‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
वैभव जोशीने लिहिलेली गझल ‘मेरे हिस्से का चाँद’
धकाधकीचे आयुष्य, रोजची गडबड, परवड… या मुळे होणारी चिडचिड, रडारड, या सगळ्या पासून सुटका करून घ्यायची असेल तर संगीतासारखी दुसरी गोष्ट नाही. आता तुम्ही म्हणाल लॉकडाऊन मध्ये कुठे होतेय धावपळ ? अर्थातच शारीरिक नसेल होत पण मानसिक थकवा नक्कीच जाणवतो. रोजच्या त्याच त्याच नकारात्मक गोष्टींना सामोरं जाताना कुठे तरी मनाला इजा होत असतेच. पर इस दर्द को हल्का करना चाहते हो तो संगीत से बेहतर और कुछ हो ही नहीं सकता! मनात नको नको ते वादंग उठू लागल्यावर एखादं गाणं ऐकलं की कसं शांत शांत वाटतं आणि त्यात जर ती गजल असेल तर सोने पे सुहागा!
अशीच एक अनोखी मेजवानी आपल्यासाठी घेऊन आले आहेत गजलकार वैभव जोशी आणि गायिका सावनी रवींद्र ! ‘मेरे हिस्से का चाँद’ या अल्बम मध्ये वैभवने लिहिलेल्या आणि सावनीने गायलेल्या गाण्यांना म्युझिक दिलं आहे दत्तप्रसाद रानडे यांनी. याच अल्बम मधलं ‘इतना शोर शराबा क्यूँ है’ हे गाणं unplugged स्वरूपात आता सावनीने सादर केलं आहे. यात बॅकग्राऊंडला निनाद सोलापूरकर यांच्या पियानो चे सूर ऐकू येतात. सावनी घराच्या बाल्कनी मध्ये उभी राहून हे गाणं गात असल्याचं आपल्याला दिसतं आणि तिच्या जोडीला मयूर धांडे आपल्या चित्रातून गाण्याचे भाव उलगडून दाखवतात.
कधी कधी आपल्या नकळत आपण मनात उगीचच अनेक गोष्टींचा कल्लोळ माजवतो आणि मग त्यातून विलग झाल्यावर ओकंबोक वाटू लागतं. खरं तर आजूबाजूच्या सगळ्या गोंगाटात आपण आपल्याशीच बोलणं विसरून जातो! मला काय हवं आहे, माझा आनंद कशात आहे याचा विचार करायला निवांत वेळ काढलाच जात नाही. नको असलेल्या गोष्टींच्या, माणसांच्या कलकलाटात हव्या असलेल्या गोष्टी, माणसं अलगद निसटून जातात हातातून, मनातून! पण जणू आपलंच आपल्याशी भांडण असल्यामुळे एकटं राहणं आपण पसंतच करत नाही. सतत एखाद्याचा सहवास हवाहवासा वाटत राहतो! मग तो सहवास जेव्हा लुप्त होतो तेव्हा आपला आपल्याशीच वाद सुरू होतो आणि सुरू होतो प्रवास एकटेपणाचा… पुढे मात्र हाच प्रवास खूप काही शिकवत जातो, हलके हलके समृद्ध करत जातो!
वैभवची गजलही अशीच नेहमीच समृद्ध करून जाते. त्याच्या काव्याची मोहिनी अशी आहे की त्याला त्याच्याच शब्दात विचारावं वाटतं, “यार तू इतना मीठा क्यों है?”
सावनीचा आवाज अधिक गोड आहे, तिची गायकी अधिक गोड आहे की तिचं दिसणं हे न उलगडणारं कोडं आहे. दत्तप्रसाद रानडे यांच्या संगीताची जादू भुरळ घालते आणि एकदा ऐकूनच हे गाणं तुम्ही तुमच्याही नकळत गुणगुणत राहता…
तो दोस्तों इस मैले आलम में अगर सुकून चाहते हो तो ये गाना जरूर सूनना!
… आणि हो… कसं वाटलं ते नक्की सांगा…
–स्वरांगी बापट