‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ब्लूमिंगटन इंडिगाना युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रातून बी ए केलेला रणवीर अभिनय क्षेत्रात कसा आला?
आपल्या अजबगजब फॅशनमुळे, आयुष्यातील चुका अगदी खुल्लमखुल्ला मान्य करण्याच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेच्या वलयात असलेल्या रणवीर सिंगने (Ranveer Singh) बॉलीवूड अभिनेता म्हणून आपल्या अवघ्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये हिट सिनेमांची फटकेबाजी केली आहे. आज रणवीरसिंह आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत ६ जुलै १९९८५ या दिवशी जन्मलेल्या रणवीरसिंह जगजितसिंह भवनानी याची सिनेमाच्या पडद्यावरची कारकीर्द कुणालाही हेवा वाटावी अशीच आहे.
रणवीरच्या आई अंजू आणि अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता या सख्ख्या बहिणी. या नात्याने मौसाजी अनिल कपूर आणि मावसबहिण सोनम कपूर यांच्या व्यतिरिक्त रणवीरसिंहचे बॉलीवूडमध्ये कुणीच नातेवाईक नाही. पण तरीही स्वत: प्रयत्न करत रणवीरसिंहने बॉलीवूडमध्ये गाठलेला यशाचा टप्पा खूप कौतुकास्पद आहे. खरं तर रणवीरसिंहला कॉलेजमध्ये असताना अभिनयाचे वेड लागले. कॉलेजमधील एकांकिका, नाटकात तो भाग घ्यायचा. पण त्यानंतर अचानक त्याच्या डोक्यातील अभिनयाची हवा गेली आणि त्याला लेखनाची आवड लागली. लेखक बनण्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू झाले.
एका प्रकाशनासाठी तो कॉपी रायटर म्हणून कामही करत होता. त्यावेळीही केसांच्या हटके स्टाइल, कपड्यांमध्ये नवी फॅशन करण्याचाही त्याला छंदच होता. पण अर्थशास्त्रातील पदवीसाठी ब्लूमिंगटन इंडिगाना युनिव्हर्सिटीमध्ये तो शिकायला गेला आणि हातातील लेखणी मागे पडली व पुन्हा अभिनयाने त्याला खुणावले. जेव्हा अर्थशास्त्रातून बी. ए. होऊन रणवीर भारतात परतला तेव्हाही त्याचे अभिनेता होण्याचेच पक्के झाले होते. साहजिकच त्यासाठी पोर्टपोलिओ घेऊन ऑडिशन्स देण्यासाठी रणवीरने प्रचंड संघर्ष केला.
टीव्ही मालिकांच्या काही ऑफर्स त्याच्यासमोर होत्या, पण त्याला बॉलीवूडमध्येच जायचे होते. दरम्यान यशराज फिल्मच्या बँड बाजा बारात या सिनेमासाठी रणवीरने ऑडीशन दिली आणि या सिनेमातील दिल्लीच्या बिट्टू शर्मा या युवकाच्या रोलसाठी आदित्य चोप्रा यांनी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब केले. २०१० साली आलेल्या या सिनेमाने रणवीरला पहिलेच नवा चेहरा या विभागातील फिल्मफेअर अॅवार्ड मिळवून दिले. या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या मनीष शर्मा यांनी रणवीरला खास दिल्लीतील युवकांची देहबोली शिकण्यासाठी काही दिवस रणवीरला दिल्ली विद्यापीठात जाण्याचा टास्क दिला होता. रणवीरने पहिल्याच सिनेमात या भूमिकेला न्याय तर दिलाच पण प्रेक्षकांसह समीक्षकांचेही लक्ष वेधून घेतले.
रोल कोणताही असो, त्यामध्ये आरपार घुसण्याचे अभिनय कौशल्य हा रणवीरचा यूएसपी आहे आणि तो गेल्या दहा वर्षात वाढतोच आहे. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी आलेल्या लेडीज वर्सेस रिकी बहल या सिनेमात त्याचा टायटल रोल होता. २०१३ साली पडद्यावर आलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतही रणवीर भाव खाऊन गेला. सोनाक्षीसोबतच्या लुटेरा या पिरिअड फिल्ममध्ये त्याने वठवलेली भूमिका आजही लक्षात राहते ती त्याच्या अभिनयामुळेच.
२०१३ साली रामलीला या सिनेमाच्या रूपाने रणवीर दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या भट्टीत आला आणि रामलीलाची भट्टी चांगलीच जमली. याच सिनेमात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या सहनायिकेसोबत त्याचे सूर जुळले. या सिनेमात राम आणि लीला ही जोडी रंगवताना ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या जवळ आले आणि दोन वर्षापूर्वी त्यांनी आयुष्यासाठी गाठ बांधली. या दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग बॉलीवूडविश्वातील प्रचंड हिट ठरलेला विषय होता.
दरम्यान गुंडे, दिल धडकने दो, या सारखे मसालापट करत असताना रणवीरच्या आयुष्यात बाजीराव मस्तानी सिनेमातील बाजीराव पेशवा साकारण्याची संधी चालून आली. या संधीचे सोने करत इतिहासातील एका सत्य घटनेवर बेतलेल्या या सिनेमात रणवीरने कमाल केली. २०१८ हे सालही रणवीरने गाजवले. या वर्षी पडद्यावर आलेल्या पद्मावत या सिनेमातील अल्लाउद्दीन खिलजी ही खलनायकाची भूमिका रणवीरने लिलया पेलली. तर याच वर्षी सिम्बामधील डॅशिंग आणि रोमँटिक हिरोलाही रणवीरने न्याय दिला.
२०१९ ला आलेल्या गलीबॉय या सिनेमातील रॅपगायकाची सक्सेस स्टोरी पाहताना त्याच्या आयुष्याचाही पट उलगडत गेला आणि या सिनेमातील अपना टाइम आयेगा हे गाणं जणूकाही रणवीरसाठीच लिहिलं असावं का असा प्रश्नही त्याच्या चाहत्यांना पडला. या सिनेमाने ऑस्करच्या नामावलीत स्थानही मिळवले. प्रख्यात क्रिकेटपटू कपिल देव यांची बायोपिक असलेल्या ८० या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत असुन हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे.
अभिनय आणि नृत्य यामध्ये निपुण असलेल्या रणवीरने कुणीही गॉडफादर नसताना मिळवलेले हे यश त्याच्या मेहनतीची पावती आहे. फिल्मफेअर, स्क्रिन, गिल्ड, आयफा अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी रणवीरला सन्मानित केले आहे. विचित्र फॅशनमुळे सतत सोशल मीडियावर ट्रोल होणारा, चेष्टेचा विषय ठरणारा रणवीर, जेव्हा त्याच्या पडद्यावरच्या भूमिकेत शिरतो तेव्हा मात्र अनेकांची बोलती बंद करतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त पुढील कारकार्दीस खुप खूप शुभेच्छा.