसांसारखा कटही डिंपल कट म्हणून लोकप्रिय झाला. एका मॅगझिनने केलेल्या सर्वेमध्ये मधुबालानंतर सर्वाधिक सुंदर अभिनेत्री म्हणून डिंपलला मान देण्यात आला. डिंपलबरोबर अनेक हिरो चित्रपट करण्यासाठी उत्सुक होते. त्यात काकांचा. राजेश खन्ना यांचाही नंबर लागला. जय शिव शंकर या चित्रपटाचं शूट सुरुही झालं. पण डिंपल आणि राजेश खन्नामधील बिनसलेल्या नात्याची झळ चित्रपटालाही लागली. आणि हा चित्रपट अर्ध्यावरच थांबवण्यात आला. राजेश खन्ना यांचं फिल्मी करिअर थांबत आलं आणि डिंपल यांचं करिअर मात्र सुरु झालं. त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. पण त्यांनी स्मरणात राहतील अशा भूमिका निवडल्या. त्यांनी जवळपास सत्तरहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. त्यात राम लखन, नरसिंहा, प्रहार, दिल आशना है, रुदाली, क्रांतिवीर, दिल चाहता है, लेकीन, अजूबा, गर्दिश, अल्लारख्खा, इंसानियत, बीस साल बाद, साजीश, इंसाफ, फाइंडींग फैनी, पटीयाला हाऊस, लक बाय चान्स यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातल्या अनेक भूमिका डिंपल यांनी अजरामर केल्या आहेत. नरसिंहा मधील अनिता रस्तोगी, प्रहार मधील किरण, क्रांतिवीर मधील कलमवाली बाई, रुदालीमधील शनिचरी, दिल चाहता है मधील तारा जैस्वाल. या भूमिकांमध्ये डिंपल यांच्या सशक्त अभिनयाची छाप आहे. यातील क्रांतीवीर आणि रुदालीसाठी त्यांना पुन्हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. रुदालीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 1991 मध्ये आलेल्या लेकीन चित्रपटातून डिंपलनं पुन्हा एकदा सक्षम अभिनय म्हणजे काय हे दाखवून दिले. त्यातील लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘यारा सिली सिली बिरहा की रातों मे’ हे गाणं खूप लोकप्रिय झालंच. सोबत डिंपल यांच्या करिअरलाही भक्कम उभारी देऊन गेलं.
एकीकडे पतीपासून वेगळ्या रहात असलेल्या या अभिनेत्रीनं आपल्या मुलींसाठीही तेवढाच वेळ दिला. ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांना आईचे प्रेम दिले. पण वडिलांच्या प्रेमापासून दूर केलं नाही. किंबहुना डिंपलचं वेगळेपण यातच दिसून येतं. आपल्या पतीपासून त्या वेगळ्या राहिल्या पण दूर गेल्या नाहीत. राजेश खन्ना यांना त्यांनी कायम साथ दिली. अगदी राजकीय मैदानात उतरलेल्या राजेश खन्नांचा प्रचारही त्यांनी जोरदार केला. ट्विंकलनं अक्षय कुमारबरोबर लग्न केलं. रिंकीचाही विवाह झाला. या सोहळ्यात डिंपल आणि राजेश खन्ना एकत्र होते. आजी झालेल्या डिंपलनं आपल्या नव-याची म्हणजे राजेश खन्नांची त्यांच्या आजारपणात तेवढीच काळजी घेतली. संपत्तीवरुन वादविवादाच्या अनेक बातम्या आल्या. पण डिंपल कधी आपल्यापासून राजेश खन्ना यांना वेगळं करु शकल्या नाहीत. राजेश खन्नाही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करायचे. या दोघांमध्ये वादाची अनेक कारणं होती. डिंपल यांचा बिंधास्तपणा हे प्रमुख होत. पण त्याबरोबर सन्नी देओल यांच्याबरोबर त्यांचे जोडलेले नाव हेही वादाचे कारण होते. डिंपल यांनी या नात्याबद्दल कधीच बोलणं पसंद केलं नाही. राजेश खन्ना आणि डिंपल. हे दोघं वेगवेगळं रहात असले तरी कौंटुबिक समारंभांना एकत्र हजर असायचे. अगदी राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसातही डिंपल त्यांच्या सेवेत हजर होत्या.
डिंपल म्हणजे गालावरची खळी. असं असलं तरी डिंपल यांच्यासाठी जीवनात खाचखळगेच अधिक होते. वाद-विवाद तर त्यांच्याबरोबर प्रसिद्धीपासूनच जोडले गेले. बॉबी रिलीज झाला तेव्हा डिंपल या राजकपूर आणि नर्गीस यांचीच मुलगी असल्याची चर्चा होती. राजेश खन्नांसारख्या सुपरस्टारबरोबर लग्न झालं पण ते जुळवून घेतांना आणि अगदी लहान वयात आलेली मुलींची जबाबदारी एकट्यानं निभावतांना झालेली फरफड. एक तपाच्या अंतरांनं पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्याची धडपड. आणि सौदर्याचा अभिमान असलेली मूडी अभिनेत्री हा शिक्का पुसून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न. डिंपल यांना प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागला. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड असतो. इथे तसंच आहे. आजी झालेल्या डिंपल आपल्या नातवांसोबत मजेत वेळ घालवत आहेत. त्या काही क्लासिक मेणबत्त्याही डिझाईन करतात. अगदी आंतरराष्ट्रीय बाजारातही या मेणबत्त्यांना मोठी किंमत आहे म्हणे. मुख्य म्हणजे अद्यापही त्यांना चित्रपटाच्या भूमिकांच्या ऑफर येतात. येत्या जुलैमध्ये त्यांचा हॉलिवूडपट रिलीज होणार आहे. डिंपल म्हटल की कानावर येतो तो थोडा घोगरा पण ठसकेबाज आवाज. घनदाट सोनेरी केस. आणि अजोड सौंदर्य. वयाची साठी ओलांडलेली ही अभिनेत्री आजही तशीच आहे. सागरजैसी ऑँखोवाली….

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity Birthday Entertainment Indian Cinema movies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.