‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पिक्चर दिल से बनती है, पैसै से नहीं….
‘बेताब’ पूर्ण झाला आणि जुहू चौपाटीजवळील सनी प्रिव्ह्यू थिएटरमध्ये त्याच्या पहिल्या ट्रायल शोचे आयोजन करण्यात आले. आपला मोठा मुलगा सनी देओलचा पहिला चित्रपट म्हणून धर्मेंद्रला कमालीची एक्साईटमेंट वाटत होती. आपल्याच विजयेता फिल्म या प्रतिष्ठित बॅनरखाली त्याने हा चित्रपट निर्माण केला होता. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राजेन्द्रकुमारपुत्र कुमार गौरवने ‘लव्ह स्टोरी’ च्या तर सुनील दत्तपुत्र संजय दत्तने ‘रॉकी’ च्या यशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते आणि देव आनंदपुत्र सुनील आनंद, नूतनपुत्र मोहनिश बहेल, राज कपूरचा धाकटा मुलगा राजीव कपूर, मनोजकुमारपुत्र कुणाल असे आणखीन काही ‘स्टार सन्स’ येताहेत अथवा आ रहे है असा एकूणच माहौल रंगला होता. कोणी याला ‘घराणेशाही’ म्हणत होते तर कोणी याला ‘फिल्म स्टारचा मुलगा फिल्म स्टारच बनणार’ असा फोकस टाकत होते…..
‘बेताब’ ची ट्रायल कोणत्या वातावरणात झाली असेल याची यावरुन कल्पना यावी.
ट्रायल संपली आणि धर्मेंद्र काहीशा नाराजीनेच बाहेर आला. स्वतःच्याच मालकीच्या मिनी थिएटरमध्ये असल्याने तर त्याच्याकडे बोलण्याचे स्वातंत्र्य जास्त होते. त्याने आपल्या सर्व पाहुण्यांसमोर या चित्रपटाचा दिग्दर्शक राहुल रवैलला म्हटलं, कुछ रिशूटींग करना पडेगा…. हमारी पिक्चर और अच्छी होनी चाहिये…. पैसे की चिंता मत करो, पिक्चर दिल से बनती है, पैसै से नहीं….
राहुल रवैलने पुन्हा पटकथेवर काम करुन सनी देओल आणि अमृता सिंग या दोन नवीन नायक नायिका यांच्यावर तब्बल चाळीस दिवसाचे आऊटडोअर शूटिंग सुरु केले…. तोपर्यंत ‘पिक्चर दिल से बनती है, पैसै से नहीं’ हे धर्मेंद्रचे बोल इंग्रजी, हिंदी, मराठी मिडियात सगळीकडे पोहचले होते. कोणी त्यावर लेख लिहिले, कोणी गॉसिप्स रंगवले. कोणी म्हटले, धर्मेंद्रमधील निर्माता नव्हे तर पिता जागा झाला……
‘बेताब’ पूर्ण झाला आणि ६ ऑगस्ट १९८३ ही रिलीजची तारीख आणि मुंबईतील मेन थिएटर अप्सरा हे निश्चित झाले आणि सनी देओलच्या मुलाखतीचे आयोजन सुरु झाले. दररोज फक्त एकाच सिनेपत्रकाराला सनी एकमेव मुलाखत देई. त्यासाठी सनी सुपर साऊंड हाच मिटींग पॉईंट फिक्स होता. त्यामुळे त्याला होमली फिल मिळत होता, त्या काळात मिडियाही तुलनेत कमी होता आणि ‘सनसनाटी निर्माण करावी असे उगाच प्रश्न होत नव्हते’. माझी सनी देओलशी पहिली भेट यावेळी झाली. माझ्याही करियरची सुरुवात होती, त्यामुळे मी खूप बुजरा होतो. “ही मॅन” गरम धरमच्या सुपुत्राला भेटायचं याचा कुठे तरी नकळत दबाव होताच. ‘पिक्चर दिल से बनती है… ‘चे विचारचक्र डोक्यात सुरु होते. पण…. पण प्रत्यक्षात सनी अगदीच शांत, बुजरा वाटला. सालस आहे हे लक्षात आले. प्रत्येक प्रश्नाला जेवढ्यास तेवढं उत्तर आणि सतत आपल्या तोंडावरुन हात फिरवत होता. पण त्याचे हे सगळे वागणं खरं होते (फिल्मी नव्हते) अथवा, मुलाखत कशी द्यायची अस त्याला ट्रेण्ड केला नव्हता. (ते धडे आजच्या काळात दिले जातात, त्यामुळे फिल्म स्टारच्या मुलाखतीतील खरेपण/प्रांजळपणा हरवलाय).
‘बेताब’ सुपर हिट झाला आणि सनीकडे आणखीन चित्रपट आले.
तेव्हा एक किस्सा खूप रंगवून सांगितला जाई, जुहूच्या आपल्या बंगल्यावर धर्मेंद्र पहिल्या मजल्यावर उभा असताना एखाद्या निर्मात्याला बंगल्याकडे येताना बघतो आणि आज आपण आणखीन एक चित्रपट साईन करणार या कल्पनेने सुखावतो… पण बराच वेळ झाला तरी निर्माता पहिल्या मजल्यावर आलाच नाही म्हणून तो शोध घेतो, तेव्हा त्याला समजते की, निर्माता खालच्या खालीच सनी देओलला साईन करुन गेला देखिल….
सनी बडे बाप का बेटा त्यामुळे अनेक मोठ्या निर्माता आणि दिग्दर्शकानी त्याला साईन केले. पण राहुल रवैल दिग्दर्शित ‘अर्जुन’ वगळता त्याचे चित्रपट चालेनासे झाले. ‘अर्जुन’ ही फक्त मुंबई शहरात ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी हिट झाला. नासिर हुसेन दिग्दर्शित ‘मंझिल मंझिल’ आणि ‘जबरदस्त’, राज खोसला दिग्दर्शित ‘सनी’, राहुल रवैल दिग्दर्शित ‘डकैत’, जे. पी. दत्ताचा ‘यतिम’, मुकुल आनंद दिग्दर्शित आणि अर्जुन हिंगोरानी निर्मित ‘सल्तनत’ असे एकामागोमाग एक महत्त्वाचे चित्रपट फ्लॉप म्हणजे पुढची पायरी अवघड. राजीव रॉय दिग्दर्शित ‘त्रिदेव’ सुपर हिट, पण क्रेडिट ओये ओये, तिरछी टोपीवाले या गाण्यांना गेले. आणि नसिरुद्दीन शहा व जॅकी श्रॉफ असे आणखीन दोन हीरो होतेच. येथे घराणेशाही नव्हे तर गुणवत्ता महत्वाची गोष्ट असते. सनीची यात चूक झाली होती, त्याने आपल्या पित्याच्या म्हणजे जुन्या पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. (अपवाद मुकुल आनंद, राहुल रवैल) गरज होती, नवीन पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका करण्याची….
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’ आणि एन. चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिंह’ हे त्याचे हुकमाचे पत्ते ठरले.
‘घायल’चा इरॉसच्या मिनी थिएटरमधील आम्हा समिक्षकांच्या शोच्या मध्यंतरमध्ये विजयता फिल्मकडून हळूच सांगितले की, सिनेमा संपल्यावर जवळच्या हॉटेलमध्ये काही निवडक सिनेपत्रकाराना पार्टी आहे, थांब. सनी स्वतः येणार आहे. तसा तो खरंच आला आणि अगदी आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराशी छान गप्पा केल्या (तेव्हाचाच फोटो सोबत आहे). पडद्यावर दे माय मारधाड करणारा सनी अजूनही सालसच आहे हे लक्षात आले.
‘नरसिंह’च्या नाशिकमधील आऊटडोअर शूटिंग कव्हरेजसाठी जाणे झाले. तेथे सनी आणि डिंपल यांच्यातील मोकळेपण सहज लक्षात आले. तेथेही पार्टीत सनीची भेट झाली. त्या काळात असे आऊटडोअर आम्हा सिनेपत्रकारांना खूप पथ्यावर पडत. स्टार्सशी भेटीगाठी होत.
सनीने ‘दिल्लगी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि अतिशय आदराने गोरेगावच्या फिल्म सिटीतील मिनी थिएटरमध्ये दिलीपकुमारसाठी ट्रायल आयोजली. चित्रपटात सनी, बॉबी हे देओल बंधु आणि उर्मिला मातोंडकर अशा प्रेम त्रिकोणाची थीम होती. ट्रायल संपताच दिलीपसाहेबांनी चित्रपटाची आणि सनीच्या दिग्दर्शनाची अतिशय शांतपणे आणि उर्दूमिश्रीत हिंदीचा एकेक शब्द उच्चारत छान तारीफ केली…. सनीच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट रसिकांनी नाकारला पण दिलीपकुमारकडून झालेले कौतुक मोठीच मिळकत ठरलीय….